lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं?

मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं?

मुलींना मासिक पाळी लवकर ( early peberty) येण्याचं प्रमाण वाढलं आहे? मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदलही वेळेआधीच होत आहेत त्याची कारणं काय? काय केलं तर अकाली वयात येणं टाळता येऊ शकेल?

By madhuri.pethkar | Published: July 25, 2022 05:28 PM2022-07-25T17:28:32+5:302022-07-25T17:39:59+5:30

मुलींना मासिक पाळी लवकर ( early peberty) येण्याचं प्रमाण वाढलं आहे? मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदलही वेळेआधीच होत आहेत त्याची कारणं काय? काय केलं तर अकाली वयात येणं टाळता येऊ शकेल?

Reasons behind early puberty? | मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं?

मुलींना लवकर पाळी का येते? ६ ते ९ वर्षे वयातच मासिक पाळी सुरु होण्याची काय कारणं?

Highlightsएकूण वजनाच्या ६६ टक्के शरीरात फॅटस वाढले की पाळी येते.वातावरण, पर्यावरण बदल हे ही एक कारण लवकर मासिक पाळीमध्ये दिसून येतं. लवकर मासिक पाळी येण्याचा मुलींच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

मुलींमध्ये मासिक पाळी  येण्याचं विशिष्ट वय असतं. त्याआधी मुलींच्या शरीरात बदल होतात. पण गेल्या काही वर्षात मुलींना मासिक पाळी येण्याचं वय खूपच अलिकडे सरकलं आहे. कोरोना नंतरच्या काळात १० वर्षांच्या आतील मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचं ( early puberty) प्रमाण वाढलं आहे का यावर 'बाई जेरबाई वाडिया' रुग्णालय अभ्यास करत आहे. कोरोनानंतर ६ ते ९ वर्ष वयोगटातील मुलींमध्ये पौगंडावस्था येण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र मुलींना लवकर पाळी येणं ही समस्या काही आताच उद्भवली आहे का? मुलींना पाळी लवकर का येते? पालकांसह मुलींनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? या साऱ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं  नाशिक येथील करंदीकर हाॅस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संचालक, स्त्री रोग तज्ज्ञ          डाॅ. गौरी करंदीकर यांनी दिली आहेत.

Image: Google

मुलींना लवकर पाळी येते कारण..

आपल्या देशात मुलींना पाळी साडे दहा ते अकरा वर्षांच्या दरम्यान येते. जर पाळी दहा वर्षांच्या आत आली तर त्याला पाळी लवकर येणं किंवा 'अर्ली मेनार्की' असं म्हणतात. याला वैद्यकीय भाषेत प्रिकाॅशस प्युबर्टी असंही म्हणतात. प्रिकाॅशस म्हणजे वेळेआधीच पाळी येणं असं म्हणतात. वेळेआधीच मासिक पाळी येण्यामध्येही दोन प्रकार आढळतात. मासिक पाळी येण्याआधी मुलींच्या शरीरात नैसर्गिक असे जैविक बदल होतात. या बदलांना सुरुवात होते ती हार्मोनल बदलांनी. हार्मोन्समध्ये बदल झाल्यानं मुलींमध्ये स्तनांची वाढ होण्यास सुरुवात होते.. सामान्यत: वयाच्या आठव्या वर्षांपासून मुलींची स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते. नंतर काखेत, जननेंद्रियावर केस येतात. नंतर त्यांची उंची वेगानं वाढायला लागते. एखाद दीड वर्ष उंची वाढली की त्यानंतर मासिक पाळी सुरु होते. बदलांचा हा सर्व क्रम पार होवून जर मासिक पाळी आली असेल तर त्याला 'नाॅर्मल प्युबर्टी' असं म्हणतात. पण मुलींच्या शरीरात हे बदल खूप आधी होवून पाळी आली असल्यास याला लवकर पाळी येणं असंच म्हणतात. तर पाळी लवकर येण्याचा दुसरा प्रकार असतो त्यात स्तनांची वाढ होणं, काखेत/ जननेंद्रियावर केस वाढत नाही, उंची वाढत नाही असे कोणतेच बदल होत नाही तरीही मासिक पाळी येते. या प्रकारात मुलींच्या शरीरात एकूणच लय बिघडल्यामुळे ही समस्या निर्माण होते. हे असं होण्यामागे विशिष्ट कारणं आहेत.

१. वैद्यकीय आजारांमुळे मुलींमध्ये पाळी लवकर येते. म्हणजे थायराॅइड हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास,मेंदूमध्ये पिच्युरटी नावाची ग्रंथी असते त्या ग्रंथीत जर गाठ झाली किंवा ट्युमर झाला तरी पाळी लवकर येते. किडनीच्यावर ॲड्रिनल नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीमध्ये जे हार्मोन्स तयार करण्याची जी क्षमता असते त्यात बदल झालेला असतो त्यामुळेही पाळी लवकर येवू शकते. मुलींचं जे अंडाशय आहे, त्याच्याशी निगडित काही आजार असल्यास मासिक पाळी वेळेआधीच येते.

२. बैठ्या जीवनशैलीमुळे येणारा स्थूलपणा आता लहान मुलामुलींमध्ये देखील पाहायला मिळतो. मुलगी जेव्हा वयात येते, तिला पाळी येते तेव्हा तिच्या शरीरात फॅटसचं प्रमाण वाढलेलं असतं . एकूण वजनाच्या ६६ टक्के शरीरात फॅटस वाढले की पाळी येते. म्हणूनच खूप बारीक मुलींना पाळी वेळेत येत नाही. उशिरा येते. शरीरात फॅटसचं हे प्रमाण हे ११ ते १४ या वयोगटात होतं. मात्र स्थूल मुलींमध्ये चरबीचं प्रमाण हे जर त्याआधीच वाढलेलं असेल तर पाळी लवकर येते. सामान्यत: स्थूलता नसली पण शारीरिक हालचाल कमी असली तरी पाळी लवकर येते.

३. वातावरण, पर्यावरण बदल हे ही एक कारण लवकर मासिक पाळीमध्ये दिसून येतं. याला 'एनव्हाॅर्यमेण्टल डिसरप्टर' म्हणजे पर्यावरणीय व्यत्यय आणणारे घटक म्हटलं जातं. हवेतील प्रदूषणामुळे श्वासाबरोबर हवेतले कण जे आत घेतो, प्लॅस्टिकच्या आवरणात असलेले पॅकफूड खातो यातून मायक्रो माॅल्युकूल्स अन्नामध्ये मिसळतात. फळ, भाज्यां यांच्यावर मारलेली किटकनाशकं हे शरीरात जावून हार्मोन्सवर परिणाम करतात त्यामुळेही मासिक पाळी लवकर येते.

४. लहान वयोगटतल्या मुलांमध्ये समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. समाज माध्यमांवरील विषय, त्यातून होणारे मानसिक परिणाम, विचारसरणी यामुळे लवकर वयात येण्याला आणखी पाठबळ मिळतं

Image: Google

लवकर पाळी आल्यास..

मुलींना जर लवकर पाळी आली आहे असं आढळलं तर ही पाळी लवकर आली आहे की शरीरातील ताल लय बिघडून त्या समस्येमुळे पाळी लवकर आली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण लवकर पाळी आल्यानं या मुलींमधली सर्व यंत्रणा लवकर काम करायला लागते. लवकर पाळी आलेल्या मुलींना कमी वयात रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुलींमध्ये पुढे हदयविकाराचा धोका, अर्धांग वायू किंवा ब्रेन स्ट्रोक येणे याचा कमी वयात धोकाही असतो. लवकर पाळी आल्यास मुलींची उंची वाढत नाही. उंची वाढण्यास अडथळे येतात. लवकर मासिक पाळी येण्याचे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मासिक पाळी लवकर आल्यानं या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतका समजूतदारपणा मुलींमध्ये आलेला नसतो. वयाच्या ७-८ व्या वर्षीच पाळी आली तर मुलींमध्ये अल्लडपणा असतो. त्यानुसार याच वयोगटाच्या बाकीच्या मुली मस्त हसत खेळत बागडत असतात आणि आपल्याला मात्र हे असं काहीतरी होतंय हे जाणवून मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. स्वत:च्या बाॅडी इमेजबद्दल प्रश्न निर्माण होतो.

Image: Google

काय काळजी घ्यायला हवी?

१. सर्वात महत्वाचं म्हणजे हे असं होवू नये यासाठी मुलींच्या शारीरिक हालचाली जास्त होतील, त्यासाठी त्या भरपूर खेळतील याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवं. मुलींनी कमीत कमी १ तास तरी रोज खेळायला हवं.

२. मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. पोषणयुक्त घरचा आहार मुलींना मिळणं आवश्यक आहे.

३. अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर कमी करणं. मुलींचा स्क्रीन टाइम कमी करणंही गरजेचं आहे.

४. सोशल मीडिया बघणं, गेमिंग, मोबाइल किंवा कम्प्युटरवर चित्रपट बघणं यामुळे तासनतास कम्प्युटर समोर बसणं होतं. असं झाल्यास कम्प्यूटरच्या ऑरेंज लाइटचा परिणामही हार्मोन्सवर होतो हे अभ्यासात आढळून आलं आहे. त्यामुळे मुलींचा स्क्रीन टाइम कमी करणं गरजेचं आहे.

५. मुलींनी व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे. कारण या वयोगटातल्या मुलींमध्ये झोपेचा अभावही आढळून आलेला आहे. झोपेमध्ये मेंदूत मेलाटोनन नावाचं हार्मोन तयार होतं. ते जर नीट तयार झालं नाही तर हार्मोन्सवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मुली ७-८ तास शांत झोपताय ना याकडे पालकांनी लक्ष देणं आवश्यक आहे.

६. मुलींच्या शरीरात पाळीशी निगडित असलेले बदल जर लवकर घडत असलेले आढळले, पाळी आठव्या नवव्या वर्षीच आलेली असल्यास डाॅक्टरांकडे जावून त्यामागचं कारण समजून घेणं आवश्यक आहे.

(मुलाखत आणि लेखन : माधुरी पेठकर)

Web Title: Reasons behind early puberty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.