lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > असं कसं सिझर झालं? हे कुतुहल आहे की शंका? सिझरची कारणं माहिती आहेत का?

असं कसं सिझर झालं? हे कुतुहल आहे की शंका? सिझरची कारणं माहिती आहेत का?

आजच्या आधुनिक काळातही सिझेरियनबद्दल समज गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच ‘असं कसं झालं सिझर?’ म्हणत डॉक्टरांच्या हेतूवर, आईच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केल्या जातात. हे सर्व खरंतर खूप मनस्ताप देणारं असतं. उर्मिला निंबाळकरच्या पोस्टच्या निमित्तानं सिझेरियनवर चालेल्या उलट सुलट चर्चेकडे वैद्यक शास्त्र कसं बघतं, डॉक्टर सिझर का करतात? या कारणांचा शोध घेतला असता काय दिसतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 08:01 PM2021-08-13T20:01:28+5:302021-08-14T12:15:40+5:30

आजच्या आधुनिक काळातही सिझेरियनबद्दल समज गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच ‘असं कसं झालं सिझर?’ म्हणत डॉक्टरांच्या हेतूवर, आईच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केल्या जातात. हे सर्व खरंतर खूप मनस्ताप देणारं असतं. उर्मिला निंबाळकरच्या पोस्टच्या निमित्तानं सिझेरियनवर चालेल्या उलट सुलट चर्चेकडे वैद्यक शास्त्र कसं बघतं, डॉक्टर सिझर का करतात? या कारणांचा शोध घेतला असता काय दिसतं?

C section delivery...The scientific answers to misconception around c section delivery | असं कसं सिझर झालं? हे कुतुहल आहे की शंका? सिझरची कारणं माहिती आहेत का?

असं कसं सिझर झालं? हे कुतुहल आहे की शंका? सिझरची कारणं माहिती आहेत का?

Highlightsनैसर्गिक प्रसूती ही आईसाठी सुरक्षित नाही , इतर अनेक कारणांमुळे आईला ती शक्य नाही, नैसर्गिक प्रसूती ही बाळासाठी धोकादायक आहे. ही मुख्य कारणं सिझेरियनमागे असतात. सिझेरियन होणं म्हणजे आपण कमी पडलो असं नसून आपल्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा सुरक्षित निर्णय आहे हा विचार स्त्रीनं करणं  महत्त्वाचं आहे. छायाचित्रं- गुगल

 

उर्मिला निंबाळकर विविध हिंदी आणि मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री. भटकंती करायला आवडणारी, त्याचे व्हिडीओ करुन युट्यूबला टाकणारी यूट्युबर, सोशल मीडियात प्रचंड अँक्टिव्ह असलेली उर्मिला सतत चर्चेत असते. उर्मिला सध्या चर्चेत आहे ते तिच्या सिझेरियन बाळांतपणामुळे . तिला अनेकजण ‘तू एवढी अँक्टिव्ह असूनही सिझर कसं म्हणत प्रश्न विचारत आहेत, नाना शंका उपस्थित करत आहेत. यावर तिने वैतागून नाही पण तिच्या सिझेरियनबद्दल इतर लोकांमधे असलेले गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून एक सविस्तर पोस्ट लिहून आपलं सिझर का झालं याची माहिती दिली आहे.

आजच्या आधुनिक काळातही सिझेरियनबद्दल समज गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळेच ‘असं कसं झालं सिझर?’ म्हणत डॉक्टरांच्या हेतूवर, आईच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केल्या जातात. हे सर्व खरंतर खूप मनस्ताप देणारं असतं. उर्मिलाच्या पोस्टच्या निमित्तानं सिझेरियनवर चालेल्या उलट सुलट चर्चेकडे वैद्यक शास्त्र कसं बघतं, डॉक्टर सिझर का करतात? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नाशिकस्थित स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी स्पेशल क्लिनिक चालवणार्‍या डॉ. गौरी करंदीकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली असता त्यांनी सिझरबद्दलच्या सर्व समज गैरसमजांचा आढावा घेऊन डॉक्टर सिझर का करतात याचं शास्त्रीय उत्तर दिलं. त्याबद्दलची ही सविस्तर माहिती.

छायाचित्र- गुगल

सिझर कोणासाठी?

सिझेरियन ही संकल्पना चारशे पाचशे वर्षापूर्वी अस्तित्त्वात आली. असं म्हटलं जातं की ज्युलियस सिझरचा जन्म सिझेरियनद्वारे झाला होता. तेव्हा ही प्रक्रिया अशी होती की आई वाचते की नाही हे माहित नाही पण कसंही करुन बाळाला काढायचं, आई मेली तरी चालेल अशी संकल्पना होती सुरुवातीला. म्हणजे ही सर्जरी जनमानसात अजिबात माहिती नव्हती तेव्हा. त्यामुळे बाळ वाचवण्यासाठी ही प्रक्रिया आहे असा समज होता. मग त्यानंतर हळुहळु वैद्यक शास्त्र प्रगत होत गेलं . आणि फक्त बाळच नाही तर आईला वाचवण्यासाठीही ही सिझर प्रक्रिया आहे हा विचार पुढे आला. सुरुवातीला जेव्हा सिझर केलं जायचं तेव्हा पोटाला टाके वगैरे काही घालायचेच नाही. पोट उघडं ठेवलं जायचं. त्यामुळे शक्यतो बाई मरायचीच त्यानंतर. म्हणून मग सिझर झालं की बाई मरते असा एक समज 300-400 वर्षापूर्वी होता.
पण नंतर वैद्यक शास्त्र जसं प्रगत होत गेलं तशी सिझर ही प्रक्रिया सुरक्षित होत गेली. आता अँण्टिबॉयेटिक्स आहे, टाके घालण्याची पध्दत खूपच बदलली आहे, प्रगत झाली आहे. बाळाला वाचवण्यासाठी सिझर हा सिझर या संकल्पनेचा इतिहास आहे. आणि आता वास्तव म्हणजे बाळासोबत आईचा जीव वाचणंही महत्त्वाचं आहे हे आहे. आई आणि बाळासाठी प्रसूती ही सुरक्षित करणं हा सिझेरियनमागचा मूळ हेतू असतो. नैसर्गिक प्रसूती ही आईसाठी सुरक्षित नाही , इतर अनेक कारणांमुळे आईला ती शक्य नाही, नैसर्गिक प्रसूती ही बाळासाठी धोकादायक आहे. ही मुख्य कारणं सिझेरियनमागे असतात.

छायाचित्र- गुगल

सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो कारण..

पूर्वी कसं होतं की पर्याय नव्हता. एखादी स्त्री ही प्रसूतीसाठी तासनतास कळा द्यायची, आठ दहा तास, कधी दोन दिवस कळा देत राहायची. यादरम्यान कधी कधी बाळ दगावयाचं तर कधी आई. प्रसूतीदरम्यान आईचा होणारा मृत्यूदर कमी करणं आणि बाळ जन्माला येताना ते दगावयाला नको मग यासाठी प्रसूती प्रक्रिया ही सुरक्षित करणं महत्त्वाचं ठरतं. तिथे मग सिझेरियनचा मुद्दा येतो. सिझेरियन करण्यामागे एकच एक कारण नसून अनेक कारणं असतात.

1. बाळ बाहेर येण्याच्यामागे दोन घटक असतात.आईच्या कमरेच्या हाडांचा जो सापळा असतो तो आणि त्यासोबत असणारे सॉफ्ट टिश्युज किंवा स्नायू असतात. दिसायला आईचं वजन कितीही असलं, शरीराचा शेप कसाही असला तरी आतमधे हाडाची जी रचना आहे ती बाळाला बाहेर येण्यास अनुकल नसली किंवा बाळ बाहेर येण्याचा तिच्या कमरेच्या हाडांचा जो भाग आहे तो आणि बाळाचं डोकं त्यामानानं मोठं असलं की तो भाग आणि बाळाचं डोकं मॅच होत नाही. तेव्हा सिझर करावं लागतं.

2. प्रसूतीदरम्यान बाळाची पोझिशन कशी हा मुद्दाही महत्त्वाचा असतो. सर्वसामान्यपणे बाळ बाहेर येण्याचा भाग हा डोकं असायला हवं. दुसरं म्हणजे डोकं हे विशिष्ट प्रकारे पुढे झुकलेलं, मान हनुवटीला लागेल अशी जर बाळाची पोझिशन असेल तर ती नैसर्गिक प्रसूतीसाठी उत्तम असते. पण आईच्या पोटामधे फायब्रॉइडची गाठ आहे किंवा तिच्या कमरेच्या हाडाच्या सापळ्याला काही प्रॉब्लेम आहे किंवा आईची पाठ आहे तिच्या कण्यामधे वाक असेल, ती तिरकी असेल, आईला लहानपणी पोलिओ झालेला असेल किंवा पूर्वी काही फ्रॅक्चर झालेलं असतं मग त्यावेळेला आईच्या कमरेच्या हाडांचा सापळा बरोबर काम करत नाही. म्हणजे ती रचना योग्य नसल्यानं प्रसूतीत अडचणी येतात. सिझर करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.

3. आईचा रक्तदाब अवास्तव वाढून गेलेलं आहे, आईला फिटस आलेल्या असतील किंवा पोटातच खूप रक्तस्त्राव झाला आहे तेव्हा तातडीनं प्रसूती करुन आईला आणि बाळाला वाचवणं गरजेचं होतं तेव्हा सिझेरियन केलं जातं.

4. बाळाची  पोजिशन कशी हे देखील महत्त्वाचं असतं. कधीकधी बाळाचं वजन खूप जास्त असतं, तर कधी कधी बाळाचं डोकं हे आईच्या कमरेच्या हाडाच्य सापळ्यापेक्षा मोठं असतं त्यामुळे सिझर करावं लागतं. पण म्हणून आता त्या स्त्रीची दुसरी प्रसूतीही सिझर करुनच करावी लागेल. कारण तेव्हा कदाचित बाळाचं डोकं छोटंही असू शकेल त्यामुळे नैसर्गिक प्रसूती होवून जाईल. त्यामुळे बाळाचं वजन आणि त्यावेळेस बाळाची असलेली पोझिशन आणि आईच्या हाडांची संरचना कशी यावर प्रसूतीची प्रक्रिया अवलंबून असते.

5. काही केसेसमधे बाळांना आजार असतो.त्यांच्या पोटात हर्निया आहे किंवा त्यांच्या पाठीच्या कण्यामधे दोष असतात. ज्यांच्यावर बाहेर आल्या आल्या शस्त्रक्रिया करणं अत्यावश्यक असतं अशा परिस्थितीतही सिझरचा निर्णय घ्यावा लागतो. किंवा कमी दिवसाचं बाळ आहे पण त्याला तातडीनं बाहेर काढणं गरजेचं होवून जातं त्यावेळेस सिझेरियन केलं जातं.

6. वरील सर्व परिस्थिती जेव्हा प्रसूतीची प्रक्रिया सुरु झालेली नसते तेव्हाची आहे. पण प्रसूती प्रक्रिया सुरु झाल्यानंतर कधी कधी बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नसतो, त्यामुळे बाळाच्या हदयाचे ठोके मंदावतात तेव्हा हे लक्षण असतं की बाळाला आतमधे पाहिजे तसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये अशा बाळांना मतिमंदत्त्व किंवा त्यांच्या सर्वकष वाढीवर परिणाम होवू शकतो ( होतोच असं नाही प्रत्येकवेळेला) त्यामुळे अशा केसमधेही योग्यवेळी निर्णय घ्यावा लागतो. अर्थात अशा परिस्थितीत सिझरचा निर्णय घ्यावाच लागतो असं नाही. तर यालाही एक मॉनिटरिंग सिस्टीम आहे. या प्रक्रियेद्वारे बघितलं जातं बाळाचे ठोके कधी कमी होतायेत, कधी कमी होतायेत , प्रसूती किती लांब आहे , किती वेळ लागणार आहे हे सर्व बघून निर्णय घ्यावा लागतो.

7 . बाळाच्या भोवती गर्भजल असतं. प्रसूती होते तेव्हा ही पाण्याची पिशवी फुटते, त्यात बाळानं शी केलेली असते. सामान्यत: बाळ पोटात असतं तेव्हा बाळ पाणी पितं, लघवी करतं, थोडा श्वासही घेतं, त्याचे हदयाचे ठोके चालू असतात, त्याचा मेंदू चालू असतो पण बाळाची शीची जागा असते ती घट्ट बंद असते. पण जेव्हा ऑक्सिजन कमी पडायला लागला तरच ती उघडते. तेव्हाच बाळ पोटात शी करतं. ती शी जर त्या गर्भजलात दिसली तर याचा अर्थ बाळाला पोटात ऑक्सिजन कमी पडतोय त्यामुळे सिझर करायचा निर्णय घ्यावा लागतो.

8. काही केसेसमधे आईला कळा येताय पण बाळाचं डोकं खाली सरकत नाहीये, म्हणजेच त्याचं डोकं आईच्या कमरेच्या हाडांच्या सापळ्यात बसत नाहीये, ते फिरत नाहीये हे लक्षात येतं. कधी कधी नाळ अडकल्यान बाळाचं डोकं फिरत नाही, तर कधी बाळाला त्याची पोझिशन सापडत नाही , पोझिशन चुकते , कधी कळा योग्य प्रकारे येत नाही त्यामुळे ते बाळ योग्य प्रकारे खाली सरकू शकत नाही, कधी गर्भपिशवीचं तोंडच उघडत नाही ( इंजेक्शन देऊन्ही पाहिजे त्या प्रमाणात उघडत नाही) हे खूप कमी वेळा होतं पण होतं.   अशा परिस्थितीत सिझर करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.प्रसूतीगृहात गेल्यापासून ते प्रसूती होईपर्यंत कोणत्याही वेळेला कोणतीही गोष्ट बदलण्याची शक्यता असते. कोणत्याही मिनिटाला आईची किंवा बाळाची तब्येत बिघडू शकते, त्यासाठी तातडीने प्रयत्न करावे लागतात म्हणून सिझर करावं लागतं.

9. सोनोग्राफीमधे (कलर डॉपलर ) दिसतं की बाळाला आतमधे रक्तपुरवठा होत नाहीये , ऑक्सिजन कमी मिळतोय , अशी बाळं नैसर्गिक प्रसूतीमधून सुरक्षित येवू शकतील का अशी शंका असते , बाळाभोवतीचं गर्भजल कमी झालेलं दिसतं किंवा बाळाची योग्य वाढ होत नसलेली आढळते त्यामुळेही प्रसूती सिझेरियन करुन करावी लागते.

छायाचित्र- गुगल

गैरसमज सिझेरियन झाल्यानंतरचे..

* सिझेरियन या प्रक्रियेबद्दल जसे गैरसमज असतात तसेच सिझेरियन होवून गेल्याच्या टप्प्याबाबतही अनेक गैरसमज असतात. त्यातला महत्त्वाचा गैरसमज म्हणजे डॉक्टरांनी प्रयत्न केला नाही, डॉक्टरांना सिझेरियन करणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं असतं असा समज असतो. पण कोणताही डॉक्टर सिझर करताना मी हे सिझर का करतो/ करते , याची खरंच गरज आहे का हा प्रश्न तो/ ती स्वत:ला आधी विचारतो/विचारते. प्रत्येक प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ हा नैसर्गिक प्रसूतीसाठीच प्रयत्न करत असतो. पण काही केसेसमधे आधी गर्भपात होवून मग गर्भ राहिलाय, टेस्ट्युब बेबीद्वारे गर्भ राहिला आहे अशा परिस्थितीत प्रसूतीच्या पूर्ण प्रक्रियेत जास्त धोका नको म्हणून सिझेरियन केलेलं बरं असं सांगितल जातं. तर कधी कधी बाळ पोटात आडवं असतं, पायाळू असतं त्यावेळेला सिझेरियनद्वारे प्रसूती जास्त सुखकर आणि सुरक्षित होते. त्यामुळे डॉक्टर बिलासाठी सिझेरियन करतात हा गैरसमज आहे.

*  बाईची नैसर्गिक प्रसूती होणं महत्त्वाचं. तिचं सिझर झालं म्हणजे तिच्यात काही कमतरता आहे. तिने तेवढा प्रयत्न केला नाही. स्वत: आयांनाही असं वाटतं की आपलं सिझर झालं म्हणजे आपण चांगली आई नाही आहोत, मी कळा देऊ किंवा सोसू शकले नाही असाही याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. आज हा दृष्टिकोन कमी असला तरी आहे.

* सिझेरियनबद्दलची भीती आजही लोकांमधे आहे. अनेकजण डॉक्टरांना विचारतात की सिझर करताना पाठीत इंजेक्शन दिलं म्हणजे आता माझी पाठ कायमच दुखणार का? खरंतर सिझरचा आणि कायमच्या पाठदुखीचा जराही संबंध नाही. आई आपला फिटनेस कसा ठेवते यावर ते अवलंबून असतं.

*  सिझेरियन झालं म्हणून बायकांना पोटाला मालिश करता येत नाही म्हणून पोट सुटतं हाही एक गैरसमज आहे. खरंतर नऊ महिने पोटात जसा गर्भ वाढतो तसे पोटाचे स्नायू हे ताणले जातात. त्यामुळे तिथल्या स्नायुंना शिथिलता येते. ही शिथिलता मालिश केल्यानं जात नाही. ती हळुहळु , सव्वा महिन्यानंतर ती शिथिलता कमी होते. त्यासाठी खरंतर व्यायाम आणि आहार या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. शिवाय ही शिथिलता किती आली आहे हे बघणंही महत्त्वाचं असतं. अगदी नैसर्गिक प्रसूतीमधेही बाईचं पोट सुटतं. पोट सुटणं न सुटणं हे प्रसूती कशी झाली यावर अजिबात अवलंबून नसतं. आता तर सिझेरियन ही प्रक्रिया इतकी सुरक्षित झाली आहे की डॉक्टर त्या स्त्रीला चौथ्या पाचव्या दिवशी सामान्यपणे हिंडाफिरायला, सामान्यपणे काम करायला, खायला प्यायला सांगतात.फक्त वाकू नये ही एवढी काळजी घेण्यास सांगतात. सिझेरियन झाल्यानंतर पुरेसा रक्तस्त्राव होत नाही. त्यामुळे पोटात घाण राहाते असाही एक गैरसमज आहे. पण खरंतर सिझेरियन झाल्यावर डॉक्टर गर्भपिशवी पूर्ण स्वच्छ करुनच टाके घेतात. त्यामुळे फक्त 5 ते 10 टक्केच रक्तस्त्रावात फरक पडतो. पण म्हणून त्यामुळे पोट सुटलेलं राहातं असं नाही.

*  नैसर्गिक प्रसूतीकडे खूप मोठं यश म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आजही आहे. त्यामुळे प्रसूती ही नॉर्मलच व्हायला हवी हे त्या गरोदर स्त्रीवर बिंबवलं जातं. पण खरंतर तिच्या मनावर तुझी प्रसूती व्यवस्थित होणं, तू सुखरुप असणं, बाळ सुखरुप असणं हे बिंबवणं महत्त्वाचं असतं.

* व्यायाम केला, घरकाम केलं, नऊ महिने अँक्टिव्ह राहिले तरी माझी नैसर्गिक प्रसूती झाली नाही अशी खंत बायका करतात. पण प्रसूती नैसर्गिक होते की सिझेरियन हे अनेक अनेक घटकांवर अवलंबून असते. मग बायका असंही म्हणतात की नैसर्गिक प्रसूतीची खात्रीच नसेल तर व्यायाम करायचाच नाही का? तर हे चुकीचं आहे. गरोदरपणात नियमित व्यायाम केल्यानं श्वास घेण्याची क्षमता प्रत्यक्ष प्रसूतीपर्यत व्यवस्थित वाढलेली असते. प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळेस बाळाला खाली ढकलण्यासाठी जो जोर द्यावा लागतो तेव्हा या श्वासाच्या क्षमतेचा आणि व्यायामानं शरीराला आलेल्या लवचिकतेचा फायदा होत असतो. सिझरमधे भूल द्यावी लागते. त्यामुळे त्यासाठी सुध्दा गरोदरपणात स्त्रीनं व्यायाम केलेला असणं सुरक्षित असतं. यामुळे सिझर झालं तरी त्यानंतरची बाईची रिकव्हरी लवकर होते. त्यामुळे डॉक्टर नेहेमी गरोदर बाईला हेच सांगतात की नैसर्गिक प्रसूतीसाठी आपण पूर्ण प्रयत्न करायचा पण नाहीच झाली नैसर्गिक प्रसूती तर स्वत:ला दोष देत बसायचं नाही.

* सिझेरियन झालं की बाळाला नीट स्तनपान करता येत नाही ही देखील बायकांच्या मनात शंका असते. पण सिझर हे आईचं झालेलं असतं. तिला मदतीसाठी तिथे असलेली माणसं तिला बाळाला स्तनपान करता यावं यासाठी मदत करु शकतात. ही मदत जर व्यवस्थित झाली तर सिझर झालेलं असतानाही प्रसूतीनंतर एका तासाच्या आत आई बाळाला स्तनपान करु शकते. आणि सिझेरियनच्या दुसर्‍या दिवसापासून आई बसून बाळाला दूध पाजू शकते. सिझेरियनमुळे आईला दूध कमी येतं असंही अजिबात नाही. सामान्यपणे प्रसूतीनंतर तिसर्‍या दिवसापासून दूध यायला लागतं. पहिले दोन दिवस चिकाचे दूध येते. ते बाळासाठी महत्त्वाचे असते आणि पुरेसेही असते.

*  सिझेरियन झालं म्हणजे बाईचंच काहीतरी चुकलं हे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बायकांमधेच आहे. खरंतर आज त्या बाईची प्रसूती ही सुरक्षित झालीये ना हे बघणं जास्त गरजेचं आहे.

* पूर्वीपेक्षा आता सिझेरियनचं प्रमाण वाढलं ते कसं? असाही शंकेखोर प्रश्न लोकं विचारतात. त्याला उत्तर म्ह्णजे वैद्यक शास्त्र आधुनिक झालं. पूर्वी बाळाधले दोष कळायचे नाही. पण आता सोनोग्राफी, कलर डॉपलर, मॉनिटरिंग सिस्टिम यामुळे बाळात काही दोष असतील किंवा आईच्या पोटात बाळाला काही त्रास असेल तर ते लवकर कळतं आणि त्यामुळे सिझेरियनचा निर्णय घेता येतो. म्हणून पूर्वी ही सोय नसल्यानं आताच्या तुलनेत तेव्हा सिझेरियनचं प्रमाण कमी होतं इतकंच. तसेच आताची स्त्रियांची जीवनशैली पूर्वीच्या बायकांच्या तुलनेत खूप बैठी झाली आहे. त्यामुळे कमरेच्या हाडाच्या संरचनेत बदल झालेला आहे.

*  पूर्वी कमी वजनाची बाळं असतील तर ती दगावयाचीच.पण आता कमी वजनाची बाळं जगवण्यासाठीही सिझेरियन केलं जातं. कारण आता या अशा बाळांची काळजी घेण्याची व्यवस्थाही खूप प्रगत झाली आहे. त्यामुळेही सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

* आई आणि बाळ सुरक्षित असायला हवं म्हणून जेव्हा सिझेरियनचा निर्णय घेतला जातो तेव्हा तो योग्यच असतो. केवळ काहीही झालं तरी नैसर्गिक प्रसूतीच होवू द्यायची, त्यासाठीच प्रयत्न करायचा हा आग्रह म्हणजे अट्टाहास आहे. त्यासाठी आधी स्वत: बायकांनी सिझेरियनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सिझेरियन होण म्ह्णजे आपण कमी पडलो असं नसून आपल्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला हा सुरक्षित निर्णय आहे हा विचार होणं महत्त्वाचं आहे. तो झाला तर सिझेरियनला चिटकलेले समज गैरसमज कोणत्याही बाईवर, तिच्या मानसिकतेवर परिणाम करु शकणार नाहीत.

Web Title: C section delivery...The scientific answers to misconception around c section delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.