सारख्या शिंका येणे ही काही समस्या किंवा आजार नाही. ही स्थिती अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, पण बहुतेक वेळा तिचा संबंध सर्दी, अॅलर्जी किंवा पर्यावरणातील बदलांशी असतो. ( sneezing all the time? there can be multiple reasons, home remedies, cold and cough can cause problems)शिंका येणं हे शरीराचं एक नैसर्गिक संरक्षण सूत्र आहे. जेव्हा नाकात कोणतेही कण, धूळ, परागकण किंवा जंतू आत जातात, तेव्हा नाक त्यांना बाहेर टाकण्यासाठी शिंकण्याचा प्रतिसाद देते. मात्र, काही लोकांना दिवसभरात अनेकदा किंवा सलग शिंका येत राहतात, तेव्हा त्यामागे एखादी आरोग्यविषयक समस्या असू शकते. सारख्या शिंका आल्यावर घसा आणि नाकही दुखायला लागते.
सर्दी हे शिंका येण्यामागे सर्वसामान्य कारण आहे. विषाणूंमुळे होणारी सर्दी नाकाच्या आतील आवरणावर परिणाम करते. त्यामुळे नाक सतत वाहते. अशावेळी सर्दीवर योग्य उपचार करणे गरजेचे असते. गरम पाणी सतत प्यायचे. घरगुती उपायांसाठी आल्याचा चहा, वाफ घेणे, हळदीचे दूध असे उपाय उपयुक्त ठरतातच. तसेच शरीराला पुरेशी विश्रांती देणे आणि सत्वांनी परिपूर्ण असा आहार घेतल्यास सर्दी लवकर बरी होण्यासाठी मदत होत.
सर्दीव्यतिरिक्त अॅलर्जी हे शिंका येण्यामागे दुसरे मोठे कारण असते. काही लोकांना धूळ, परागकण, प्राण्यांचे केस किंवा विशिष्ट सुवासिक वस्तूंमुळे अॅलर्जी होते. अशावेळी शिंका येणे, नाक वाहणे, डोळे पाणावणे ही लक्षणे दिसतात. अशा परिस्थितीत अॅलर्जी ज्यामुळे होते त्यापासून दूर राहणे, घर स्वच्छ ठेवणे, पांघरुण, पडदे वारंवार धुणे आणि डॉक्टरांनी सुचवलेले अॅलर्जी विरोधी औषध घेणे फायदेशीर ठरते.
कधीकधी सारख्या शिंका येणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया नसून, नाकातील काही रचना किंवा अडथळ्यांमुळे होणारी कृती असते. जसे की सायनसच्या त्रासाची सुरवात असल्याचे लक्षण किंवा वारंवार होणारे संसर्ग. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. काही वेळा योग्य तपासणीनंतर कारण वेगळेच निघते. उपचाराची गरजही भासू शकते.
मानसिक तणाव, प्रदूषण, तापमानातील अचानक बदल किंवा फार उष्ण पदार्थ खाल्ल्यानंतरही काही लोकांना शिंका येतात. त्यामुळे या गोष्टींचाही विचार करून आपला दिनक्रम आणि सवयींचे नियोजन करणे उपयुक्त ठरते. शिंका येणं काही वेळा सहजगत्या थांबतं, पण जर त्या वारंवार येत असतील, दिवसभर कामात अडथळा आणत असतील किंवा झोपेवर परिणाम करत असतील, तर कारणाची योग्य तपासणी करून उपाय करणे गरजेचे असते. घरगुती उपाय, स्वच्छता, आहार आणि डॉक्टरांचा सल्ला या चार गोष्टी शिंकांवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.