Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menopause > Menopause : किती ओव्हर रिॲक्ट करतेस म्हणून घरातले नावं ठेवतात, मन नाही थाऱ्यावर करायचं काय?

Menopause : किती ओव्हर रिॲक्ट करतेस म्हणून घरातले नावं ठेवतात, मन नाही थाऱ्यावर करायचं काय?

Perimenopause and Menopause : मानसिक स्वास्थ्य या काळात गडबडते, प्रश्न पडतात आपण नक्की काय आहोत, काय कमावलं आयुष्यभर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 16:41 IST2026-03-05T16:40:53+5:302026-03-05T16:41:57+5:30

Perimenopause and Menopause : मानसिक स्वास्थ्य या काळात गडबडते, प्रश्न पडतात आपण नक्की काय आहोत, काय कमावलं आयुष्यभर?

perimenopause and menopause psychological help and how to take care of mental health | Menopause : किती ओव्हर रिॲक्ट करतेस म्हणून घरातले नावं ठेवतात, मन नाही थाऱ्यावर करायचं काय?

Menopause : किती ओव्हर रिॲक्ट करतेस म्हणून घरातले नावं ठेवतात, मन नाही थाऱ्यावर करायचं काय?

Highlightsमेनोपॉज म्हणजे सलग १२ महिने पाळी न येणं. पण त्याआधीचा काळ, म्हणजे पेरिमेनोपॉज. हा काळ बरेचदा अधिक अस्थिर असतो.

सायली कुलकर्णी (सिनिअर सायकॉलॉजिस्ट, पुणे)

४५ वर्षांची संध्या माझ्या क्लिनिकमध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळलेला भाव दिसत होता. तिच्या गायनॅकॉलॉजिस्टने तिला सांगितलं होतं, “हार्मोनल बदल सुरू आहेत. पण एकदा सायकॉलॉजिस्टलाही भेटा.” संध्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली आणि काही मिनिटांतच तिचं रडू अनावर झालं. “मॅडम, मी पूर्वीसारखी राहिलेच नाही. चटकन राग येतो. रडू येतं. झोप लागत नाही. छोट्या छोट्या गोष्टी मनात खूप काळ राहतात. घरचे म्हणतात ‘तू सध्या जरा जास्तच रिॲक्ट करतेस.’ ते वाक्य मला खूप लागतं. मी अशी नव्हते हो…”
-मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होते. माझ्यासमोर भावनिक कमजोरी नव्हती. माझ्यासमोर होता मेनोपॉजच्या संक्रमणकाळातील मानसिक प्रवास. संध्यासारख्या या वयातील अनेक स्त्रियांशी बोलत असताना एक नक्की लक्षात येते की, त्या बदललेल्या नसतात तर त्या एका खोल बदलातून जात असतात.

 

पेरिमेनोपॉज शरीरात बदल, पण मनावर परिणाम?

मेनोपॉज म्हणजे सलग १२ महिने पाळी न येणं. पण त्याआधीचा काळ, म्हणजे पेरिमेनोपॉज. हा काळ बरेचदा अधिक अस्थिर असतो.
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होत राहते. हे हार्मोन्स मेंदूमधील सेरोटोनिन आणि डोपामिनवर परिणाम करतात. लक्षात घ्या सेरेटोनिन आणि डोपामाईन हे हार्मोन्स मूड आणि भावनिक स्थिरता नियंत्रित करतात. म्हणूनच कही त्रास होतात.
अचानक चिडचिड, अनामिक अस्वस्थता, झोप न लागणं, रडू येणं, स्वतःवर संशय हे सगळे बदल स्त्रियांना जाणवू लागतात. हे “स्वभाव बदल” नसून जैव-मानसिक प्रतिक्रिया असतात.

पेरिमेनोपॉज मधील मानसिक प्रवासाचे तीन टप्पे

पेरिमेनोपॉज हा प्रवास प्रत्येक स्त्रीसाठी नक्कीच वेगळा असतो, पण मानसशास्त्रीय समुपदेशनाच्या अनुभवातून याचे तीन प्रमुख स्तर स्पष्ट दिसतात.

१. भावनिक अस्थिरतेचा टप्पा (Emotional Dysregulation Phase)
हा पहिला आणि सर्वात गोंधळाचा टप्पा असतो. या टप्प्यात बरेचदा स्त्रिया स्वतःमध्ये होणारा बदल ओळखू शकत नाहीत. “माझी एवढी चिडचिड का होते.” “मी इतकी हळवी का झाले आहे.” असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे असतात.
हार्मोनल चढउतारांमुळे मेंदूतील भावनांचं नियमन करणाऱ्या भागांवर परिणाम होतो.  इमोशन रेग्युलेशन कमी प्रभावी होतं. परिणामतः बऱ्याचशा स्त्रियांना या काळात लहान प्रसंग गंभीर वाटतात, त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र होतात, अपराधीपणा वाढतो, आत्मविश्वास कमी होतो. मात्र या टप्प्यात स्त्रीला सर्वात जास्त गरज असते ती तिच्या भावनांना मान्यता (Validation) देण्याची!

 

२. ओळख बदलाचा टप्पा (Identity Re-definition Phase)
हा अधिक खोल टप्पा आहे. ४५–५० नंतर एकंदरीतच जीवनात मोठे बदल घडतात. जसे की, मुलं स्वतंत्र होतात. नोकरी स्थिरावलेली असते. पालक वृद्ध होत असतात. शारीरिक ऊर्जा कमी होत असल्याची जाणीव होते. या काळात “आता माझी भूमिका काय?” “माझं पुढचं आयुष्य कसं असेल?” असे अस्तित्वात्मक (existential) प्रश्न स्त्रियांच्या समोर उभे असतात.
हा टप्पा मिड लाइफ ट्रान्झिशन म्हणून ओळखला जातो. इथे स्त्री स्वतःच्या ओळखीचं पुनर्मूल्यांकन करते. जर तिची ओळख फक्त “आई” किंवा “काळजीवाहू” म्हणूनच निर्माण झाली असेल, तर मुलं मोठी झाल्यावर ती रिकामी वाटू शकते. पण खरंतर हे अपयश म्हणून घ्यायचे, आयुष्यातील फोलपणा म्हणून घ्यायचा की स्वतःला नवीन शोधण्याची संधी म्हणून घ्यायचा हा दृष्टिकोनच महत्त्वाचा ठरतो.

 

३. जीवनाचा आढावा आणि भावनिक टप्पा (Life Review & Emotional Integration Phase)
हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात अनेक दडपलेल्या भावना वर येतात. जुन्या आठवणी, अपूर्ण स्वप्नं, न बोललेले संवाद, स्वतःसाठी न घेतलेले निर्णय “मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले. आता माझ्यासाठी काय?” असे विचार मनामध्ये रेंगाळत असतात. हा टप्पा Erik Erikson यांच्या विकास सिद्धांतानुसार
“Generativity vs. Stagnation” आणि पुढील “Integrity vs. Despair” या अवस्थांशी संबंधित आहे. इथे स्त्री स्वतःच्या आयुष्याचा आढावा घेते. जर तिला समाधान मिळालं तर अंतर्गत शांतता वाढते. जर अपूर्णता जास्त जाणवली तर निराशा वाढू शकते. इथे मानसशास्त्रीय समुपदेशन महत्त्वाची भूमिका करते. स्वीकृती (Acceptance), क्षमा (Forgiveness) आणि स्वतःसाठी नवे ध्येय यात्रिसूत्री द्वारे स्त्रीला आधार दिला जातो.

मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या आयुष्याचा शेवट नाही.
तो तिच्या भावनिक पुनर्जन्माचा महत्वपूर्ण टप्पा असू शकतो. पण या पुनर्जन्मासाठी आवश्यक आहे. समजून घेणारा जोडीदार, संवेदनशील कुटुंब आणि सुरक्षित समुपदेशनाची जागा. संध्यासारख्या अनेक स्त्रिया आज या संक्रमणातून जात आहेत. प्रश्न एवढाच आहे. आपण त्यांना “रिॲक्ट” म्हणणार आहोत… की “बदलत्या प्रवासात” सोबत उभं राहणार आहोत?

(सीनियर सायकॉलॉजिस्ट, बावधन, पुणे 83299 63972)

 

Web Title: perimenopause and menopause psychological help and how to take care of mental health