मनी बँक, ब्लड बँक, बुक बँक आणि रोटी बँकबद्दल आपण नेहमीच ऐकतो. पण आता 'ड्रेस बँक'ची जोरदार चर्चा रंगली आहे. ही अशी बँक आहे जिथे गरीब कुटुंबातील नवरीसाठी लेहेंगा आणि लग्नासाठी लागणारे कपडे अगदी मोफत मिळतात. विशेष म्हणजे ड्रेस बँक स्थापन करणारी व्यक्ती श्रीमंत किंवा व्यापारी नाही तर ती एका गरीब कुटुंबातीलच आहे. एका कुटुंबाचं दुःख पाहून त्यांना ही कल्पना सुचली आणि आतापर्यंत त्यांनी या उपक्रमाद्वारे २६० हून अधिक गरीब कुटुंबीयांच्या लग्नात आनंद आणला आहे.
'ड्रेस बँक'ची ही कल्पना केरळचे टॅक्सी चालक नासर थुथा यांची आहे. त्यांनी सौदी अरेबियातील रियाद येथील एका फूड सुपरमार्केटमध्ये १० वर्षे काम केलं पण नंतर त्यांना काहीतरी चांगलं आणि वेगळं करण्याची कल्पना सुचली. ते नोकरी सोडून गावी परतले. इथे आल्यानंतर टॅक्सी आणि रुग्णवाहिका चालवू लागले. थुथा यांना चार मुलं आहेत आणि ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच गरीब कुटुंबांना मदतही करत आहेत.
'ड्रेस बँक'ची कल्पना कशी सुचली?
एका मीडिया हाऊसशी बोलताना नासर यांनी ड्रेस बँकेबद्दल माहिती दिली आणि सांगितलं की, सौदी अरेबियाहून परतल्यानंतर ते गरीब लोकांचं पुनर्वसन करण्यात मदत करत होते. त्याच काळात, ते अशा अनेक कुटुंबांनाही भेटले ज्यांच्या मुलींचं लग्न होत होतं पण त्यांच्याकडे कपडेच नव्हते. कपडे महाग असल्यामुळे ते घेऊ शकत नव्हते. येथून त्याच्या मनात विचार आला की, अशा गरीब कुटुंबांना मदत करायला हवी.
अशी सुरू झाली 'ड्रेस बँक'
२०२० मध्ये कोरोना काळात नासर थुथा यांना गरीब कुटुंबांसाठी काम करायचं होतं. त्यांनी व्हॉट्सएप आणि फेसबुकवर ग्रुप तयार केले, काही लोकांना जोडलं आणि नंतर लोकांना त्यांचे जुने लग्नाचे कपडे दान करण्याचं आवाहन केलं. सुरुवातीला त्याांना थोडा संघर्ष करावा लागला पण लवकरच तो दिवस आला ज्याची नासर वाट पाहत होते. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर नवीन कपडेही येऊ लागले. त्यांनी हे कपडे घरातील एका खोलीत ठेवले आणि याच खोलीतून 'ड्रेस बँक' सुरू केली. मग ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि एकामागून एक लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले.
गरीब कुटुंबांना होतो आनंद
नासर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. त्यांच्या ड्रेस बँकेत सध्या ८०० हून अधिक लग्नाचे कपडे आहेत. ज्याची किंमत ५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत आहे. हे कपडे गरीब कुटुंबांसाठी आहेत. ज्या कुटुंबांकडे मुलींच्या लग्नासाठी कपडे नाहीत. ज्यांच्याकडे कपडे खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत ते सोशल मीडिया, फोन किंवा थेट ड्रेस बँकेशी संपर्क साधू शकतात. आवडीचे कपडे घेऊ शकतात. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.