शीतल मोगल (आहारतज्ज्ञ आणि वर्कआऊट प्लॅनर)
आजची २१ व्या शतकातील कुणीही महिला शिक्षण करीअर व्यवसाय कुटुंब आणि समाज या सर्व क्षेत्रात ठामपणे उभी आहे. ती आत्मनिर्भर आहे. निर्णयक्षम आहे आणि स्वतःच्या आरोग्याबाबत बाबतीत जागृतही आहे. मात्र आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा असतो मेनोपॉज. या टप्प्यावर अजूनही अनेक महिलांचा गोंधळ होतो. भीती वाटते. गैरसमज छळतात. त्याकाळात आपल्या आरोग्यासह आहाराचं नीट नियोजन सगळं सुखरुप पार पाडू शकतं.
मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी कायमची थांबवण्याची नैसर्गिक प्रक्रिया. साधारणतः ४५ ते ५५ या वयोगटात हा टप्पा येतो पण हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीनुसार हा वयोगट ३५ ते ४५ व त्यापुढील असा झालेला आहे. शरीरातील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोन या हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. हॉट फ्लॅश, विनाकारण चिडचिड, झोप न लागणे किंवा सतत झोप डिस्टर्ब होणे, वजन वाढणे विशेषतः ओटीपोट वाढणे, सांधेदुखी थकवा, त्वचेतील बदल अनेक लक्षणे जाणवू लागतात काही महिलांमध्ये नैराश्य व आत्मविश्वासाची घट जाणवते. त्याचबरोबर शरीरातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात त्यामुळे पाठदुखी नेहमी होत असते. शरीरातील वॉटर रिटेंशन जास्त होते त्यामुळे ब्लोटिंग म्हणजेच पोट किंवा शरीर फुगल्यासारखे सतत वाटत राहते. या हार्मोनल चेंजेसमुळे शरीरातील ड्रायनेस वाढतो विशेषतः व्हजायनल ड्रायनेस वाढतो त्यामुळे लैंगिक इच्छाही कमी होते..
असे हे सगळे प्रॉब्लेम्स आलेले असताना शरीराची व मनाची अवस्था ढासळायला सुरुवात होते. वेगळेपणाची भावना येत डिप्रेशन इथे सुरू होऊ शकते. बाई एकाकी शांत व्हायला लागते परंतु हा टप्पा म्हणजे आयुष्याचा शेवट नसून एक नवीन सुरुवात ठरू शकते. या टप्प्यावर आपण नक्कीच ओव्हरकम करु शकतो.
खरंतर सगळ्यांना माहीत असतं की टप्पा येणारच आहे मग त्याविषयी अज्ञान का ?..
१. वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच तयारी केली तर मेनोपॉजही सुरळीत होऊ शकतो. सुखरुप आपण ही फेज निभावू शकतो.
२. सर्वप्रथम वेट ट्रेनिंग, योगा किंवा कुठलाही मिनिटांचा व्यायाम नित्यनियमाने ४०-४५ मिनिटे रोज सुरु करा. त्यामुळे मसल फॉल कमी होऊन शरीर व हार्मोन्स स्टेबल राहतील. परिणामी वजन वाढणार नाही. त्यामुळे आत्मविश्वास टिकून राहतो. वेळ नाही ही सबब यासाठी दूर ठेवावी लागेल. योग किंवा मेडिटेशनद्वारे तुम्ही सगळ्या बाजूंनी बॅलन्स राहू शकता ..
महत्त्वाचा टप्पा म्हणजे डाएट
Protein ,calcium, vitamin D युक्त आहार आपल्या रोजच्या आहारात आहे की नाही हे जाणून घेणं किंवा असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आठवड्याचा किंवा एक महिन्याचा डायट प्लॅन स्वतःचा स्वतः तयार करा... आहारात दूध, ताक, दही, तीळ, बदाम यांचा समावेश करा म्हणजे हाडांना मजबुती राहील तसेच सोयाबीन, हरभरा ,यातील phytopestrogen हार्मोन्स संतुलन राखण्यास मदत करतात. तसेच रोजच्या आहारात भरपूर सॅलेड या दिवसात खूप आवश्यक आहे यासोबत हिरव्या पालेभाज्या, फळे आणि भरपूर पाणी यामुळे शरीर ताजेतवाने राहील.. साखर जंक फूड व अती खारट पदार्थ टाळावेत..
तसेच यासोबत इतक्या दिवस बाजूला ठेवलेली आवड जोपासावी.. जसे आवडीचे पुस्तक वाचणे, निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे, ट्रेकिंग करणे, सायकलिंग, डान्स, म्युझिक असा स्वतःचा वेळ दिल्यामुळे मनाला शांत वाटून शरीर स्वास्थ्यही सुधारेल
आजची स्त्री सक्षम आहे, कर्तुत्ववान आहे पण तिचं खरं सामर्थ्य तिच्या निरोगी शरीरात आणि शांत मनात आहे. "मी आधी" हा स्वार्थ नसून तो स्वरक्षणाचा मंत्र आहे. स्वतःला वेळ देणे, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचं प्रेम आणि सकारात्मक विचार या गोष्टी अंगीकारल्यास व्यस्त जीवनातही या टप्प्यात आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जपणे सहज शक्य आहे.
