- सायली कुलकर्णी (सीनिअर सायकॉलॉजिस्ट,पुणे)
मेनोपॉज हा फक्त एक जैविक अर्थातच शारीरिक बदलाचा टप्पा नाही; तो भावनिक संक्रमणाचाही महत्त्वपूर्ण काळ असतो. कोणत्याही बदलातून आपण स्थैर्याकडे कसे जातो हा खरा तर यामागील महत्त्वपूर्ण भाग. मी सायकॉलॉजिस्ट म्हणून एक गोष्ट कायम अनुभवते, या काळात बऱ्याचशा स्त्रिया स्वतः बाबत अतिशय कठोर होतात. “मी एवढी चिडचिडी का झाले?” “मी आधीसारखी ठाम का नाही?” अशा विचारांनी त्या स्वतःलाच दोष देतात. बदल समजून घेण्याऐवजी त्या स्वतःला अपुरी, कमी किंवा चुकलेली समजू लागतात(perimenopause menopause).
या काळात आपल्याच मनात, विचारांशी जोरदार संघर्ष होत असतो. संघर्ष म्हणजे, मनात एक विचार येतो आणि आपण त्याच्याशी आपण भांडायला लागतो. जसं की, “मी आधीसारखी राहिले नाही.” त्यानंतर लगेच, “नाही नाही, मी मजबूत आहे.” पुन्हा “पण खरंच मी बदलले आहे.” असे जणू काही संघर्ष चक्र चालू असते. ही अंतर्गत ओढाताण मेंदूला अधिक थकवते. विचारांना दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते अधिक जोरात परत येतात, बाउन्स बॅक होतात. यालाच मानसशास्त्रात रिबाऊंड इफेक्ट म्हणतात.
मेनोपॉजबाबत काही प्रमाणात स्त्रियांमध्ये नक्कीच अवेअरनेस आहे. त्यासाठी अनेक जणी आहारात बदल, व्यायाम योगासने यांसारख्या सवयींमध्ये बदल करतात. ही पाऊले नक्कीच स्तुत्य आहेत. पण मनातील संघर्षाचे काय? तुमच्या भावनांचे काय? म्हणूनच या टप्प्यात “इमोशनल रिस्ट्रक्चरिंग” म्हणजेच भावनिक आणि मानसिक पुनर्रचना करण्याची अत्यावश्यक असते.
मानसिक पुनर्रचना नेमकी कशी करायची?
१. आपल्या भावनांची नियमित नोंद ठेवा :- दररोज ५–७ मिनिटे स्वतःच्या भावनांकडे लक्ष द्या. त्या चक्क लिहून काढा. आज काय जास्त जाणवलं? यामुळे मेंदूचा तर्कशक्तीचा भाग सक्रिय होतो आणि भावनिक प्रतिक्रिया कमी तीव्र होतात. भावनांना शब्द मिळाले की गोंधळाला दिशा मिळते. संघर्षाचे रूपांतर संवादामध्ये होते.
२. झोपेची शिस्त पाळा :- मेनोपॉजमध्ये झोपेची गुणवत्ता कमी होते आणि झोपेअभावी चिडचिड वाढते. नियमित झोपेची वेळ, झोपण्याआधी स्क्रीन टाळणं, खोल श्वसन या सवयी मेंदूला “सुरक्षित” असल्याचा सिग्नल देतात. झोप सुधारली की भावनिक स्थैर्य ३०–४०% वाढताना दिसतं.
३. नकारात्मक विचारांचं काय? :- “मी आधीसारखी नाही” “मी कमी पडते” असे विचार आले की थांबा. स्वतःला विचारा, हा विचार तथ्य आहे की भीती? विचारांशी संवाद साधल्याने ते अधिक बळकट होतात. आपलेच नकारात्मक विचार त्रयस्थपणे बघण्याची सवय लावा.
४. स्पष्ट संवादाची सवय :- भावना व्यक्त करताना दोषारोपणा ऐवजी अनुभव मांडा. उदा. “मला सध्या जास्त संवेदनशील वाटतंय.” यामुळे नात्यांमध्ये सुरक्षितता निर्माण होते आणि गैरसमज कमी होतात. किरकिर तर टाळाच पण त्या बरोबरीने आपल्या मनातील गोष्टी आपोआप इतरांना समजतील हा ही दुराग्रह चुकीचाच ना!
५. मर्यादा आखायला शिका :- मेनोपॉज हा स्वतःच्या ऊर्जेचा पुनर्विचार करण्याचा काळ आहे. सगळ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न थकवणारा ठरतो. “आवश्यक तिथे नाही” म्हणणं म्हणजे स्वार्थ नाही; ती भावनिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक अशी बाब आहे.
६. क्रिएटिव्हिटीला वाव द्या :- कला, लेखन, बागकाम, संगीत अशा सृजनात्मक क्रिया मेंदूतील रिवाॅर्ड सिस्टि सक्रिय करतात. यामुळे आत्मसंतोष आणि सकारात्मक ऊर्जा वाढते.
७. सामाजिक आधार जपा :- मैत्रिणींसोबत संवाद, सपोर्ट ग्रुप्स किंवा कुटुंबीयांशी मोकळेपणाने बोला. भावनिक आधाराचं जाळं मजबूत ठेवलं की मानसिक ताण कमी होतो. एकटेपणा भावनिक अस्थिरता वाढवतो; पण आपलेपणाने केलेला संवाद भावनिक स्थैर्य देतो.
८. व्यावसायिक मदत घ्या :- नैराश्य, तीव्र चिंता किंवा झोपेचा गंभीर त्रास असल्यास मानसशास्त्रीय समुपदेशन अत्यंत प्रभावी ठरू शकतं. मदत मागणं म्हणजे कमजोरी नाही. ती स्वतःने स्वतःच्या भावनांची घेतलेली जबाबदारी आहे.
९. लक्षात घ्या, मेनोपॉज हा आयुष्याचा उतार नाही. तो नव्या संतुलनाची सुरुवात आहे. संघर्ष थांबवून संवाद सुरू झाला की मन हलकं होतं. पुनर्रचना स्वीकारली की आत्मविश्वास परत मिळतो. लक्षात घ्या, शरीर बदलतं. मन बदलतं. पण या बदलांमध्ये एक अधिक सजग, अधिक प्रगल्भ स्त्री आकार घेत असते. म्हणूनच मेनोपॉज हा शेवट नाही तर तो एक भावनिक पुनर्जन्म आहे.
(सीनियर सायकॉलॉजिस्ट बावधन, पुणे 83299 63972)
Web Summary : Perimenopause is an emotional transition, not just a biological one. Stop self-criticism; instead, restructure emotionally. Track feelings, prioritize sleep, challenge negative thoughts, communicate clearly, set boundaries, be creative, nurture social connections, and seek professional help if needed. Embrace this phase for emotional rebirth.
Web Summary : पेरीमेनोपॉज़ सिर्फ़ जैविक नहीं, भावनात्मक बदलाव है। आत्म-आलोचना छोड़ें, भावनात्मक रूप से पुनर्निर्माण करें। भावनाएँ लिखें, नींद को प्राथमिकता दें, नकारात्मक विचारों को चुनौती दें, स्पष्ट संवाद करें, सीमाएँ तय करें, रचनात्मक बनें, सामाजिक संबंध बढ़ाएँ, ज़रूरत हो तो मदद लें। भावनात्मक पुनर्जन्म के लिए इस चरण को अपनाएँ।