आज, २५ जुलै २०२५ रोजी, जगभरात जागतिक आयव्हीएफ दिन(International IVF Day 2025). पस्तिशी ओलांडलेली जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसल्याने IVF चा पर्याय निवडतात.हा खर्च काही लाखांच्या घरात असला तरी आईबाबा होण्याचं स्वप्न या उपचारांपेक्षा मोठं ठरतय, पण अनेकदा पैसे खर्चूनही अपयश येऊ शकतं. निराश वाटतं. आयव्हीएफ तज्ज्ञ सांगतात, 'केवळ पैसे खर्च करण्याची तयारी असून चालत नाही, तर काही वाईट सवयीदेखील सोडाव्या लागतात. दैनंदिन जीवनशैलीत बदल करावे लागतात. आहारशैली बदलावी लागते. तसे केले नाही तर IVF यशस्वी होऊ शकत नाही.
IVF च्या अपयशाची कारणे :
धूम्रपान : आज अनेक तरुण/तरुणी धूम्रपान करतात दिसतात. ओकेजनल स्मोकर म्हणता म्हणता ही सवय अंगवळणी पडते आणि त्याचेच व्यसनात रूपांतर होते. हे व्यसन IVF ट्रीटमेंटसाठी मोठा अडथळा ठरते.
धूम्रपान/तंबाखूचा कसा परिणाम होतो?
धुम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आणि वंध्यत्त्वाचा धोका वाढतो. तुम्ही स्वतः धूम्रपान करत नसाल पण धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येत असाल तरीदेखील तुमची प्रजनन क्षमता धोक्यात येते. त्यावर परिणाम होतो आणि गर्भधारणा होण्यास अडथळा येतो.
धूम्रपानाचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम :
धूम्रपानाचा महिलांमध्ये प्रजनन क्षमतेवर अनेक प्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतो. सर्वात मोठा परिणाम गर्भधारणेसाठी लागणाऱ्या बीजाच्या गुणवत्तेवर आणि अंडसंख्येवर होतो. धूम्रपानामुळे अंड्यांची वाढ कमी होऊ शकते, पाळी अनियमित होऊ शकते आणि अंडाशयात कमी अंडी तयार होऊ शकतात. या समस्यांमुळे अंडी आणि शुक्राणूंचे मिलन, गर्भ योग्यरित्या तयार होणे आणि गर्भाशयात टिकणे कठीण होऊ शकते. यातूनही एखादी महिला गर्भवती राहिली आणि तिने धूम्रपान सोडले नाही तर गर्भपात, अकाली प्रसूती, बाळाचे कमी वजन किंवा गर्भाशयात बाळाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. जर एखादी महिला आयव्हीएफ ट्रीटमेंट घेत असेल, तर धूम्रपानामुळे अंडाची गुणवत्ता कमी होते, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यताही कमी होऊ शकते.
धूम्रपान पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम:
धूम्रपानामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेला अनेक प्रकारे नुकसान होते. ते शरीराच्या नसा कमकुवत करू शकते, ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. यामुळे शरीर संबंध ठेवणे अडचणीचे होते आणि गर्भधारणेची शक्यताही कमी होते. याशिवाय,धुम्रपानामुळे शुक्राणूंची संख्या, वेग आणि अंडाची गुणवत्ता देखील खराब होते. यामुळे केवळ नैसर्गिकरित्याच नव्हे तर आयव्हीएफद्वारे देखील गर्भधारणा होणे कठीण होते.
आयव्हीएफचा यशाचा दर कोणत्या घटकांवर अवलंबून असतो?
भारतात आयव्हीएफचा यशाचा दर सामान्यतः ५०% ते ६०% दरम्यान आहे. तो प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. हे महिलेच्या वयावर, अंडी आणि शुक्राणू किती चांगले आहेत यावर आणि चांगल्या ट्रीटमेंटवर अवलंबून असते. याशिवाय असतात पुढील कारणे -
स्त्रीचे वय : स्त्रियांमध्ये वाढत्या वयानुसार निसर्गतः बीजाची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते.
प्रेग्नन्सी हिस्ट्री : जर स्त्री आधी गर्भवती राहिली असेल, किंवा गर्भपाताची टेंडसी असेल तरी त्रास होऊ शकतो.
जीवनशैली: दारू, सिगारेट यांसारखी व्यसने सोडली आणि निरोगी जीवनशैली स्वीकारली तर चांगले परिणाम मिळू शकतात.
क्लिनिक आणि डॉक्टरांचा अनुभव: चांगल्या क्लिनिक आणि अनुभवी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास यश मिळण्याची शक्यता वाढू शकते.
ताजे किंवा फ्रोझन बीज: काही प्रकरणांमध्ये, फ्रोझन करून ठेवलेल्या बीजाचा वापर करून चांगले परिणाम मिळू शकतात.
भ्रूणांची संख्या: एकापेक्षा जास्त बीज ट्रान्सफर केले गेले, तर गर्भधारणेची शक्यता वाढते, परंतु जुळे किंवा तीळ होऊ शकते.
शुक्राणूंची गुणवत्ता: जर शुक्राणूंची संख्या, गती आणि आकार योग्य नसेल तर गर्भधारणेत समस्या येऊ शकतात.
गर्भाशयाची स्थिती: मूल होण्यासाठी, गर्भाशयाची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. जर ती गर्भाला अनुकूल नसेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.