Symptoms of Menopause : महिलांना रोज दिवसभर वेगवेगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. घर, ऑफिस आणि मुलं सांभाळावी लागतात. अशात या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना त्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सवडच मिळत नाही. आपल्या माहीत आहेच की, दर महिन्यात महिलांना मासिक पाळी येते, ज्यामुळे असह्य वेदना, चिडचिड, थकवा या गोष्टींचा सामना करावा लागतो. पुढे ४५ - ५० वयानंतर अशीही वेळ येते, जेव्हा मासिक पाळी येणं बंद होतं. ज्याला मेनोपॉज म्हणतात
अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही मेनोपॉजमुळे होणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला. यासंबंधी एक पोस्ट तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितलं की, कशाप्रकारे ती या वेदनेचा सामना करत आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की, मासिक पाळी बंद झाल्यावर महिलांचं जीवन सोपं होतं आणि शरीरात कोणताही बदल होत नाही. पण हा समज चुकीचा आहे. मेनोपॉज महिलांना इमोशनली खूप प्रभावित करतो. तो कसा हे जाणून घेऊ.
काय असतो मेनोपॉज?
मेनोपॉज ही एक अशी स्थिती असते, ज्यात महिलांना मासिक पाळी येणं बंद होतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, सामान्यपणे ९ ते १६ वयादरम्यान मुलींना मासिक पाळी येणं सुरू होतं. तर ४५ ते ५५ वयादरम्यान मेनोपॉज सुरू होतो. हा महिलांमध्ये होणारा एक बायोलॉजिकल बदल असतो. हा कोणता आजार नाही.
मेनोपॉजदरम्यान वागण्यात होतो बदल
डॉक्टर सांगतात की, मेनोपॉज काही कोणता आजार नाही. पण यादरम्यान महिलांच्या हार्मोन्समध्ये अनेक महत्वाचे बदल होतात. खासकरून अॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन कमी होतात. ज्याचा थेट प्रभाव महिलांच्या वागण्यावर पडतो. यादरम्यान महिलांची चिडचिड वाढते आणि राग वाढतो. इतकंच नाही तर त्या सतत तणावात राहतात आणि छोट्या छोट्या गोष्टींचा अधिक विचार करू लागतात.
काय असतात याची लक्षणं
मेनोपॉजच्या लक्षणांमध्ये जॉइंट्समध्ये वेदना, अचानक उष्णता जाणवणे, रात्री घाम येणे, मासिक पाळी चुकणे, व्हजायनल ड्रायनेस, चांगली झोप न लागणे, मूड स्विंग इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. तसेच चिडचिड, केस आणि त्वचेमध्ये कोरडेपणा, वजन वाढणं अशीही लक्षणं दिसतात. मेनोपॉजमध्ये ही सगळी लक्षणं अॅस्ट्रोजन हार्मोनच्या असंतुलनामुळे दिसतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य थेट प्रभावित होतं.
मानसिक आरोग्यावर परिणाम
मेनोपॉज ही स्थिती हार्मोनच्या चढ-उतारामुळे येते, ज्यामुळे मानसिक आरोग्य बरंचसं प्रभावित होतं. सतत मूड स्विंग, चिडचिड, टेंशन, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे, एखाद्या गोष्टीवर फोकस न करू शकणे आणि काही गोष्टी समजण्यात त्रास अशा गोष्टींचाही सामना करावा लागतो.
ज्यामुळे महिलांना रोजची कामं करताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. इतकंच नाही तर मेनोपॉज दरम्यान महिलांना खूप जास्त थकवा जाणवतो आणि त्यांचं वजनही बरंच वाढू लागतं. ज्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या आणखी त्रासलेल्या असतात.
