Join us
Daily Top 2Weekly Top 5

करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:26 IST

डॉक्टर बनण्याचा इतका दृढनिश्चय होता की तो कोणत्याही परिस्थितीसमोर, समाजासमोर झुकला नाही. आपल्या स्वप्नासाठी लढला. 

बालविवाह हा गुन्हा असला तरी अनेक खेडेगावात आजही हे सर्रास होताना दिसतात. हे समाजासाठी एक मोठं आव्हान आहे, जे लहान मुलांची स्वप्नं मोडतात. पण जर तुमचं ध्येय मजबूत असेल तर कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील घोसुंडा येथील रहिवासी रामलाल भोई याने हेच सिद्ध केलं आहे. डॉक्टर बनण्याचा त्यांचा इतका दृढनिश्चय होता की तो कोणत्याही परिस्थितीसमोर, समाजासमोर झुकला नाही. आपल्या स्वप्नासाठी लढला. 

रामलालने NEET क्रॅक केली आहे. त्याने ६३२ गुण मिळवले आणि एससी कॅटेगरीमध्ये ५१३७ आणि ऑल इंडिया १२९०१ रँक मिळवली. रामलालने कोटा येथे कोचिंग घेतलं आणि आता तो वैद्यकीय शिक्षण घेत आहे, रामलालचं लग्न ११ व्या वर्षी झालं, त्यावेळी तो सहावीत होता. बालविवाहानंतरही त्याने अभ्यास करणं थांबवलं नाही. समाजाच्या विचारसरणीमुळे अभ्यास करणं, शिक्षण घेणं सोपं नव्हतं. 

अपयश आलं पण हार मानली नाही

वडिलांना त्यांच्या मुलाने दहावीनंतर शिक्षण घ्यावं असं वाटत नव्हतं परंतु रामलाल पुढे शिक्षण घेण्यावर ठाम होता. जेव्हा मित्राचे वडील आले आणि त्यांनी समजावून सांगितलं तेव्हा रामलालच्या वडिलांनी त्याला पुढच्या शिक्षणासाठी पाठिंबा दिला. कुटुंबाने शिक्षणासाठी सहमती दर्शवली, कर्ज घेतलं आणि त्याला शिक्षण दिलं. रामलालला अपयश आलं पण त्याने हार मानली नाही. अखेर पाचव्या प्रयत्नात नीट उत्तीर्ण केली.

"माझ्या पत्नीने माझ्यासाठी तिचं शिक्षण सोडलं"

रामलालने सांगितलं की, "माझ्या पत्नीने माझ्यासाठी तिचं शिक्षण सोडलं. लग्नाच्या वेळी मी ११ वर्षांचा होतो आणि सहावीत शिकत होतो. माझी पत्नीही त्याच वयाची आहे. सहा वर्षांपूर्वी माझी पत्नी आली आणि सासरी राहू लागली. तिने स्वतः दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिला दहावीनंतरही शिक्षण घ्यायचं होतं पण माझ्या अभ्यासासाठी तिने त्याग केला आणि जबाबदाऱ्या स्वीकारल्या. मला एक मुलगी आहे."

शिक्षणासाठी घरातून गेला पळून

"अभ्यास करून काय करणार आहेस असं लोक म्हणायचे. शिक्षणासाठी मी घरातून पळून जाऊन उदयपूरला गेलो आणि तिथे प्रवेश घेतला. नंतर जेव्हा माझ्या मित्राच्या वडिलांनी घरच्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी होकार दिला. मी २०१९ मध्ये ८१ टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण झालो. आर्थिक परिस्थिती खूपच कमकुवत आहे. पण आम्ही कष्ट करत आहोत."

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीशिक्षणडॉक्टर