ब्रा अर्थात अंतर्वस्त्र, ती कोणत्या ब्रँडची घालावी, कोणत्या साईजची घालावी, कोणत्या ड्रेस मध्ये कोणते पॅटर्न घालावेत, कितव्या वयापासून घालावी आणि मुख्यतः रात्री झोपतानाही घालावी की काढावी असे अनेक प्रश्न महिलांना सतावतात. यात आणखी एक गोंधळ म्हणजे रात्री ब्रा घालून न झोपल्याने स्तन ओघळतात किंवा स्तनांचा आकार वाढतो. हे खरं आहे? याबाबत डॉक्टर काय सांगतात ते जाणून घेऊ.
ब्रा न घालता झोपल्याने स्तनांचा आकार वाढतो का?
डॉक्टर सांगतात, ब्रा घालणे किंवा न घालणे याचा स्तनांच्या आकारावर थेट परिणाम होत नाही. स्तनांचा आकार प्रामुख्याने जनुके, हार्मोन्स, वजन आणि वय यावर अवलंबून असतो. म्हणजेच, तुम्ही रात्री ब्रा घालून झोपता की नाही, त्यामुळे स्तनांचा आकार मोठा किंवा लहान होणार नाही. हे पूर्णतः तुमच्या सोयीनुसार ठरवता येते. काही जणी ब्रा घालूनही आरामात झोपू शकतात, तर काही जणींना दिवसभर झालेली घुसमट सहन न झाल्याने त्या झोपण्याआधी ब्रा काढून ठेवतात.
मग नेमकं काय करावं?
दिवसभर घातलेली ब्रा रात्री घालून झोपल्याने त्वचेवर पुरळ येतात, घाम येतो, अस्वस्थता जाणवते आणि रक्ताभिसरण होण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुम्हाला ब्रा घालावीशी वाटत असेल तर धुतलेली आणि नेहमीपेक्षा थोडी सैलसर असलेली ब्रा घालून झोपा.
डॉक्टर म्हणतात, जर स्तनाचा आकार खूप मोठा असेल किंवा तुम्हाला आधाराशिवाय जड वाटत असेल, तर तुम्ही झोपताना स्पोर्ट्स ब्रा किंवा सॉफ्ट सपोर्ट ब्रा घालू शकता.
स्तनाचा आकार वाढवणे किंवा कमी करणे याचा झोपताना ब्रा घालण्याशी काहीही संबंध नाही. स्तनांना योग्य आधार आणि आराम देण्यासाठी, योग्य आकाराची आणि योग्य मटेरियलची ब्रा घालणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा.