वैद्य विनीता बेंडाळे (आयुर्वेदतज्ज्ञ-संचालक द्युम्ना विमेन्स क्लिनिक, पुणे)
पेरीमेनोपॉज- मेनोपॉज या विषयांवर पूर्वी चर्चाही केली जात नव्हती. बायका स्वतःसुद्धा ज्याबद्दल बोलायला संकोच करत आल्या आहेत, आणि ही परिस्थिती केवळ भारतात नाही तर जगभरातली आहे. आता निदान हा विषय आता अधिक उघडपणे बोलला जातोय, प्रकाशझोतात येतोय हे अतिशय महत्त्वाची बाब आहे. फार चांगला बदल आहे. त्यानिमित्तानेच आयुर्वेद या टप्प्यांमध्ये स्त्रियांची मदत कशा प्रकारे करू शकतो हे आज आपण पाहूया.
चिकित्सा करताना आयुर्वेदाचा दृष्टिकोन वैयक्तिक पातळीवर रुग्णांना समजूत घेण्याचा आहे. तोच इथेही लागू आहे फरक असा आहे की पेरी मेनोपॉज,मेनोपॉज हे आजार नसून स्त्री जीवनातले नैसर्गिक टप्पे आहेत. प्रत्येक स्त्रीची पाळी सुरू झाली आहे ती एका विशिष्ट काळानंतर बंद होणार आहे.
ती वयाच्या कितव्या वर्षी बंद होणार आहे, तिला त्या संबंधात कोणकोणती लक्षण निर्माण होऊ शकतात, या वैयक्तिक स्तरावर बदलणाऱ्या गोष्टी आहेत.
म्हणूनच मदतीसाठी दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वैयक्तिक स्तरावर समजून घेणं आवश्यक असतं.
तिची पाळी तिच्या वयाच्या कितव्या वर्षी सुरु झाली, तिला यापूर्वी कोणकोणते आजार होऊन गेले आहेत म्हणजे मेडिकल हिस्टरी, जवळच्या कुटुंबामधील व्यक्तींच्या आजारांची माहिती म्हणजे फॅमिली हिस्टरी तिची पूर्वीची लाईफस्टाइल, सध्याची लाईफस्टाइल आणि त्याबरोबरच तिला आत्ता होणारे त्रास या साऱ्यांची सांगड घालून तिची चिकित्सा योजना करता येते. या सगळ्या आवश्यक माहिती बरोबरच दवाखान्यामध्ये तिची तपासणी म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन हे अर्थातच आवश्यक असते. तसेच त्याबरोबर आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून घेणं हेसुद्धा निश्चितच महत्त्वाचं असत.
डायबिटीस, रक्तदाब वाढणे, यकृताचे आजार, हृदयाचे आजार, या स्वरूपाचे आजार रजोनिवृत्तीच्या या काळात स्त्रियांना नव्याने सुरू होऊ शकतात. आधीपासून हे आजार असतील, तर त्यांची तीव्रता वाढण्याचीही संभावना असते. या काळात निर्माण होणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा, गर्भाशय मुखाचा, अंडाशयाचा कॅन्सर यासारख्या कर्करोगांच निदान वेळेत होणं ही गोष्टही लांबणीवर पडू शकते आणि अर्थातच ते फार धोकादायक ठरू शकतं.
तर अशा प्रकारे दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सर्वांगीण पद्धतीने आणि वैयक्तिक स्तरावर समजून घेऊन तिचा एक चिकित्साचा आराखडा तयार करता येतो.
या मध्ये पोटातून घेण्याची औषधे, रसायन औषध, आयुर्वेदातील काही विशिष्ट चिकित्सा उपक्रम, तिच्या दैनंदिन जीवनक्रमातील म्हणजे लाईफस्टाईल मधील आवश्यक बदल, तसंच तिचं समुपदेशन म्हणजे कौन्सलिंग याचा समावेश होतो. आयुर्वेदातील जे विशिष्ट चिकित्सोपक्रम आहेत त्यातील काही उपक्रमांची थोडक्यात माहिती आपण पाहू.
आयुर्वेदानुसार कोणते उपचार करता येतात?
१. योनी पिचू- औषधी तेलामध्ये भिजवलेले पिचू याचा वापर अत्यंत सोप्या पद्धतीने करता येतो. दवाखान्यामध्ये प्रशिक्षण दिल्यावर घरच्या घरी नियमितपणे सहजरीत्या स्त्रिया याचा वापर करू शकतात.
२. योनी प्रदेशी निर्माण होणारा कोरडेपणा, मूत्र प्रवृत्तीवरचे नियंत्रण कमी होणे व त्या संबंधित इतर तक्रारी यावर प्रभावी अशी ही चिकित्सा योजना आहे.
३. शिरोधारा- मानसिक तणाव, चिडचिड, मूड स्विंग्स, भीती वाटणे, स्मरणशक्ती कमी होणे, लक्ष केंद्रित न करता येणे यासारख्या लक्षणांवर अत्यंत परिणामकारक अशी ही चिकित्सा पद्धती आहे.
४. अभ्यंग - सर्वांगाला तेल लावणे, मसाज करणे, 'अभ्यंग' म्हटलं की आपल्या मनात येतं दिवाळी मधलं अभ्यंग स्नान. वर्षातून एकदा करायचं, आयुर्वेद मात्र काही वेगळं सांगतो. आयुर्वेदामध्ये सांगितला आहे -
अभ्यङ्गंमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा।
दृष्टि प्रसाद पुष्ट्यायु :स्वप्नसुत्वक्त्वदार्ढ्य कृत्।।अ.हृ.सु २/8
'नित्यम्' म्हणजे नेहमी दररोज अभ्यंग करावा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे.
नियमित अभ्यंग केल्याने काय फायदे होतात याचे सविस्तर वर्णनही केलं आहे. ते विचारात घेतल्यावर अभ्यंग हा विशेषतः पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजच्या काळात किती उपयुक्त आहे हे सहज लक्षात येतं. याच प्रत्यंतर हे प्रत्यक्षतः चिकित्सा करताना येतच.
५. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अभ्यंग रोज करण शक्य नसलं तरी आठवड्यातून एकदा दोनदा किंवा जमेल तसे जास्तीत जास्त वेळा करून घेतलं तरी त्याचा उपयोग हा फार मोठ्या स्तरावर होऊ शकतो, होताना दिसतो. कसा ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. वरील श्लोकामध्ये अभ्यंगाने होणाऱ्या उपयोगांचा उल्लेख केला आहे. त्यातील विशेषतः या काळात होणाऱ्या मदतीचा विचार आपण करूया. जरा - म्हणजे वार्धक्य. अभ्यंग नियमित केल्यामुळे वार्धक्य उशिरा येऊ शकते. म्हणजे ज्याला एजिंग प्रोसेस म्हणतात त्यावर काम होतं 'Anti - Ageing' असा याचा उपयोग आहे. श्रम - शारीरिक तसेच मानसिक थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त. या काळामध्ये स्त्रियांमध्ये या दोन्ही लक्षणांची तीव्रता फार असते.
६. वातदोषाचे संतुलन राखणे - पहिला लेखामध्ये आपण हे पाहिले आहे की या काळामध्ये निर्माण होणाऱ्या बदलांवर वातदोषांमधील असंतुलनाचा प्रभाव किती मोठा आहे.
७. स्वप्न - याचा अर्थ शब्दार्थानुसार स्वप्न असा नसून झोपेचा दर्जा चांगला असण आहे. या काळामध्ये झोपेच्या तक्रारींचं स्वरूप हे खूप त्रासदायक असतं. आयुर्वेदामध्येही 'निद्रा ' म्हणजे झोप हे आहाराएवढंच एकंदरीतच मनुष्याच्या आरोग्याची संबंधित अधोरेखित केल आहे. त्यामुळे तेरी perimenopause , menopause या काळात जेव्हा स्त्रियांचे आरोग्य विविध स्तरांवर ढासळू शकते, तेव्हा विशेषतः झोपेच्या दर्जाची काळजी चांगल्या प्रकारे घेणं फार आवश्यक असते.
८. सुत्वक् - म्हणजे त्वचेचे आरोग्य चांगले राहणे, कोरडेपणा कमी होणे, तसेच त्वचेच दार्ढ्य स्किन टायटनिंग इफेक्ट राखणे.
दार्ढ्य- एकंदरीतच शरीरामध्ये स्नायूंचे बल चांगलं राखणे.
९. विशेषतः या काळामध्ये हाडांची झीज होणे, हाडे ठिसूळ होणे हा गंभीर स्वरूपाचा बदल होत असतो. त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग योगासन यांचा प्रभावी उपयोग होतो. तसंच नियमित अभ्यंगाचाही चांगला उपयोग होतो. अभ्यंगाचे हे सगळे फायदे होण्यासाठी नित्य म्हणजे नियमितपणे तो घेण मात्र आवश्यक आहे.
१०. बस्ती - या चिकित्सापद्धतीच महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप मोठ आहे. विशेषतः या काळामधील स्त्रियांसाठी तर ही खूपच उपयुक्त अशी चिकित्सा पद्धती आहे.
वात दोषाचे संतुलन ठेवण्यासाठीची ही उत्तम चिकित्सा असल्याने या काळामध्ये होणाऱ्या बदलांवर ही अत्यंत प्रभावशाली ठरते. हात पाय दुखणे, कंबर दुखणे, गळून गेल्यासारखे वाटणे, मानसिक लक्षणे, त्वचेचा कोरडेपणा ही काही उदाहरणे आहेत. बस्ती चिकित्सचा उपयोग हा शरीरामध्ये विविध स्तरांवर खोलवर होत असतो. हाडांचे आरोग्य राखण्यासाठीही या चिकित्सोपक्रमाचा निर्देश आहे. ही चिकित्सा दवाखान्यात जशी करता येते तसेच मात्रा बस्ती ही घरच्या घरी ही करता येते. त्याची सोपी साधने आहेत. घरी सहजतेने स्त्रिया करतात.
११. या सर्वांबरोबरच तिच्याशी संवाद साधने, तिला समजावून सांगणे समजून घेण आवश्यक असतं. एकदा लक्षण नियंत्रणात आली की हळूहळू औषध कमी करता येतात, दवाखान्यातली चिकित्सा थांबवता येते. वैयक्तिक स्तरावर लागणारा हा काळ वेगवेगळl असला, तरी साधारणपणे दोन-तीन महिने एवढी चिकित्सा पुरेशी ठरू शकते.
१२. दवाखान्यामधील चिकित्सा थांबवली, तरी तिने पुढे तिची काळजी घेण आवश्यक असतं. कारण perimenopause , menopause हे काही आजार नाहीत.
हे स्त्री जीवनातील नैसर्गिक टप्पे आहेत. त्यामुळे जे बदल घडतायेत, घडू शकतात याकडे सजगतेने लक्ष देणे आणि आपल्या दैनंदिन आयुष्यात, लाइफस्टाईल मध्ये सांगितलेले बदल कायम राखण हे निश्चितच आवश्यक आहे. त्यामध्येच आयुर्वेदातील काही उपक्रम हे लाइफस्टाईलचा एक भाग करून आठवड्यातून एक दोन वेळा नियमितपणे करत राहणे हे सुद्धा नक्कीच उपयुक्त आहे.
१३. या सर्वामुळे आयुष्याची प्रत म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहू शकते, राहणे आवश्यक आहे. मेनोपॉज नंतरचा काळ म्हणजे साधारण पन्नाशीनंतर आणि पेरी मेनोपॉज नंतर म्हणजे साधारण चाळिशीनंतरचा उर्वरित आयुष्याच्या दर्जाबद्दल आपण बोलतोय आणि तो चांगलाच असणं आवश्यक आहे.
यासाठी स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी, आपल्या इतर सर्व जबाबदाऱ्यांमध्ये याला सर्वाधिक महत्त्व द्यावं असं आवाहन मी जागतिक स्त्री दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व सख्यांना करते आणि मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते.
