तेलंगणातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोने सर्वांचच लक्ष वेधून घेण्यासोबतच मन जिंकलं आहे. एक वडील आपल्या लेकीला अभिमानाने सॅल्यूट करत आहेत. ज्या मुलीला प्रेमाने, कष्टाने वाढवलं ती IAS झाल्यावर वडिलांनी सॅल्यूट करून तिचं स्वागत केलं आहे.
एन. वेंकटेश्वरलू यांचा आणि त्यांच्या लेकीचा हा फोटो आहे. ते तेलंगणातील नारायणपेटचे पोलीस अधीक्षक आहेत. त्यांची लेक उमा हरथी हिने घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससी २०२२ मध्ये ऑल इंडिया थर्ड रँक मिळवून देशाचं नाव उंचावलं आहे. त्यांचा हा फोटो आता व्हायरल होत आहे.
उमाचा जन्म तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात झाला. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या उमाने आयआयटी हैदराबादमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केलं, परंतु तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. देशाची सेवा करण्याचं स्वप्न होतं. वडिलांना गणवेशात पाहून तिला नेहमीच प्रेरणा मिळाली आणि तीच प्रेरणा तिला यूपीएससीच्या मार्गावर घेऊन गेली.
चार वेळा नापास झाली, पण हिंमत हरली नाही
उमाने चार वेळा यूपीएससी परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी निकाल निराशाजनक लागला. पण तिने हार मानली नाही. तिने स्वतःमध्ये सुधारणा केली, तिच्या चुकांमधून शिकली आणि पाचव्या प्रयत्नात इतिहास रचला. देशात तिसऱ्या रँकसह तिची आयएएसमध्ये निवड झाली.
फादर्स डेच्या दिवशी सर्वात मोठी भेट
जेव्हा उमा ट्रेनिंगसाठी तेलंगणा पोलीस अकॅडमीत पोहोचली तेव्हा तिला तिचे वडील तिथे भेटले. पण यावेळी लेक सामान्य मुलगी नव्हती तर आयएएस अधिकारी होती. त्या भावनिक क्षणी, एन. वेंकटेश्वरलू यांनी लेकीला सॅल्यूट केला, तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि तो फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. उमा हरथी हजारो मुलींसाठी आशेचा किरण आहे.