lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रेग्नंन्सी प्लॅन करताय? गर्भधारणेच्या शक्यता वाढविण्यासाठी आपल्या तब्येतीची कशी काळजी घ्याल?

प्रेग्नंन्सी प्लॅन करताय? गर्भधारणेच्या शक्यता वाढविण्यासाठी आपल्या तब्येतीची कशी काळजी घ्याल?

ही गुंतागुंतीची प्रक्रिया वाटत असली तरी, आधीपासून नियोजन केले आणि योग्य ती काळजी घेतली तर तुम्हीही देऊ शकता गोंडस बाळाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 04:51 PM2021-10-05T16:51:00+5:302021-10-05T17:04:16+5:30

ही गुंतागुंतीची प्रक्रिया वाटत असली तरी, आधीपासून नियोजन केले आणि योग्य ती काळजी घेतली तर तुम्हीही देऊ शकता गोंडस बाळाला जन्म

Planning a pregnancy? How do you take care of your health to increase your chances of getting pregnant? | प्रेग्नंन्सी प्लॅन करताय? गर्भधारणेच्या शक्यता वाढविण्यासाठी आपल्या तब्येतीची कशी काळजी घ्याल?

प्रेग्नंन्सी प्लॅन करताय? गर्भधारणेच्या शक्यता वाढविण्यासाठी आपल्या तब्येतीची कशी काळजी घ्याल?

Highlightsआरोग्यदायी बाळासाठी गर्भधारणा होण्यापूर्वीपासूनच तयारी करावी लागतेगर्भधारणा होण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असतेचांगल्या गर्भधारणेसाठी दिवसाला ८ ते ९ तास झोप आवश्यक

गर्भधारणा हा तरुण जोडप्यांमधील एक महत्त्वाचा विषय आहे. ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून त्याच्याशी अनेक घटकांचा संबंध असतो. काही जोडप्यांमध्ये ठरवल्यानंतर लगेचच गर्भधारणा राहू शकते तर काहींना कित्येक वर्षे वाट पहावी लागते. लग्नानंतर दिर्घकाळ गर्भधारणा न झाल्यास जोडप्यांना ताणाला सामोरे जावे लागू शकते. मात्र या गोष्टीचा ताण न घेता आधीपासूनच योग्य ती काळजी घेतल्यास हा प्रवास सुखकर होऊ शकतो. उत्तम गर्भधारणेसाठी आणि आरोग्यदायी बाळासाठी गर्भधारणा होण्यापूर्वीपासूनच तयारी करावी लागते. त्यासाठी तुम्ही भावनिकरित्या आणि शारीरिकरित्या पूर्णपणे तयार असावे लागता. निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढावी यासाठी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला गर्भधारणापूर्व नियोजन उपयोगी ठरते. जीवनशैलीतील बदल आणि काही वैद्यकीय चाचण्या यांच्या माध्यमातून हे नियोजन करता येते. आता तुम्ही गर्भधारणा होण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते, जाणून घेऊया...   

( Image : Google)
( Image : Google)

१. वैद्यकीय चाचण्या - गर्भधारणेपूर्वी काही आवश्यक चाचण्या केल्यास त्याचा गर्भधारणा होण्याच्या शक्यतेविषयी तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तसेच जोडीदारांपैकी दोघांनाही गर्भधारणेसाठी आपण निरोगी आहोत का याबाबत स्पष्टता येऊ शकते. या चाचण्या करत असताना तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचा वै्द्यकीय इतिहासही तज्ज्ञांना अभ्यासता येतो. त्यामुळे गर्भधारणेमध्ये येणाऱ्या अडचणी टाळता येऊ शकतात. म्हणून योग्य वेळी गर्भधारणेशी निगडित चाचण्या करणे आवश्यक असून वेळीच त्यादृष्टीने पावले उचलायला हवीत.

२. सध्या घेत असलेले औषधोपचार - तुमच्यावर कोणतेही उपचार सुरु असतील आणि त्यासाठी तुम्ही औषधोपचार घेत असाल तर गर्भधारणेसाठी ते योग्य नसते. डोकेदुखी, सर्दी-ताप किंवा अॅसिडीटी यांसारख्या लहान-मोठ्या समस्यांसाठीही तुम्ही कोणती औषधे घेत असाल तर ते गर्भधारणेच्यादृष्टीने योग्य नसते. अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. या औषधांमधील घटक गर्भधारणेसाठी घातक असू शकतात, त्यामुळे याबाबतची काळजी जोडीदारांपैकी दोघांनीही घ्यायला हवी.

३. मल्टीव्हटॅमिन्स घ्या - नऊ महिने पोटात बाळ वाढवणे ही महिलेसाठी सोपी प्रक्रिया नाही. या काळात तिच्यात अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. या अवस्थेत आरोग्य उत्तम राखण्यासाठी शरीराला पोषक घटकांची आवश्यकता असते. पोटात असणाऱ्या गर्भाची चांगली वाढ होण्यासाठीही हे घटक गरजेचे असतात. त्यामुळे तुमची गर्भधारणा निरोगी व्हायची असेल तर तुमच्या आहारात मल्टीव्हिटॅमिनचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. यासंदर्भात तुमच्या डॉक्टरांशी बोलून वेळीच फोलिक अॅसिड आणि मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या सुरू करा.

( Image : Google)
( Image : Google)

४. वजनावर लक्ष ठेवा - तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराचा बॉडी मास इंडेक्स जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी वेळीच प्रयत्न करा. तुम्ही बाळासाठी नियोजन करत असाल तर जास्तीचे वजन ही प्रक्रिया होण्यास त्रासदायक ठरु शकते. तसेच तुम्हाला रक्तदाब, मधुमेह अशा समस्या असतील तर वेळीच त्यावर योग्य तो सल्ला घेऊन उपाययोजना करा.

५. जीवनशैलीचे संतुलन राखा - उत्तम आरोग्यासाठी झोप, व्यसनांपासून दूर राहणे, चांगला आहार या गोष्टी गरजेच्या असतात. गर्भधारणेसाठीही हे अत्यावश्यक घटक असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या गर्भधारणेसाठी दिवसाला ८ ते ९ तास झोप आवश्यक असून त्याप्रमाणे नियोजन करणे गरजेचे आहे.       

६. व्यायाम - गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही खूप कष्ट घेऊन वर्कआऊट करणे गरजेचे नाही तर शारीरिकदृष्ट्या अॅक्टीव्ह असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही आठवड्यातून किमान ३ दिवस ३ तास योगा, चालणे असे तुम्हाला जमेल ते व्यायामप्रकार करणे आवश्यक आहे.

७. पोषक आहार घ्या - मल्टीव्हिटॅमिनचा शरीराला फायदा होतोच. पण तुम्ही पूर्णपणे त्यावर अवलंबून राहू नका. त्यासोबतच पुरेसा आणि योग्य आहार घेणेही तितकेच आवश्यक आहे. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तेव्हा जंक फूड टाळा. आहारात पालेभाज्या, अंडी, फळे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करा. 

Web Title: Planning a pregnancy? How do you take care of your health to increase your chances of getting pregnant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.