योगिता आपटे, मानसशास्त्र आणि संपुदेशक
रूपाली : हाय सुजाता! किती दिवसांनी भेटतेयस, कशी आहेस?
सुजाता : ठीकच म्हणायचं तसं! रोज नवीन त्रासाला कंटाळलेय खरं तर. कधी पायात गोळे येतायत तर कधी कंबरच दुखतेय. एक दिवस खूप घाम येऊन जीव घाबरतोय तर दुसऱ्या दिवशी रडूच येतंय. मला माझंच काही समजेनासं झालंय गं.
रूपाली : अग, मग चांगल्या डॉक्टरला दाखव ना.
सुजाता : त्याचाही कंटाळा आलाय आता. सतत नवीन तक्रारीसाठी नवीन डॉक्टर.. तपासण्याही नॉर्मल आहेत गं पण त्रास काही जात नाही.
रूपाली : वाढतं वय म्हणायचं की काय आत्ताच! जेमतेम ४५ वर्षांची आहेस न तू...
४० ते ५० वयातील कोणत्याही दोन स्त्रियांमध्ये होतो असा संवाद. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हे या सगळ्याचे कॉमन कारण. खरं तर स्त्रीचे शरीर लहानपणापासून अनेक बदलांना सामोरे गेलेले असते. ऋतुप्राप्ती, गर्भधारणा, स्तनदा अवस्था यामध्येही खूप बदल होतात, तसाच पुढचा टप्पा म्हणजे मेनोपॉज.(Perimenopause)
मेनोपॉज म्हणजे नियमित येणारी पाळी पूर्णतः बंद होणे, पण हे अचानक घडत नाही.(Self Care For Women) जवळपास ५-७ वर्षे आधीपासून शरीरात हळूहळू बदल व्हायला लागतात. हार्मोन्सची निर्मिती प्रक्रिया मंदावत जाते आणि काही काळानंतर पाळी पूर्ण थांबते. शरीरात तर खूप गोष्टी बदलतातच पण स्त्रीच्या मनावरही या अवस्थेचा खूप परिणाम होत असतो. पाळीच्या आधी २-३ दिवस होणारी चिडचिड, उगीच हळवे होणे जवळपास प्रत्येकीनेच अनुभवलेले असते. त्याचेही कारण हे हार्मोन्स!
दर महिन्याला ४ वेळा होणारे हार्मोन्सचे चढउतार अनुभवणारी स्त्री, मेनोपॉजच्या वेळेस मात्र भांबावून जाते. याचे मुख्य कारण म्हणजे भावनांची अनिश्चितता किंवा मूड स्विंग्स (Mood Swings), स्वतःचे स्वतःलाही सांगता येणे अवघड होणे की मला काय वाटतंय आणि का वाटतंय.
या काळात गरजेची असणारी वैद्यकीय मदत आता महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. इतकी या विषयाची व्याप्ती मोठी आहे. सांसारिक-व्यावसायिक जबाबदाऱ्या सहज पेलणाऱ्या महिलेला चाळीशीनंतर अचानक त्याच गोष्टी अवघड वाटायला लागतात. आत्मविश्वास कमी वाटायला लागतो. मुलेही मोठी-स्वतंत्र झाल्यामुळे आलेले रिकामपण जास्तच खुपायला लागते. पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्येही मन रमत नाही. आपले वय वाढत जातंय याची जाणीव सतत व्हायला लागते. बाह्य सौंदर्य/शरीरयष्टीतही बदल होतात, वजन वाढायला लागते, केस विरळ/पांढरे व्हायला लागतात. आपले तारुण्य संपतंय त्याचबरोबर आपल्यावरचे जोडीदाराचे प्रेमही आटतंय की काय अशी शंका येऊन अजूनच दुःख होणे. उंबरठ्यावर येऊन ठेपलेले म्हातारपण/मध्यमवय/प्रौढपणा घाबरवायला लागतो. मन सैरभैर होते.
मग अशा अवस्थेतून बाहेर कसं पडायचं? याला समोर कसं जाताना काय करायला हवे?
सर्वप्रथम यातून बाहेर पडणं ही आपली, स्वतःची जबाबदारी आहे याचे भान आपल्याला हवे. आतापर्यंतच्या बदलांना जसे स्वीकारले तसेच हा अतिशय नैसर्गिक बदलही हसत-खेळत स्वीकारायला हवा. सतत तरुण-सुंदर-आकर्षक दिसणे हे शक्यही नाही आणि गरजेचे तर त्याहून नाही!
स्वतःच्या बदलत्या रूपावर मनापासून प्रेम केले तर हा आंतरिक संघर्ष कमी होऊ शकतो. इतरांशी तुलना करणे मानसिक स्वास्थ्यासाठी कधीही हानिकारकच असते पण या काळात त्याने जास्तच त्रास होतो. प्रत्येक व्यक्तीचे शरीर, मन, आयुष्यातील चढउतार, समस्या आणि जमेच्या बाजू वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुलना करणे कटाक्षाने टाळायला हवे. आपली आपले व्यक्ती म्हणून असलेले मूल्य (Value) आपल्या दिसण्यापेक्षा, क्षमतेपेक्षा कैकपटीने जास्त असते हे जरूर लक्षात ठेवायला हवे.
तसंच आपल्याला काय होतंय किंवा आपली अपेक्षा काय आहे हे घरातल्यांनी न सांगता समजून घ्यायला हवं ही विचार अवास्तव अपेक्षा अवास्तव ठरते. मोकळ्या मनाने मागितलेली मदत जास्त उपयोगी ठरेल. फक्त आपल्याला अशा त्रासाचे भांडवल करणे मात्र अतिशय चुकीचे ठरते. यापूर्वीही अनेक स्त्रीला या स्थित्यंतराचा सामना करावा लागलाच होता, यापुढेही लागेल. म्हणजेच मी एकटीच यातून जातेय अशी अवाजवी सहानुभूती टाळायला हवी.
स्वतःच्या शरीराची नीट काळजी घेतली तर बरेचसे मानसिक त्रासही आवाक्यात राहतात. शेवटी शरीर आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू, नाही का! रजोनिवृत्तीपूर्वीपासूनच काही सवयी स्वतःला लावल्या तर त्याचा निश्चितच उपयोग होतो. नियमितपणे व्यायाम हा अतिशय आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने वजन उचलल्यामुळे (Weight training) स्नायूंची क्षमता टिकून राहते. आठवड्यातून ५ ते ६ वेळा ४५-५० मिनिटे व्यायामाला पर्याय नाही!
त्याबरोबरच सकस-ताजे अन्न खाणे, फळे-सुकामेवा खाण्यानेही फायदा होतो. स्वतःच्या बदलत्या गरजांची माहिती करून घेऊन आहारात बदल केला तर हे स्थित्यंतर सोपे होते.मानसिक ताणतणावांचे वेळेवर निराकरण करायला हवे. त्यासाठी मैत्रिणींशी बोलणे, एखादा छंद जोपासणे, मनोरंजनासाठी वेळ काढणे गरजेचे. एक मात्र निश्चित, हे करताना मनातील भावना अपराधपणाची मुळीच नको, स्वतःच्या शरीराची-मनाची देखभाल करणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, खरं तर कर्तव्यच. इतरांची, मुलांची काळजी घेतो तशी स्वतःची घेऊन तर बघा! मनावर इतका छान परिणाम होतो.
सामाजिक संबंधांकडे लक्ष देण्याचीही ही योग्य वेळ असते. मुले मोठी झालेली असतात, थोडा मोकळा वेळ मिळू शकतो अशा वेळेस स्वतःच्या पलीकडे इतरांसाठी काही केल्यास अतिशय फायदा होतो. समाजातील गरजू घटकांसाठी थोडंसं जरी काम केलं, तरी त्याने मनाला प्रसन्नता-समाधान मिळते.
आयुष्यातील एकच शाश्वत गोष्ट म्हणजे बदल! मेनोपॉज देखील असाच एक टप्पा आहे, त्याचा बाऊ न करता नियोजन केल्यास या अवस्थेतून आपण अलगदपणे बाहेर पडू शकतो. या नैसर्गिक स्थित्यंतरातून जाणाऱ्या सगळ्या मैत्रिणींना खूप शुभेच्छा!
डॉ. योगिता आपटे
PhD । मानसशास्त्र
समुपदेशिका, नाशिक.
yogeeta.apte@gmail.com
