देशप्रेमाची भावना असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या श्रेजल गुलेरियाची गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे. तिचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून देशाची सेवा करत आहेत आणि तिचे आजोबा देखील निवृत्त फौजी आहेत. आता श्रेजलने देखील आकाश सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कौटुंबिक वारसा पुढे नेत, तिने CDS परीक्षेत देशात १२ वा रँक पटकावला असून तिची फ्लाइंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. हे यश तिच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद आहे.
श्रेजल गुलेरियाने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नांना सत्यात उतरवलं. श्रेजल हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका गावची रहिवासी आहे. तिने इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालयातून पूर्ण केलं. येथे तिने सतत उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि नेतृत्व कौशल्य दाखवलं. त्यानंतर ती दिल्ली विद्यापीठातून गणित विषयात BSc (ऑनर्स) करण्यासाठी दिल्लीला गेली.
आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणादरम्यान तिने CDS परीक्षेची तयारी केली. या काळात तिने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या संरक्षण निवड प्रक्रियेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाली. १२ व्या रँकसह परीक्षा पास होऊन तिने आकाशात उंच भरारी घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. आपल्या कुटुंबातील लष्करी सेवेची परंपरा पुढे नेत आहे. तिचे वडील होशियार सिंह लष्करात सुभेदार होते.
देशभक्त कुटुंबात लहानाची मोठी झालेल्या श्रेजलला नेहमीच देशसेवेची आवड होती. ती २७ डिसेंबर रोजी एअर फोर्स अकॅडमीसाठी रवाना झाली आहे. येथे ती एक वर्षाचं लष्करी आणि फ्लाइंग प्रशिक्षण घेणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तिला अधिकृतपणे भारतीय हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर म्हणून नियुक्त केलं जाईल. श्रेजलच्या यशात तिच्या कुटुंबाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे.
