Join us

भारतात जन्माला येत आहेत कमी वजनाचं बाळं, प्रीमॅच्युअर डिलिव्हरीही वाढल्या; ‘हे’ कारण-पोटातल्या बाळांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 20:10 IST

Pollution Side Effects on New Births : रिपोर्टनुसार, दूषित हवेमुळे दिल्लीत १३ टक्के बाळांनी वेळेआधीच जन्म घेतला, तर १७ टक्के बाळांचं वजन कमी होतं.

Pollution Side Effects on New Births : सध्या सगळीकडे वायु प्रदूषण खूप जास्त वाढलं आहे. देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणाबाबत तर नेहमीच बोललं जातं. कशाप्रकारे वायु प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे हे वेळोवेळी समोर आलं आहे. आता अलिकडेच समोर आलेल्या एका रिसर्चनुसार, वायु प्रदूषणाचा प्रभाव महिलांच्या गर्भावरही पडत आहे. रिपोर्टनुसार, दूषित हवेमुळे दिल्लीत १३ टक्के बाळांनी वेळेआधीच जन्म घेतला, तर १७ टक्के बाळांचं वजन कमी होतं.

आयआयटी दिल्ली आणि मुंबईतील काही संस्था, ब्रिटन आणि आयरलॅंडमधील काही संस्थांनी राष्ट्रीय परिवार आरोग्य सर्व्हेक्षण २०१९-२०२१ आणि रिमोट सेंसिंग डेटाचं विश्लेषण केल्यावर हा निष्कर्ष काढला. रिसर्चमध्ये अभ्यासकांना आढळून आलं की, पीएम २.५ च्या (प्रदूषणाचे असे कण जे डोळ्यांनी दिसत नाहीत) संपर्कात जास्त आल्यानं महिलांमध्ये वेळेआधी डिलेव्हरीची ७० टक्के आणि कमी वजनाच्या बाळांची शक्यता ४० टक्के होती.

अभ्यासकांना आढळून आलं की, उत्तर भारतात राहणारी लहान मुले प्रदूषणाबाबत खूप जास्त संवेदनशील आहेत. रिसर्चमध्ये असंही आढळून आलं की, ३० वयानंतर महिलांमध्ये वेळेआधीच डिलेव्हरीचं प्रमाण वाढलं आहे. तसेच कमी वजन असलेल्या मातांकडून कमी वजनाच्या बाळांना जन्म देण्याचा दर २२ टक्के आणि वेळेआधीच डिलेव्हरी होण्याचं प्रमाण १३ टक्क्यांपेक्षा अधिक होतं. तेच सामान्य महिलांमध्ये ही टक्केवारी १७ आणि १२ टक्के होती.

राष्ट्रीय परिवार आरोग्य सर्व्हेक्षण २०१५-१६ च्या डेटानुसार, त्यावेळी पीएम २.५च्या संपर्कात आल्यानं १२ टक्के बाळांचा जन्म वेळेआधीच झाला. तर कमी वजनाच्या बाळांचं प्रमाण ५ टक्के होतं.

काय आहे पीएम २.५?

हवेमध्ये धूळ-मातीचे कण तर तुम्ही पाहिले असतील. ही धूळ घसा, डोळे आणि नाकात गेल्यास समस्या होतात. पण घातक वायु प्रदूषणाच्या मागे PM 2.5 आणि PM 10 चा सगळ्यात मोठा हात आहे. पीएमचा अर्थ होतो पार्टिकुलेट मॅटर. २.५ आणि १० या मॅटर किंवा कणांचा आकार असतो. दिसणारी धूळ नाकात जाऊन म्यूकससोबत मिक्स होते. जी तुम्ही साफ करू शकता. पण पार्टिकुलेट मॅटर २.५ आणि १० चा आकार इतका लहान असतो की, ते डोळ्यांनी दिसत नाहीत. याच अदृश्य कणांचा धोका अधिक असतो.

कसं पसरतं पार्टिकुलेट मॅटरचं प्रदूषण?

PM 2.5 आणि 10 नॅचरल कारणांनी आणि जास्तकरून मानवी कारणांची पसरतात. नॅचरल कारणं जसे की, जंगलात लागलेली आग, ज्वालामुखी उद्रेक, वाळूचं वादळ इत्यादी. तेच मानवी कारणांमध्ये उद्योगातून होत असलेलं प्रदूषण, गाड्यांमधून होणारं प्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. 

टॅग्स : प्रेग्नंसीप्रदूषणस्त्रियांचे आरोग्यहेल्थ टिप्स