Esophageal cancer : हार्टबर्न किंवा अॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे, ही समस्या जवळपास सगळ्यांनाच होते. पचन बिघडलं असेल, जास्त मसालेदार काही खाल्लं असेल किंवा चुकीच्या आहारामुळे ही समस्या होते. पण जर ही समस्या वारंवार होत असेल, तर काळजी घेण्याची गरज आहे. कारण सतत होणारी अॅसिडिटी ही कॅन्सरचा संकेत देखील असू शकते.
हार्टबर्न आणि फूड पाइपचा संबंध कसा?
हार्टबर्नची समस्या पोटातील अॅसिड अन्ननलिकेत परत आल्याने होते. अन्ननलिकेची आतील त्वचा पोटाच्या तुलनेत नाजूक असते, त्यामुळे अॅसिडच्या संपर्कात आली की जळजळ जाणवते. जर हा रिफ्लक्स दीर्घकाळ आणि सतत होत राहिला, तर त्याला गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात.
कॅन्सरचा धोका कसा वाढतो?
दीर्घकाळ अॅसिड रिफ्लक्स होत राहिल्यास, अन्ननलिकेतील सेल्सचं नुकसान होतं. शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अन्ननलिकेच्या खालच्या भागातील पेशी बदलण्यास सुरुवात करतं, जेणेकरून त्या अॅसिडला सहन करू शकतील. या सेल्समध्ये होणाऱ्या बदलाला ‘बॅरेट्स इसोफॅगस’ म्हणतात.
ही एक प्री-कॅन्सरस स्टेज मानली जाते. म्हणजेच प्रत्येक बॅरेट्स इसोफॅगस असलेल्या व्यक्तीला कॅन्सर होईल असे नाही, परंतु कॅन्सरचा धोका सामान्य लोकांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढतो.
कुठल्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यावे?
वारंवार हार्टबर्न – आठवड्यात 2–3 वेळांपेक्षा जास्त
गिळताना त्रास – अन्न गळ्यात किंवा छातीत अडकण्यासारखे वाटणे, गिलताना वेदना किंवा टोचणे
वजन कमी होणे – कोणतीही डाएट किंवा व्यायाम न करता
उलटी किंवा विष्ठेमध्ये रक्त
भूक न लागणे आणि रात्री वाढणारा खोकला
आवाज बसणे किंवा जड होणे
हार्टबर्न म्हणजे कॅन्सरच असतो असे नाही. बहुतेक लोकांमध्ये हार्टबर्न ही साधी आणि नियंत्रणात ठेवता येणारी समस्या आहे. पण जर हार्टबर्न दीर्घकाळ, वारंवार आणि गंभीर स्वरूपाचा असेल, आणि त्यासोबत अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे दिसत असतील, तर याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
