Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menopause > Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक...

Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक...

Perimenopause Menopause : मेनोपॉज क्लिनिक सुुरु झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात २२००० महिलांनी उपचारासाठी धाव घेतली, या त्रासाची कल्पनाच यावरुन यावी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 13:43 IST2026-03-07T13:30:51+5:302026-03-07T13:43:45+5:30

Perimenopause Menopause : मेनोपॉज क्लिनिक सुुरु झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात २२००० महिलांनी उपचारासाठी धाव घेतली, या त्रासाची कल्पनाच यावरुन यावी.

Perimenopause Menopause Maharashtra government Pune menopause clinic, what women suffer, treatment and counsiling | Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक...

Perimenopause Menopause : आता सहन करु नका! महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या सरकारी दवाखान्यातही आहे मेनोपॉज क्लिनिक...

- डॉ. नंदिनी वैद्य भगत, (प्रसुती शास्त्र, स्त्रीरोग तज्ज्ञ)

मानसी (वय - ४२) आयटीमध्ये इंजिनिअर आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे. नियमित प्रमोशन्स होतात. त्यामुळे करिअरमध्ये ती समाधानी आहे. नवराही उच्चपदस्थ आहे. दोन मुलं शाळेत आहेत. हुशार आहेत. त्यांच्या अभ्यासाची काळजी करण्याचंही खरं म्हणजे काही कारण नाही. पण गेले काही दिवस मानसीला अजिबात हुरुप वाटत नाही. आपल्यातला सगळा उत्साह नाहीसा झालाय आणि आपण सतत थकलेल्या आहोत असं तिला जाणवतं. लहानसहान गोष्टींवरुन तिचा मूड जातो. सतत कसलंतरी दडपण असतं. कामावर लक्ष केंद्रित करतानाही त्रास होतो. रात्री झोपेत प्रचंड घाम येतो आणि त्यामुळे झोपही नीट पूर्ण होत नाही. माझ्याकडे आली आणि या सगळ्या लक्षणांचा पाढा तिने वाचला तेव्हा मी तिचे पिरियड्स कधी आले होते याची चौकशी केली. तिने सांगितलेले पिरियड्समधले चढउतार पाहून लक्षातच आलं की मानसीला होणारा हा सगळा त्रास हा पेरीमेनोपॉजल प्रकारात मोडणारा आहे(Perimenopause Menopause).

अदिती (वय ४६) फारशी करिअरिस्ट नाही. तिला एक छोटीशी नोकरी आहे, ती ती जीवापाड मेहनतीने करते. घरची परिस्थिती चांगली सधन आहे. पण नवरा सतत आपल्या व्यवसायाच्या व्यापात… त्यामुळे आई-वडील, सासु-सासऱ्यांची सगळी जबाबदारीही अदितीवरच. योनीमार्गातला कोरडेपणा, सतत खाज सुटणे, लैंगिक संबंधांमधली निरिच्छा, लघवीला जाण्याची घाई, सततची युरीन इन्फेक्शन्स यांनी ती अलिकडे फारच कंटाळली आहे. एरवी हसरी आणि उत्साही असणारी अदिती सध्या सतत थकलेली असते. चेहरा ओढलेला असतो. तिची एक मैत्रीण तिला माझ्याकडे घेऊन आली आणि तिच्या पेरीमेनोपॉजचं निदान झालं.

मानसी असो की अदिती… किंवा तुम्ही, मी, आपण सगळ्याच महिला..

मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती हे दोन्ही टप्पे आपल्याला कुणालाच चुकलेले नाहीत. या टप्प्यावर पोहोचता पोहोचता बऱ्याच महिला काहीशा एकट्या पडतात. जबाबदारीच्या ओझ्याखाली थकतात आणि आपलं दुखणं अंगावर काढायचं, कुणाला कशाला सांगायचं असा विचार करत दुर्लक्ष करत बसतात. विशेष म्हणजे आपल्याकडे अनेक प्रकारच्या आजारांसाठी ‘स्पेशलाईज्ड’ वैद्यकीय सेवा आहेत, पण मेनोपॉज हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण आहे आणि त्या वळणावर तिला मानसिक आधार, समुपदेशन आणि त्याच्याबरोबरीने गरजेपुरते औषधोपचार आवश्यक असू शकतात हा विचार फार कमी वेळा केला जातो. इस्ट्रोजेनच्या एका साध्याशा औषधानेही काही तक्रारी दूर होऊ शकतात, पण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असं आपण नेहमी म्हणतो. ते तसं का याचं अलिकडच्या काळातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील जिल्हा रुग्णालयांमध्ये सुरु केलेली मेनोपॉज क्लिनिक्स. पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी मेनोपॉज क्लिनिकची ओपीडी असते. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्येही अशा ओपीडी आहेत.

वयाच्या चाळीशीपासून पुढे, साधारण ४५ वर्षांवरील वयाच्या महिलांना हळूहळू मेनोपॉजची लक्षणं दिसायला सुरुवात होते. काहींना ही लक्षणं तीव्रपणे जाणवतात. काहींच्या बाबतीत ती सौम्य असतात. कुणाला शारीरिक त्रास होतात तर कुणाला मानसिक आरोग्याचे प्रश्न सतावतात. असे त्रास झाले तर जायचं कुणाकडे, सांगायचं काय असा विचार करुन बहुतेक सगळ्याच जणी गप्प बसतात. काहींना स्वतःवर खूप खर्चिक उपाय करायला लागले तर या विचाराने डॉक्टरांकडे जाणं नको वाटतं. पण महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली ही मेनोपॉज क्लिनिक्स संपूर्ण मोफत आहेत. नुकतंच १४ जानेवारीला महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम सुरु केला आणि महिन्याभरात सुमारे २२,००० महिलांची तपासणी या क्लिनिकमध्ये करण्यात आली आहे. लक्षणांनुसार गरज वाटलीच तर पॅपस्मिअरसारखी कर्करोगाची चाचणीसुद्धा या क्लिनिकमध्ये मोफत केली जाते, यावरुन या क्लिनिकची उपयुक्तता आणि गरज स्पष्ट होते.

मेनोपॉज हा आजार नाही, पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातली ती एक महत्त्वाची आणि नाजूक ‘फेज’ आहे. या काळात स्त्रीला खंबीर मानसिक आणि शारिरीक आधार लागतो. तो देणं आणि त्याबरोबरीने लागतील तसे औषधोपचार करणं, समुपदेशन करणं, तू एकटी नाहीस हा आधार महिलेला देणं हा या मेनोपॉज क्लिनिकमागचा विचार आहे, असं या उपक्रमाचं उद्घाटन करताना आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं होतं. या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला उपचार, समुपदेशनाच्या माध्यमातून मदतीचा हात देताना तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत.

याकडे लक्ष द्या..

वयाच्या साठीत किंवा सत्तरीत असलेल्या स्त्रियांना अधुनमधुन गर्भाशय योनीमार्गातून खाली येण्याचा त्रास होतो. दहापैकी तीन चार महिलांना हा त्रास होऊ शकतो. घाबरुन डॉक्टरांकडेच न जाणे हा यावरचा उपाय नाही. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्याचा उपयोग नक्की होतो.

लाईफस्टाईल सुधारणं आवश्यक

- मेनोपॉजच्या काळात तुमची लाईफस्टाईल चांगली असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी सकस आहार, शांत झोप आणि नियमित व्यायाम हवाच.
- हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन यांचा आहारात समावेश हवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणेही महत्त्वाचे.
- व्यायामाच्या बरोबरीने ध्यान आणि प्राणायाम केला तर त्याचाही खूप उपयोग होतो.

Web Title : पेरीमेनोपॉज़, मेनोपॉज़: अब सहें नहीं! महाराष्ट्र के अस्पतालों में मेनोपॉज़ क्लीनिक

Web Summary : महाराष्ट्र जिला अस्पतालों में मुफ्त मेनोपॉज़ क्लीनिक प्रदान करता है। ये क्लीनिक इस चरण के दौरान शारीरिक और मानसिक स्वास्थ्य को संबोधित करते हैं, परामर्श, मार्गदर्शन और आवश्यक उपचार प्रदान करते हैं, जिसमें कैंसर जांच भी शामिल है। 22,000 से अधिक महिलाओं को पहले ही लाभ हुआ है।

Web Title : Perimenopause, Menopause: Don't Suffer! Menopause Clinics Now in Maharashtra Hospitals

Web Summary : Maharashtra offers free menopause clinics in district hospitals. These clinics address physical and mental health during this phase, offering consultations, counseling, and necessary treatments, including cancer screenings. Over 22,000 women have already benefited from this initiative, providing crucial support during this life stage.