शिक्षणाची गरज सगळ्यांनाच असते मात्र त्याची ओढ फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते. शिकण्याला वयाची मर्यादा नाही, ही आपण नेहमी ऐकतो पण त्या वाक्याला जगून दाखवणारे एक जिवंत उदाहरण म्हणजे इंदूरच्या ७८ वर्षीय सुषमाताई मोघे. (70-Year-Old Grandma Secures First Rank in MA Marathi, grandmother’s Advice: Never Stop Learning)आयुष्याच्या उत्तरार्धात, अनेक जण विश्रांतीचा विचार करत असतात. सुषमाताईंनी मात्र पुन्हा विद्यार्थी म्हणून जगण्याचा निर्णय घेतला.
सुषमा मोघे या जवळपास ४० वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक पिढ्यांना घडवले, पण त्यांच्या मनातील विद्यार्थी कधीच निवृत्त झाला नाही. निवृत्तीनंतर आयुष्यात थोडी पोकळी जाणवू लागली. "आता पुढे काय?" फक्त आराम करायचा नाही. काहीतरी वेगळे नवीन करायला हवे या विचारातून त्यांनी एम. ए. मराठी करण्याचा निर्णय घेतला. मराठी ही त्यांची मातृभाषा आणि आवडीचा विषय असल्याने त्यांनी एम.ए. मराठी साहित्यातच करायचे ठरवले. फक्त पदवी मिळवली नाही तर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. त्यांचा सन्मान देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदौरच्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आला आणि त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आजच्या डिजिटल युगात शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. ऑनलाइन व्याख्याने, असाइनमेंट्स, प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी नव्या होत्या. पण वयाला न जुमानता त्यांनी या सगळ्या पद्धती आत्मसात केल्या. नियमित अभ्यास, सातत्य आणि प्रचंड जिद्द यांच्या जोरावर त्यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण केल्या नाहीत, तर संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. ७८ व्या वर्षी सुवर्णपदक मिळवणे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नाही, ती संपूर्ण समाजासाठी प्रेरणा आहे.
दीक्षांत समारंभात सुवर्णपदक स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. मात्र या कार्यक्रमात त्यांना सन्मानित केले जात असताना सुषमाताईंपेक्षाही आनंदी त्यांची नातवंड होती. आजीच्या यशाचं एवढं कौतुक त्यांना होतं की त्यांच्या टाळ्या गर्दीतही वेगळ्या ऐकू येत होत्या. त्यांना आजीचा अभिमान वाटत होता कारण टाळ्यांच्या गजरात उभ्या असलेल्या त्या आजीने निवृत्तीची नवी व्याख्या लिहिली होती. शिक्षिका म्हणून ४० वर्षे काम केल्यावरही नवे काही शिकण्याची ही जिद्द नक्कीच वाखडण्याजोगी आहे. भाषा आणि शिक्षणावर त्यांचे प्रेम आहे. त्यामुळे हे यश मिळवणं शक्य झालं. इच्छा असेल तर वय काही मधे येत नाही हे सुषमाताईंनी सिद्ध केले.
