झारखंडच्या छोट्याशा गावात राहणाऱ्या सूरज कुमार यादवने मोठं यश मिळवलं आहे. जेपीएससी २०२३ च्या निकालात ११० वा रँक मिळवणाऱ्या सूरजचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता. घरखर्च चालवण्यासाठी सूरजने स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून घरोघरी अन्न पोहोचवायचं काम केलं. पण त्याची परिस्थिती इतकी बिकट होती की कधी कधी त्याला दोन वेळचं जेवण मिळवणं देखील अवघड होतं.
झारखंड सिव्हिल सर्व्हिस २०२३ च्या परीक्षेत यश मिळवून सूरज कुमार यादव आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक आदर्श ठरला आहे. सर्व अडचणींवर मात करून सूरजने आपलं स्वप्न पूर्ण केलं. सूरजचे वडील मजूर म्हणून काम करतात. घरची आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करणं कठीण होतं. सूरजने लहानपणापासूनच त्याच्या वडिलांना संघर्ष करताना पाहिलं आणि म्हणूनच त्याने त्याच्या कुटुंबाला या संकटातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सूरज गावातून रांचीला स्थलांतरित झाला.
दिवसा ५ तास काम आणि रात्री अभ्यास
सूरज कुमार यादव शिक्षणासाठी रांचीला आला पण तिथे राहणं सोपं नव्हतं. त्याची स्वप्नं मोठी होती. शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. तो कधी स्विगी डिलिव्हरी बॉय बनला तर कधी रॅपिडो रायडर बनला. सुरुवातीला त्याच्याकडे बाईक खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. नंतर त्याचे दोन मित्र राजेश नायक आणि संदीप मंडल यांनी त्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सूरजला दिले. त्याने त्यातून एक सेकंड हँड बाईक खरेदी केली. तो दिवसा ५ तास काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा.
जिद्द असावी तर अशी
सूरजचा प्रवास कठीण असला तरी त्याला प्रत्येक पावलावर लोकांचा पाठिंबा मिळाला. तो शिक्षण घेत असताना त्याच्या बहिणीने घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली. त्याच्या पत्नीनेही त्याला प्रत्येक पावलावर प्रोत्साहन दिलं. सर्वांच्या पाठिंब्याचं, विश्वासाचं आणि सूरजच्या कठोर परिश्रमाचं फळ म्हणजे तो झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत चांगल्या रँकने यशस्वी झाला. जेव्हा सूरज कुमार यादवने जेपीएससी इंटरव्ह्यू बोर्डला त्याच्या डिलिव्हरी बॉय असण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही.