मनात जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असेल, तर वय हा केवळ एक आकडा असतो. मुंबईच्या विक्रोळीत राहणाऱ्या ६८ वर्षीय मंगला पोपट ठोके यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. ज्या वयाला लोक 'निवृत्तीचे वय' मानतात, त्या वयात मंगला यांनी हातात लेखणी धरली आणि बारावीची परीक्षा केवळ दिलीच नाही, तर ६०% गुणांसह घवघवीत यशही संपादन केलं. वर्गात त्यांच्यासोबत शिकणारी १७-१८ वर्षांची मुलं त्यांना प्रेमाने 'आजी' किंवा 'आई' म्हणत असत.
मंगला यांचा हा प्रवास सोपा नव्हता. दशकांपूर्वी गरिबी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांचं शिक्षण सुटलं होतं. लग्न, ५ मुलींचा सांभाळ आणि त्यानंतर ७ नातवंडांची देखभाल करण्यात वेळ कसा निघून गेला हे समजलंच नाही. पण शिक्षणाची ओढ त्यांच्या मनात कायम होती. पतीच्या निधनानंतर जेव्हा आयुष्यात एकटेपणा आला, तेव्हा त्यांनी तो पुस्तकांच्या सोबतीने भरून काढण्याचा निर्णय घेतला.
६८ व्या वर्षी 'आजी'ची गरुडझेप
सामान्यतः ६८ वर्षे हे वय नातवंडांसोबत वेळ घालवण्याचं आणि विश्रांतीचे मानलं जातं. मात्र मंगला ठोके यांनी याच वयात आपली सर्व ऊर्जा अभ्यासात लावली आणि बोर्डाच्या परीक्षेत यश मिळवून एक नवा आदर्श निर्माण केला. मंगला यांचं बालपण गरिबीत गेलं. आर्थिक ओढाताण आणि सामाजिक परिस्थितीमुळे त्यांना खूप कमी वयात शाळा सोडावी लागली. त्यानंतर संसारात त्या इतक्या गुंतल्या की स्वतःसाठी वेळच मिळाला नाही. "शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न माझ्या मनात नेहमीच जिवंत होतं" असं त्या सांगतात.
घर ते शाळेच्या बाकापर्यंत
२०२३ मध्ये त्यांनी विक्रोळीतील शारदा नाईट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सकाळी लवकर उठून घरची सर्व कामं उरकणं, स्वयंपाक करणं आणि दुपारी अभ्यासासाठी वेळ काढणं हा त्यांचा नित्यक्रम होता. संध्याकाळी ६:३० ते रात्री ९:३० पर्यंत त्या शाळेत असायच्या आणि त्यानंतर उशिरापर्यंत घरी पुन्हा उजळणी करायच्या.
नातवंडांच्या वयाचे विद्यार्थी बनले मित्र
वर्गात मंगला सर्वात ज्येष्ठ विद्यार्थिनी होत्या. पण त्यांनी वयाचं अंतर कधीच जाणवू दिलं नाही. तरुण विद्यार्थी त्यांना 'आजी' म्हणत. जेव्हा एखादा विषय समजायला कठीण जाई, तेव्हा हेच विद्यार्थी त्यांना मदत करत. त्या बदल्यात मंगला आपल्या अनुभवातून त्यांना मार्गदर्शन करत. शिक्षकांनीही त्यांना नेहमी प्रोत्साहन दिलें आणि एकच कानमंत्र दिला - "काहीही झाले तरी पेपर पूर्ण लिहायचा."
'प्रयत्न आणि परमेश्वर' यावर अढळ श्रद्धा
आपल्या यशाबद्दल बोलताना त्या म्हणतात की, शिक्षणाची पद्धत बदलली असली तरी शिकण्याची जिद्द तीच आहे. "सर्व काही माणसाच्या इच्छेवर अवलंबून असतं. शेवटी आपल्याकडे दोनच गोष्टी असतात - प्रयत्न आणि परमेश्वर." केवळ मेहनत आणि देवावरच्या श्रद्धेमुळेच आपण इथवर पोहोचलो, असे त्या मानतात. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाने आपल्या मनातील इच्छा पूर्ण केली पाहिजे, असा मेसेज त्या देतात. हाच उद्देश माणसाला जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देत असतो.
Web Summary : Mumbai's 68-year-old Mangala Thoke passed her 12th-grade exams with 60%. Overcoming poverty and family responsibilities, she fulfilled her lifelong dream after her husband's death, inspiring many with her dedication to education and proving that age is just a number.
Web Summary : मुंबई की 68 वर्षीय मंगला ठोके ने 60% अंकों के साथ 12वीं की परीक्षा पास की। गरीबी और पारिवारिक जिम्मेदारियों को पार करते हुए, उन्होंने अपने पति की मृत्यु के बाद अपने जीवन भर के सपने को पूरा किया, शिक्षा के प्रति अपने समर्पण से कई लोगों को प्रेरित किया और साबित किया कि उम्र सिर्फ एक संख्या है।