डॉ. प्रिया प्रभू (सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज)
हा लेख खरं तर तिच्यासाठी कमी ‘तिच्या’ कुटुंबासाठी आहे. घरात अचानक सगळ्यांना वाटू लागतं की चाळीशीतील आई बदलली आहे, आई हल्ली पटकन रागावते! पूर्वीसारखी हसत नाही. सतत थकलेली दिसते आणि कधी कधी आई स्वतःच म्हणते, “मला स्वतःलाच समजत नाही मला काय होतंय…?”
हा स्वभावातील बदल नाही. हा पेरीमेनोपॉजचा काळ असू शकतो.
काय घडते तिच्या जगण्यात या दिवसात हे आधी बघूया.
एक छोटा प्रसंग… रात्री २ वाजलेत. आईला झोप लागत नाही. अंगाला घाम. छातीत धडधड. विचारांची गर्दी. आणि सकाळी ६ वाजता उठून नाश्ता, डबा, ऑफिस, घर आणि दिवसभर कुटुंबीय म्हणतात, “इतकं काय थकण्यासारखे आहे?”
पण ती फक्त थकत नाहीये. ती हार्मोन्सच्या वादळातून जात आहे.
पेरिमेनोपॉज म्हणजे नेमकं काय?
रजोनिवृत्तीच्या आधी काही वर्षे शरीरात हार्मोन्स इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन अनियमित होऊ लागतात. अंडाशयाचे काम कमी होऊ लागते. पाळी कधी लवकर, कधी उशिरा, कधी जास्त, कधी कमी… कधी अचानक बंद. शरीर म्हणतं, “मी एका नव्या टप्प्यात जात आहे.”
पण मन अजून तयार नसतं. फक्त शरीर बदलतं का? नाही.
हा काळ “दिसणाऱ्या” लक्षणांइतकाच “अदृश्य” भावनांचाही असतो. अचानक गरम लाटा, जणू अंगात आग पेटली वाटावे.
कधी अचानक छातीत धडधडणे. रात्री झोप न लागणे. वजन वाढल्यामुळे स्वतःवर नाराजी. आरशात पाहताना “मी बदलले का?” असा प्रश्न.
मुलं मोठी होतायत, स्वतःचं आयुष्य घेऊन पुढे जाऊ लागतात.
पालक वृद्ध होतायत. त्यांची चिंता पोखरते.
कधी कधी ती विनाकारण रडते. आणि लगेचच स्वतःलाच म्हणते, “मी एवढी कमकुवत का झाले? मी अशी कधीच नव्हते.”
पण ती कमकुवत नाही. ती संक्रमणातून जात आहे.
कुटुंबासाठी हे कठीण का वाटतं?
कारण आपल्याला दिसतं ते फक्त तिचं वागणं. आपल्याला दिसत नाही ते तिचं थकलेलं शरीर, तिचं गोंधळलेलं मन, आणि “मी ठीक आहे का?” हा तिचा आतला प्रश्न. आपण म्हणतो: “इतकं का चिडायचं?” “तुला काही झालेलं नाही.” “सगळ्यांनाच असं होतं.”
पण तिच्यासाठी हा काळ पहिल्यांदाच येतो आहे. तिला तुलना नको. तिला समजून घेणं हवं असतं, आधार हवा असतो.
या काळात आई काय अनुभवू शकते?
१. स्वतःच्याच शरीरावर नियंत्रण नसल्यासारखं वाटणं.
२. लैंगिक आयुष्यात बदल.
३. स्वतःची आकर्षकता कमी झाली असं वाटणं.
४.अचानक रिकामेपणा. एकावेळी अनेक कामे करण्याची असमर्थता.
५. “माझी गरज आता कोणाला आहे?” असा विचार.
मग आपण काय करू शकतो?
१. तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला ती “ड्रामेबाज” नाही.ती “ओव्हररिऍक्ट” करत नाही. ती बदलत्या शरीरासोबत संघर्ष करते आहे.
२. तिच्याशी बोला — उपाय सांगायला नाही, ऐकायला. “आई, तुला हल्ली कसं वाटतं?”हा प्रश्न चमत्कार करू शकतो.
३. तिला डॉक्टरकडे जायला साथ द्या. स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे लाजिरवाणं नाही. रक्ततपासण्या, कॅल्शियम, थायरॉईडची औषधे, गरज असेल तर हार्मोन थेरपी सगळं योग्य मार्गदर्शनाखाली सुरक्षित असू शकतं.
४. तिचा भार थोडा हलका करा एक दिवस चहा तुम्ही बनवा. तिच्या जागी तुम्ही काम करा. ती एकटी नाही हे तिला जाणूवू द्या. तिला विश्रांती “कमवावी” लागू नये. पतीची भूमिका या काळात जोडीदाराची साथ सर्वात महत्त्वाची असते. ती जर म्हणाली की तिला जवळीक नको वाटतेय तर तो नकार नाही, तो बदल आहे. संबंध वेदनादायी असू शकतात.
५. घरकामामध्ये मदत आता जास्त आवश्यक असते. चिडचिड का झाली हे समजून घेणे अधिक महत्त्वाचं असतं. संवाद, संयम आणि आदर हेच नातं टिकवतात.
६. आणि मुलांनो… तुम्ही कॉलेजमध्ये असाल, नोकरीत व्यस्त असाल.प ण आईचा हा टप्पा तिच्या आयुष्यातला खूप संवेदनशील काळ असतो. तुमचा एक मेसेज “आई, तू खूप काही केलंस आमच्यासाठी.” तिच्या डोळ्यांत आनंदाश्रु आणू शकतो.
७. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पेरिमेनोपॉज म्हणजे शेवट नाही. तो नवा अध्याय आहे. या काळानंतर अनेक स्त्रिया: स्वतःसाठी वेळ काढतात. नवीन छंद शिकतात. अधिक ठाम आणि स्वतंत्र होतात. स्वतःच्या शरीराला आणि मनाला नव्याने स्वीकारतात.
८. शेवटी… आई आयुष्यभर तुमच्या बदलांना स्वीकारत आली. आता तिच्या बदलांना स्वीकारण्याची वेळ तुमची आहे. ती पुन्हा हसेल. ती पुन्हा स्थिर होईल. पण तोपर्यंत… तिला एकटी सोडू नका.तिला “सहन कर” असं सांगू नका. तिला “मी आहे तुझ्यासोबत” असं सांगा.
९. पेरिमेनोपॉज हा आजार नाही. तो एक प्रवास आहे आणि हा प्रवास जेव्हा कुटुंब हातात हात घालून करते तेव्हा तो प्रवास भीतीचा नसतो, तो समजुतीचा आणि जवळीक वाढवणारा ठरतो.
