बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी पूजा कुमारीने बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) परीक्षा उत्तीर्ण केली आणि अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न साकार केलं. पूजाचा हा प्रवास सोपा नव्हता, कधी तिने भाजी विकून उदरनिर्वाह केला, कधी कपडे आणि वस्तू विकल्या. कोरोना काळात मास्क शिवून कुटुंबाच्या खर्चाची जबाबदारी घेतली.
पूजाचे बालपण अत्यंत कष्टाचं होतं. बराच काळ तिच्या कुटुंबाने आर्थिक अडचणींचा सामना केला. कधी गटारजवळ कपड्यांचं दुकान सुरू केलं, तर कधी भाज्या विकल्या. कोरोना काळात कुटुंबाने मास्क शिवून खर्च भागवला. इतक्या वाईट परिस्थितीतही पूजाने आपला अभ्यास चालू ठेवला. पूजाला विश्वास होता की, शिक्षणामुळेच ती तिच्या कुटुंबाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते.
समाजातील लोकांनी खिल्ली उडवली
नातेवाईक, गावातील लोक आणि समाजातील लोकांनी तिची खिल्ली उडवली, तिला खूप टोमणे मारले. लोक घरच्यांना म्हणायचे की, पूजाचं लग्न करा. पण पूजा दिवसा अभ्यास करायची आणि रात्री कपडे शिवून कुटुंबाला मदत करायची. पुजाच्या पालकांनी कर्ज घेतलं, तिच्या शिक्षणासाठी गावातून शहरात आले आणि रस्त्याच्या कडेला एक छोटं दुकान लावून शिक्षण सुरू ठेवलं. पालकांनी आपल्या अडचणी विसरून फक्त पूजाच्या स्वप्नांचा विचार केला.
अखेर कठोर परिश्रमाचं फळ मिळालं
बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना पूजाला अनेक वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं. ती तिच्या चुकांमधून शिकत राहिली आणि सतत प्रयत्न करत राहिली. अखेर कठोर परिश्रमाचं फळ मिळालं आणि पूजाने बीपीएससी परीक्षेत ९८६ वा रँक मिळवला. आज पूजा कुमारी बिहारमध्ये सब-डिव्हिजनल वेलफेयर ऑफिसर म्हणून काम करत आहे. तिचा संघर्ष आणि यश लाखो मुलींसाठी प्रेरणादायी आहे.