ओजस. सु.वि. (स्तनपान सल्लागार) नवजात बाळाची योग्य वाढ होण्यासाठी त्याचं स्तनपान लवकरात लवकर सुरळीत होणं खूप गरजेचं असतं. गरोदरपण, बाळंतपण यामुळे आई आधीच गोंधळून गेलेली असते. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्याही थकलेली असते. अशातच तिला स्तनपानाविषयी कित्येक गोष्टी अनुभवी महिलांकडून सांगितल्या जातात. प्रत्येकीचं ऐकून तिची अवस्था आणखीनच गोंधळल्यासारखी होते. जे काही कानावर येतंय त्यातलं काय ऐकावं आणि काय सोडावं हे सुद्धा लक्षात येत नाही. बाळाचं पोट व्यवस्थित भरतंय का, आपण योग्य पद्धतीने स्तनपान करतो आहोत का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात असतात. त्या प्रश्नांची उत्तर इतरांकडून जाणून घेतली तर त्यांचं निरसन होण्यापेक्षा शंकाच जास्त वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती वाचा आणि स्तनपान योग्य पद्धतीने चालू आहे की नाही हे स्वत:चं स्वत: तपासून पाहा.
स्तनपान करणाऱ्या आईने स्वत: या गोष्टी चांगल्या चालू असल्याची खात्री करावी
१. स्तनपान करताना आई आणि बाळ समाधानी आहेत. दूध पाजताना बसण्याची/ झोपण्याची स्थिती आईसाठी आरामदायक आहे.
२. बाळ स्तनपान करण्यासाठी उत्सुक आहे.
३. दूध पाजताना आईला वेदना होत नाहीत.
४. नवजात बाळाला दर २- ३ तासाने स्तनपान दिले जाते.
लिंबू पिळून सालं फेकून देऊ नका, कुंडीतल्या रोपांना द्या हा आंबट खाऊ! रोपांवर रोग पडणार नाही..
५. एका वेळेस एकाच स्तनावर वीस मिनिटे स्तनपान केले जात आहे. आलटून पालटून दोन्ही स्तनांवर स्तनपान केले जात आहे.
६. बाळ स्वत:हून दूध मागते आणि आईला बाळाने दूध मागितलेले समजते. ७. बाळ दिवसातून (२४ तासातून) ६ पेक्षा अधिक वेळा शू करते आहे. ८. बाळाचे वजन दर आठवड्यात २०० ग्रॅमपेक्षा अधिक वाढत आहे.
९. बाळ दिवसातून टप्प्याटप्प्याने दिवसभरात सुमारे १४- १५ तास झोप घेते आहे.
१०. जागे असताना बाळ हसरे व खेळकर आहे.
११. बाळ वयोनुरूप प्रगतीचे टप्पे (milestone) गाठते आहे.
वरील गोष्टी आईला जाणवत असतील तर स्तनपान योग्य चालले आहे अशी शाबासकी आईने स्वत:ला द्यावी.
स्तनपान अयोग्य चाललंय हे कसं ओळखायचं?
१. स्तनपान करताना किंवा आईच्या छातीजवळ नेल्यावर बाळ जोरात रडते.
२. स्तनपान सुरु केल्यावर बाळ चोखायचे थांबवून तोंडात निपल घेऊन झोपून जाते.
३. बाळ जोरजोरात चावून हावरेपणाने दूध ओढते.
४. स्तनपान करताना आईची पाठ / कंबर दुखतें.
५. दूध पाजताना / पाजल्यानंतर आईला स्तनात / स्तनाग्रात वेदना होतात.
६. आईला स्तनात गाठी येतात किंवा स्तनाग्रावर जखमा होतात.
७. आईला स्तनात जंतुसंसर्ग (mastitis/ abscess) होतो व ताप येतो.
८. आईला स्तनपान करायचा ताण येतो, स्तनपानाच्या कल्पनेने नकोसे वाटते.
९. नवजात बाळ स्तनपान न घेता ३ तासापेक्षा जास्त झोपते. (थोडे मोठे मूल याहून अधिक काळ झोपू शकते)
१०. बाळाला बाटलीने दूध पाजले जाते. बाळाला २४ तासात ६ पेक्षा कमी वेळा शू होते आहे.
११. बाळाचे वजन पुरेसे वाढत नाही, तसेच बाळ पुरेसे खेळकर नाही.
वरील गोष्टी जाणवत असल्यास स्तनपानाच्या प्रक्रियेत सुधारणा करायला हव्यात. यासाठी स्तनपान सल्लागारांशी संपर्क करावा.
https://www.instagram.com/themilkyway_ojas/
contact: 94035 79416