मनात जिद्द असेल तर कोणत्याही गोष्टी शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. जयपूरच्या ताराचंद अग्रवाल यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनून अभ्यास आणि कठोर परिश्रम करण्यासाठी कोणतंही वय नसतं हे सिद्ध केलं आहे. जेव्हा लोक या वयात विश्रांती घेण्याचा विचार करतात तेव्हा ताराचंद यांनी नातीला अभ्यासात मदत करून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं.
ताराचंद अग्रवाल स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (SBBJ) मध्ये काम करत होते, परंतु निवृत्तीनंतरही त्यांनी हार मानली नाही. त्यांची नात सीएची तयारी करत असताना त्यांनी सीए होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं. आजोबांनी विचार केला की, नातीला थोडीशी मदत करूया. अशा परिस्थितीत त्यांना अकाउंट्स, बॅलन्स शीट आणि टॅक्स पेपर्स शिकताना मजा येऊ लागली. तेव्हाच त्यांनी आता आपण सीए होऊ असं ठरवलं.
वयामुळे थकवा आणि कमकुवत स्मरणशक्ती असूनही त्यांनी कठोर परिश्रम केले आणि देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण झाली. सीए निखिलेश कटारिया यांनी लिंक्डइनवर त्यांचा प्रेरणादायी प्रवास शेअर केला आणि इच्छा तिथे मार्ग असं लिहिलं आहे. त्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाली. एका युजरने लिहिलं - ७१ व्या वर्षी सीए होणं आश्चर्यकारक आहे, शिकण्याला वय नसतं. लोकांनी त्यांच्या हिमतीला दाद दिली आहे.
आयसीएआयने ६ जुलै रोजी सीए फायनल २०२५ चा निकाल जाहीर केला. यात ताराचंद अग्रवाल यांचं नाव सर्वात खास आहे. कारण त्यांच्या वयामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपल्यात जिद्द असेल तर कोणत्याही वयात आपण शिक्षण घेऊन आपलं स्वप्न पूर्ण करून शकतो हे यातून शिकायला मिळतं. अनेकांना यापासून प्रेरणा मिळत आहे.