Join us  

#Breakthebias: ‘डोसा खावा तर काकाच्या हातचाच!’- संकर्षण कऱ्हाडे सांगतात, बदलत्या ‘पाक-कलेची’ गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 6:28 PM

संकर्षण कऱ्हाडे (Actor Sankarshan Karhade) अनेक वर्षे कुकिंग शोचे सूत्रसंचालक आहेत, त्यांना कसा दिसतोय हा स्वयंपाकघरातला बदल.

ठळक मुद्देस्वयंपाकघरात पुरुषांचा हा वावर आणि त्यांचं पाककलाप्रेम स्वागतार्ह ठरावेच.

पूर्वी स्वयंपाक हे फक्त बायकांचंच काम म्हणून ओळखलं जायचं.. त्यामुळे मग तिकडे पुरुषांची लुडबूड नसायचीच. त्यानंतर जेव्हा घराघरात टीव्ही आले तेव्हा काही रेसिपी शो (recipe show) सुरू झाले. यामध्ये स्वयंपाक करणाऱ्या आणि कार्यक्रमाचं होस्टिंग करणाऱ्याही महिलाच असायच्या. मग थोडा थोडा बदल दिसू लागला संजीव कपूरचा खाना खजाना लोकप्रिय झाला. त्यानंतर कुणाल कपूर ते रणवीर ब्रार मोठी फळीच शेफची लोकप्रिय झाली. मराठीतही आम्ही सारे खवय्ये म्हणत प्रशांत दामले (Prashant Damle), संकर्षण कऱ्हाडे (Actor Sankarshan Karhade) ही नावे सूत्रसंचालक म्हणून लोकप्रिय ठरली.

 

मात्र खाण्याच्या कार्यक्रमाचं शूट करता करता पुरुष सूत्रसंचालकांचीही स्वयंपाक आणि पाककला याबाबतची नजर बदलते का? संकर्षण कऱ्हाडेंनाच विचारलं. ते म्हणाले एकमेकांवर अवलंबून असणं, कमी झाल्यानेच आता पुरुषांचा स्वयंपाक घरातला वावरही अगदी सहज झाला आहे.. स्वयंपाक करताना, एखादा पदार्थ बनविताना बघणे ही खरोखरंच खूप आनंददायी गोष्ट आहे.

 

पण तसं पाहता संकर्षणला स्वत:ला स्वयंपाक करण्याची मुळीच आवड नाही. ते तसं सांगतातही. पण ते स्वत: पट्टीचा खवय्या असून वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं जाम आवडतं..संकर्षण म्हणतो की आता स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण एवढं वाढलं आहे की पुढच्या १०- १५ वर्षांत आपण नक्कीच पुरुषांनी केलेल्या पदार्थांची तारिफ ऐकू.. आता जसं आपण म्हणतो की 'अमूक भाजी खायची तर माझ्या आईच्याच हातची...', 'किंवा पुरणपोळी खायची तर आमच्या आजीच्या हातची...' तसंच काही वर्षांनी आपण असंही ऐकू की 'डोसा खायचा तर तो माझ्या काकाच्याच हातचा...',

 

स्वयंपाक घरातला हा बदलता महिमा नक्कीच सुखाचा आहे.. चला यानिमित्ताने घरातल्या महिलांनी चार क्षण उसंतीचे तरी मिळतील, अशी आशा करायला हरकत नाही. स्वयंपाकघरात पुरुषांचा हा वावर आणि त्यांचं पाककलाप्रेम स्वागतार्ह ठरावेच.

 

टॅग्स :जागतिक महिला दिनप्रेरणादायक गोष्टीसेलिब्रिटीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स