Join us

मायलेकी एकाचवेळी झाल्या दहावी पास! आईने जिद्दीने पूर्ण केलं २० वर्षांपूर्वीचं स्वप्न, रात्रीपहाटे केला अभ्यास

By माधुरी पेठकर | Updated: May 14, 2025 19:11 IST

दहावी पास व्हायचंच म्हणून हट्टाने लेकीसोबत परीक्षेला बसलेल्या एका आईच्या जिद्दीची गोष्ट!

ठळक मुद्देआईच्या डोळ्यात लेकीसाठीची आनंदी स्वप्न आणि लेकीच्या डोळ्यात आईच्या जिद्दीचा अभिमान आणि आनंद पाहाता येतो.

माधुरी पेठकर

'रिझल्ट लागला, पास झाले हे ऐकून इतका आनंद झाला. माझा आनंद पाहून मुलगी म्हणाली आई जरा जपून, एवढ्या आनंदानं तुला हार्टअटॅक यायचा! पण खरं सांगते इतका आनंद आयुष्यात पहिल्यांदाच झालाय' ही प्रतिक्रिया आहे सुनीता गायकवाड यांची..! मुलगी नूतनसोबत त्या स्वत:ही दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. आई पास झाली म्हणून लेकीला अभिमान आणि लेक पास झाली म्हणून आईला अत्यानंद.

अशी ही अनोखी गोष्ट आहे. सुनीता यांचं २० वर्षांपूर्वीचं स्वप्न अखेरीस पूर्ण झाले आहे.ही गोष्ट आहे नाशिकच्या सुनीता गायकवाड आणि त्यांची लेक नूतनची! नाशिकस्थित निवृत्त प्राध्यापक लीना गोखले यांच्याकडे सुनीता मदतनीस म्हणून काम करतात. सुनीताची लेक नववीत गेली आणि त्यांनाही वाटू लागलं की आपणही दहावीची परीक्षा दिली तर? २००६ मध्ये सुनीता दहावीत होत्या. आईसोबत बाहेर धुणीभांडी करत शिकतही होत्या. पण तेव्हाच घरच्यांनी लग्न ठरवून टाकलं. घरात कोणीच शिकलेलं नसल्यानं शिक्षणाचं महत्त्व सुनीता सोडून कोणालाच नव्हतं. किमान दहावीचे पेपर झाल्यानंतर लग्न करा एवढी त्यांची विनवणी घरच्यांनी मान्य केली. लग्नाचं दडपण घेऊनच त्यांनी पेपर दिले. इतर सर्व विषय सुटले पण गणित विषय राहिला. वाचन , कविता मनापासून आवडणाऱ्या सुनीता यांना तेव्हापासूनच वाटत होतं की आपण दहावी पास व्हायला हवं. पण लग्नानंतर घर, मुलं, घर चालवण्यासाठी पैसे कमावणं या चक्रात त्यांच्या दहावी सुटण्याच्या इच्छेला कुठे जागाच राहिली नाही.

पण मुलगी नववीत गेली आणि त्यांच्या दहावी सुटण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली.  लीना गोखले यांनी त्यांना प्रोत्साहनही दिले आणि अभ्यासासाठी मार्गदर्शनही केले. मग सुनीता यांनी दोन वर्षांपूर्वीच दहावीच्या गणिताचा अभ्यास सुरु केला. पण २० वर्षांनंतर गणिताचं पुस्तक हातात धरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला साधं बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकारही जमत नाही. अशाने गणित विषय सुटणं अशक्यच या विचारानं त्या खचल्या. पण लीना गोखले यांनी  धीर देत त्यांची गणिताची प्राथमिक तयारी करुन घेत दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

मुलांच्या जबाबदाऱ्या आणि काम  सांभाळून अभ्यास करणं सुनीता यांच्यासाठी सोप्पं नव्हतं. दिवसभर अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने त्या पहाटे चार वाजता उठत. सकाळी चार ते सहा आणि रात्री कामं आटोपल्यावर बारापर्यंत जिद्दीने अभ्यास करत गणिताचा पेपर दिला. आणि यंदा त्या गणित विषय सुटला, त्या उत्तीर्ण झाल्या.

दहावीची परीक्षा पास करुन आपण स्वत:ला जगण्याच्या परीक्षेत खंबीरपणे उभं करण्याची ताकद दिल्याचं सुनिता सांगतात.. या यशानं मुलीचं शिक्षण पूर्ण करण्याची उमेद त्यांना मिळाली आहे. आपल्याप्रमाणे आपल्या मुलीची अवस्था व्हायला नको, तिने स्वत:च्या पायावर उभं राहावं उत्तम शिक्षण घ्यावं यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आणि विशेष म्हणजे आता दहावीनंतर त्यांनी स्वत:ही मुक्त विद्यापिठातून पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जाऊन मुलीसोबत घरगुती उद्योग सुरु करण्याचंही त्यांचं स्वप्न आहे. आईच्या डोळ्यात लेकीसाठीची आनंदी स्वप्न आणि लेकीच्या डोळ्यात आईच्या जिद्दीचा अभिमान आणि आनंद पाहाता येतो.

आईच्या जिद्दीचा मुलीलाही अभिमान

दहावी सुटण्यासाठीची आईची धडपड नूतनने जवळून पाहिली आहे. ती म्हणते, 'आम्ही दोघीही दहावीला होतो. पण दोघींनी एकत्र अभ्यास कधीच केला नाही. शाळा, क्लास यामुळे माझा अभ्यास व्हायचा पण आईचा नाही. त्यासाठी ती पहाटे उठायची. रात्री जागायची. अभ्यास करत तिथेच झोपी जायची.' आईच्या चिकाटीचं कौतुक वाटतं असं नूतन जेव्हा सांगते तेव्हा आईबद्दलचा अभिमानही तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतो. 

टॅग्स :शिक्षणदहावीचा निकालप्रेरणादायक गोष्टीनाशिक