Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Menopause : मी कोण, काय केलं मी आजवर आयुष्यात? मेनोपॉज हा शेवट नाही, करा नवी सुरुवात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 18:24 IST

Menopause premoposue and mental health, mood swings, loneliness, emptness, how to deal with it? : Menopause premoposue and mental health : मानसिक ताण वाढला तर मनमोकळं बोला, गरज असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या..

रसिका भोरे (मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक, नाशिक)

रजोनिवृत्ती (Menopause) हा स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक पण महत्त्वाचा टप्पा आहे. साधारणतः ४५ ते ५५ वयोगटात मासिक पाळी कायमची थांबते आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये घट होते. हा बदल केवळ शारीरिक नसून मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही खोल परिणाम करणारा असतो. त्यामुळे रजोनिवृत्तीला “हार्मोनल बदल” इतक्यापुरते मर्यादित न पाहता, जीवनातील एक मानसशास्त्रीय संक्रमण म्हणून समजणे आवश्यक आहे. या काळात स्त्रियांना अचानक गरम व्हायला लागणे, रात्री घाम येणे, झोप न लागणे, थकवा, वजन वाढणे किंवा सांधेदुखी अशा शारीरिक तक्रारी जाणवू शकतात. (Menopause premoposue and mental health, mood swings, loneliness, emptness, how to deal with it?)झोपेचा अभाव आणि सततचा थकवा हे मानसिक स्थैर्यावर परिणाम करतात. मेंदूतील सेरोटोनिनसारख्या रसायनांवर हार्मोन्सचा प्रभाव पडत असल्याने मूडमध्ये चढ-उतार, चिडचिड, बेचैनी, विनाकारण रडू येणे किंवा रिकामेपणाची भावना निर्माण होऊ शकते. काही स्त्रियांमध्ये चिंता (anxiety) किंवा नैराश्य (depression) तीव्र होण्याची शक्यता असते, विशेषतः जर पूर्वी मानसिक आरोग्याच्या समस्या असतील तर..!

काय माहिती हवं?

रजोनिवृत्ती हा “भावनिक आंदोलनाचा” टप्पा आहे. शरीरात बदल होतात आणि प्रजननक्षमता संपते. त्यामुळे “मी कोण?” किंवा “माझ्या आयुष्याचा पुढचा टप्पा काय?” असे प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात. तारुण्य, ऊर्जा किंवा आकर्षकता हरवल्याची भावना आत्मसन्मानाला धक्का देऊ शकते. जोडीला मुलं स्वावलंबी झालेली असल्यामुळे एवढी वर्ष त्यांच्या अवती-भवती जाणारा वेळ आता रिकामपणाने भरून जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून वर्तनातही बदल दिसतात. काही स्त्रिया अधिक संवेदनशील होतात, छोट्या गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया देतात किंवा अबोल होतात आणि सामाजिक संपर्क कमी करतात. लैंगिक इच्छेमध्ये बदल होऊन पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी एकाग्रता कमी होणे किंवा निर्णयक्षमता ढासळल्यासारखे वाटू शकते. हे बदल जाणूनबुजून नसतात; ते शरीर-मनाच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात.

काळजी काय घ्यायची?

या टप्प्यात स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार यामुळे मन-शरीर संतुलित राहते. भावना दडपून न ठेवता व्यक्त करणे, डायरी लिहिणे किंवा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे उपयुक्त ठरते. नवीन छंद जोपासणे, स्वतःसाठी वेळ देणे आणि आत्मस्वीकाराची भावना वाढवणे हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे स्त्रीच्या आयुष्याच्या या नाजूक टप्प्यावर कुटुंबीयांनीही संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे. तिला समजून घ्यावे, टीका करणे टाळावे आणि भावनिक आधार द्यावा. जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि समजूतदार संवाद ठेवणे हा मोठा आधार ठरतो. जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ तीव्र नैराश्य, सतत चिंता, झोपेचा गंभीर त्रास किंवा स्वतःबद्दल नकारात्मक/आत्महानीचे विचार येत असतील, तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य समुपदेशन आणि उपचारांनी हा टप्पा अधिक सुसह्य करता येतो. रजोनिवृत्ती म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, ती नव्या पर्वाची सुरुवात आहे. योग्य माहिती, आत्मस्वीकार आणि कुटुंबाचा आधार यांच्या मदतीने स्त्री हा काळ अधिक सजग, सक्षम आणि सकारात्मकतेने जगू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Menopause: A new beginning, not the end, for women's lives.

Web Summary : Menopause is a natural transition impacting women's physical and mental health. Manage mood swings, prioritize self-care with exercise and balanced diet. Seek family support, therapy for persistent issues; embrace it as a new beginning.
टॅग्स : जागतिक महिला दिन 2026मासिक पाळी आणि आरोग्यमहिलाआरोग्यहेल्थ टिप्स