NEET ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. प्रत्येकजण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, परंतु ते पुन्हा या परीक्षेची तयारी करतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करतात. असंख्य अडचणींवर मात करत एका मुलीने NEET परीक्षा उत्तीर्ण केली. लवकरच डॉक्टर होऊन ती आता तिचं मोठं स्वप्न पूर्ण करणार आहे.
तबस्सुम जहा असं या १८ वर्षीय मुलीचं नाव असून ती बिहारच्या एका सामान्य कुटुंबातील आहे. तिच्या धाडसाची आणि कठोर परिश्रमाची प्रेरणादायी गोष्ट आज लाखो लोकांची मनं जिंकत आहे. कारण तिने हे यश मिळवण्यासाठी अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. ध्येयापर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास अनेक अडचणींनी भरलेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तबस्सुमच्या वडिलांचं उत्पन्न खूप कमी आहे. ते महिन्याला ६,००० रुपये कमवतात. तसेच तबस्सुमची आई देखील घरखर्चासाठी काम करते. ती शिवणकाम करून घर चालवते. अशा परिस्थितीत, घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आईने नेहमीच आपल्या मुलीला तिच्या अभ्यासात खूप साथ दिली.
या सर्व अडचणींव्यतिरिक्त तबस्सुमसोबत आणखी एक घटना घडली. लहान असताना तिच्या हाताचं हाड मोडलं. त्यामुळे तिला दीड वर्षांहून अधिक काळ शाळा सोडावी लागली. तसेच हातावर उपचार करण्यासाठी तिने तिच्या आईसोबत रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तीन रात्री घालवल्या. प्लॅटफॉर्मवर झोपण्याची वेळ आहे कारण तिथे राहण्यासाठी जागा नव्हती.
तबस्सुमने हार मानली नाही, सर्व अडचणी असूनही तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि NEET UG परीक्षेत (NEET UG 2025) ५५० गुण मिळवले. तिचं हे यश आपल्या सर्वांना शिकवतं की, सतत कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतं. तबस्सुमपासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.