Join us

8 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या उलट्या थांबता थांबत नव्हत्या, रिपोर्ट बघून डॉक्टरही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:38 IST

Pregnancy : ज्या महिला गर्भवती आहेत किंवा कुणी प्लॅनिंग करत असेल तर त्यांनी या घटनेबाबत जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

Pregnancy : गर्भधारणा होणं ही प्रत्येक महिलेसाठी सगळ्यात आनंदाची बाब असते. तसेच हा एक असा काळ असतो ज्यात महिलेची खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसांमधील एक चूक महिला आणि तिच्या पोटातील बाळासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या दिवसांमध्ये जराही एखादं वेगळं काही लक्षण दिसलं किंवा वेगळं काही जाणवलं तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला जातो. दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं याचं उदाहरण दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

डॉक्टर ऋचा तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून या घटनेबाबत माहिती दिली आहे. अशात ज्या महिला गर्भवती आहेत किंवा कुणी प्लॅनिंग करत असेल तर त्यांनी या घटनेबाबत जाणून घेणं महत्वाचं ठरतं.

24 वर्षीय गर्भवती महिलेसोबत घडली घटना

डॉक्टर तिवारी यांनी सांगितलं की, एक 24 वर्षीय 8 महिन्यांची गर्भवती महिला सतत उलट्या होत असल्याची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये आली होती. महिलेनं सांगितलं की, तिची भूक कमी झाली, पोटात जडपणा जाणवतो आणि काही दिवसांआधी तिला तापही आला होता. जेव्हा डॉक्टरांनी टेस्ट केल्या तर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण तिला काविळ झाली होती आणि बिलारूबिन लेव्हल खूप जास्त होती.

हेपेटायटिस ई वायरसची लागण

डॉक्टरांनी पुढे हेही सांगितलं की, या महिलेला हेपेटायटिस ई (hepatitis e) वायरसची लागणं झाली होती. गर्भधारणेत हे इन्फेक्शन खूप जास्त घातक ठरू शकतं. धक्कादायक बाब म्हणजे 30 ते 80 टक्के महिलांचा या इन्फेक्शनमुळे मृत्यूही होतो. यात लिव्हर एक्यूट फेलिअर होतं.

कशी होते याची लागण?

व्हिडिओत डॉक्टरांनी या वायरसची लागण कशी होते याबाबत माहिती दिली. डॉक्टर सांगतात की, या वायरसचं इन्फेक्शन दुषित पाणी आणि खराब खाण्यामुळे होतं. गर्भवती महिलेने सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून बाहेरचं जेवण करत होती. हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिची प्रीमच्‍योर डिलिव्हरी झाली. डॉक्‍टरांनी सल्ला दिला की, गर्भवती महिलांनी बाहेरचं अनहेल्दी काहीही खाऊ नये

हेपेटायटिस ई ची लक्षणं

fortishealthcare नुसार, हेपेटायटिस ई ची लागण झाल्यावर याची लक्षणं 2 ते 6 आठवड्यांनंतर दिसू लागतात. कधी कधी रूग्णामध्ये काहीच लक्षणं दिसत नाहीत. पण कधी कधी यात ताप, मळमळ, उलटी, डोळे पिवळे दिसणे, भूक कमी लागणे, थकवा जाणवणे आणि पोटात वेदना होणे अशी लक्षणं दिसतात.

टॅग्स : प्रेग्नंसीहेल्थ टिप्सआरोग्य