डॉ. प्रिया प्रभू (सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज) “डॉक्टर, मला गरम लाटा जाणवतात, झोप लागत नाही, चिडचिड होते… पण हार्मोन थेरपी घ्यायला मला भीती वाटते. कॅन्सर होतो म्हणतात ना?” हा प्रश्न मी वारंवार ऐकते. आणि प्रत्येक वेळी मला जाणवतं समस्या लक्षणांची कमी, आणि गैरसमजांची जास्त आहे. आज आपण पेरिमेनोपॉज आणि HRT (Hormone Replacement Therapy) बद्दल मनात भीती न ठेवता वैज्ञानिक आधाराने बोलूया.
पेरिमेनोपॉज म्हणजे आजार नाही — पण जाणवणारा त्रास १००% खरा असतो. ४०–५० वयोगटात अनेक स्त्रियांना शरीरात बदल जाणवू लागतात. पाळी अनियमित होते. कधी दोन महिन्यांनी, कधी पंधरा दिवसांनी. रक्तस्राव जास्त किंवा खूपच कमी. अचानक गरम लाटा येतात. रात्री घाम येतो. झोप पूर्ण होत नाही. दुसऱ्या दिवशी डोके जड, मूड चिडचिडा. काही स्त्रिया सांगतात, “मला स्वतःचं मन ओळखू येत नाही.” काहींना चिंता वाढते. काहींना निराशा. काहींना लैंगिक आयुष्यात बदल जाणवतो. हे सगळं “मनाचा कमकुवतपणा” नाही. हे शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोन्समधील चढ-उतारामुळे घडत असतं. पेरिमेनोपॉज हा आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. पण “नैसर्गिक” म्हणजे “सहन करावाच लागेल” असा नियम नाही.
HRT बद्दल भीती कुठून आली? २००२ साली अमेरिकेत एक मोठा अभ्यास प्रसिद्ध झाला. Women’s Health Initiative. त्या अभ्यासात काही विशिष्ट प्रकारच्या संयुक्त हार्मोन थेरपीमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका थोडासा वाढू शकतो असे निष्कर्ष नोंदवले गेले. माध्यमांनी मात्र मथळा दिला — “हार्मोन थेरपीमुळे कॅन्सर!” यामुळे लाखो स्त्रियांनी अचानक औषधं बंद केली. भीती इतकी पसरली की HRT म्हणजे धोकादायक असंच समजलं जाऊ लागलं. यानंतर अमेरिकेतील औषधनियामक संस्था US Food and Drug Administration (US FDA) यांनी काही हार्मोन औषधांवर “Black Box Warning” दिली.
“ब्लॅक बॉक्स वॉर्निंग” म्हणजे काय? हा औषधावरील सर्वात गंभीर प्रकारचा इशारा असतो. औषधाच्या पॅकेटवर काळ्या चौकटीत सूचना दिली जाते की काही परिस्थितीत हे औषध गंभीर धोका निर्माण करू शकतं. याचा अर्थ असा नसतो की औषध सर्वांसाठी धोकादायक आहे. याचा अर्थ ते औषध योग्य रुग्ण, योग्य वय, योग्य प्रमाण आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याने वापरलं पाहिजे. मात्र सर्वांनी याचा अर्थ “हे औषध सर्वांसाठी धोकादायक आहे” असा घेतला.
नवे अभ्यास काय म्हणतात? गेल्या २० वर्षांत याविषयी अधिक संशोधन झालं. आता आपल्याला अधिक स्पष्ट चित्र दिसतं. ६० वर्षांखालील आणि मेनोपॉजनंतर १० वर्षांच्या आत असलेल्या निरोगी स्त्रियांमध्ये योग्य प्रकारे निवडलेली HRT तुलनेने सुरक्षित आहे, असा निष्कर्ष अनेक अभ्यासांनी दर्शवला आहे. धोका व्यक्तीनुसार बदलतो. सर्व प्रकारच्या HRT सारख्या नसतात. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये US FDA ने काही लो-डोस योनी इस्ट्रोजेन औषधांवरील कठोर “ब्लॅक बॉक्स” इशारा काढून टाकला किंवा सुधारित केला. कारण नव्या वैज्ञानिक पुराव्यांनुसार त्या प्रकारच्या स्थानिक उपचारांमुळे पूर्वी भीती वाटत होती तितका प्रणालीगत धोका दिसत नाही. आता २०२५ मध्ये इतरही लो डोस प्रणालीवरील इशारा काढला आहे. याचा अर्थ विज्ञान बदललं नाही; आपली माहिती अधिक अद्ययावत झाली.
मग HRT नेमकी काय करते? पेरिमेनोपॉजमध्ये कमी होत असलेले हार्मोन्स योग्य प्रमाणात बाहेरून दिले जातात. पण हे एकच औषध नसतं आणि देण्याचे मार्गदेखील वेगळे असू शकतात.ज्यांचे गर्भाशय आहे त्यांना इस्ट्रोजेनसोबत प्रोजेस्टेरोन द्यावं लागतं. ज्यांचे गर्भाशय काढलेले आहे त्यांना फक्त इस्ट्रोजेन दिलं जाऊ शकतं. काही स्त्रियांना फक्त योनी कोरडेपणाचा त्रास असेल तर लो-डोस योनीतील स्थानिक इस्ट्रोजेन पुरेसं ठरू शकतं. काही वेळा त्वचेवर लावायचे पॅच किंवा जेल वापरले जातात, ज्यामुळे रक्तातील गाठींचा धोका तुलनेने कमी असू शकतो. म्हणजेच “हार्मोन गोळी” हा एकच प्रकार नसतो.
HRT कोणासाठी उपयुक्त? ज्या स्त्रियांमधील गरम लाटा इतक्या तीव्र असतात की झोप आणि दैनंदिन आयुष्य विस्कळीत होतं, ज्यांना अकाली रजोनिवृत्ती झाली आहे, किंवा ज्यांना जीवनमानावर गंभीर परिणाम जाणवतो त्यांच्यासाठी HRT हा प्रभावी पर्याय असू शकतो. काही स्त्रिया उपचारानंतर सांगतात “मला परत स्वतःसारखं वाटायला लागलं.” हा अनुभव दुर्लक्षित करता येत नाही.
पण सावधगिरी कधी बाळगावी? जर स्तनाच्या कर्करोगाचा इतिहास, रक्तातील गाठी (DVT), गंभीर लिव्हर आजार, अनियंत्रित उच्च रक्तदाब असेल तर अशा परिस्थितीत HRT देताना विशेष काळजी घेतली जाते. म्हणूनच ही औषधे स्वतःहून सुरू करणे किंवा बंद करणे योग्य नाही. प्रत्येक स्त्री वेगळी असते. तिची जोखीम, तिची गरज आणि तिची प्राधान्ये वेगळी असतात.
HRT नको असेल तर? व्यायाम, वजन नियंत्रण, संतुलित आहार, कॅल्शियम-व्हिटॅमिन D, योग, झोपेचे नियोजन, समुपदेशन, काही नॉन-हार्मोनल औषधे हे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. उपचार म्हणजे फक्त हार्मोन थेरपी नाही. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्रास सहन करणं हा कणखरपणा नाही. माहिती घेऊन निर्णय घेणं ही खरी ताकद आहे. पेरिमेनोपॉज हा केवळ बदलाचा टप्पा आहे. HRT हा शत्रू नाही. तो एक पर्याय आहे. योग्य स्त्रीसाठी, योग्य वेळी, योग्य प्रकारे देण्याचा. भीती ही बहुतेक वेळा अर्धवट माहितीतून जन्माला येते. पूर्ण माहिती मिळाली की निर्णय स्पष्ट होतो. तुमच्या शरीराचा आवाज ऐका. तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोला. आणि लक्षात ठेवा, हा काळ फक्त “सहन करण्याचा” नाही, तर “स्वतःला समजून घेण्याचा” आहे.
drprdeshpande2@gmail.com
Web Summary : Understand perimenopause, a natural phase with symptoms manageable through HRT. Studies show HRT safety for healthy women under 60, dispelling cancer fears. Consult a gynecologist for informed decisions.
Web Summary : पेरीमेनोपॉज को समझें, एचआरटी के माध्यम से लक्षणों का प्रबंधन किया जा सकता है। अध्ययनों से पता चलता है कि 60 वर्ष से कम उम्र की स्वस्थ महिलाओं के लिए एचआरटी सुरक्षित है, कैंसर का डर दूर होता है। सूचित निर्णय लेने के लिए स्त्री रोग विशेषज्ञ से परामर्श करें।