Join us

जॉब सोडला अन् शेती केली! MBA तरुणीची कमाल-टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:55 IST

स्मृतीने कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि शेती केली. आज तिची उलाढाल तब्बल १.५ कोटी रुपये आहे. यासोबतच तिने तिच्या शेतात १२५ लोकांना रोजगार दिला  आहे.

काही लोक जास्त पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून शेती करत आहेत आणि त्यातून बक्कळ कमाई करत आहेत. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे.  छत्तीसगडच्या स्मृती चंद्राकर या तरुणीने शेतीत कमाल केली आहे. स्मृतीने तिची कॉर्पोरेट नोकरी सोडली आणि शेती केली. आज तिची उलाढाल तब्बल १.५ कोटी रुपये आहे. यासोबतच तिने तिच्या शेतात १२५ लोकांना रोजगार दिला  आहे.

स्मृती छत्तीसगडमधील एका गावातील शेतकरी कुटुंबात वाढली. तिचं बालपण तिच्या वडिलांसोबत हिरव्यागार शेतात गेलं, जिथे तिने शेतीबद्दलचे धडे गिरवले. "कोण म्हणतं की शेती फायदेशीर नाही? लोकांना वाटतं की हे एक छोटं काम आहे आणि त्यात काही कमाई नाही. पण हे खरं नाही" असं स्मृतीने म्हटलं आहे. 

कुटुंबासोबत करायची शेतात काम 

स्मृती रायपूरमध्ये इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर ती पुण्याला गेली आणि तिथून एमबीए केलं. एमबीए केल्यानंतर, तिने पुण्यातील एका कंपनीत पाच वर्षे काम केलं. नंतर तिने तिच्या कुटुंबाच्या जवळ राहण्यासाठी रायपूरला जाण्याचा निर्णय घेतला. रायपूरला आल्यानंतर स्मृती दर आठवड्याला तिच्या गावी जायची. ती तिच्या कुटुंबासोबत शेतात काम करायची. 

२० एकर जमिनीवर भाजीपाला लागवड

स्मृतीला वाटलं की, भाजीपाला लागवडीत जास्त नफा होतो. म्हणून तिने तिच्या जमिनीवर भाजीपाला लागवड करायला सुरुवात केली. तिला याचा खूप फायदा झाला. त्यानंतर तिने २० एकर जमिनीवर भाजीपाला लागवड सुरू केली आणि २०२१ मध्ये नोकरी सोडून शेतकरी बनली. गेल्या काही वर्षांत स्मृतीने शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवलं आहे. 

वार्षिक उलाढाल १.५ कोटी 

२०२४ मध्ये स्मृतीने सांगितलं होतं की प्रति एकर सुमारे ५० टन टोमॅटोचं उत्पादन होतं. यासह तिची वार्षिक उलाढाल १.५ कोटी रुपये आहे. तांदूळ आणि गहू यांसारखी पारंपारिक पिके तयार होण्यास बराच वेळ लागतो. भाजीपाला शेती इतक्या कमी वेळात अनेक पिके देते. यातून मिळणारं उत्पन्नही जास्त आहे. यासाठी तिने कृषी सल्लागाराची मदत घेतली. शेणखत आणि गांडूळ खत वापरून माती सुपीक केली.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीशेतीशेतकरी