Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Menopause & ADHD : 'चाळिशी'नंतरचा नवा उलगडा:-पेरीमेनोपॉज आणि न्यूरोडायव्हर्सिटी, मेंदूत नेमकं घडतं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 18:35 IST

Menopause & ADHD : अचानक विसरभोळेपणा वाढणं, चिडचिड होणं किंवा कामाचा ताण सहन न होणं ही केवळ 'वयाची लक्षणं' नसून तो उघड झालेला न्यूरोडायव्हर्सिटीचा भाग असू शकतो.

ठळक मुद्दे जशी आपल्या हाताची पाची बोटे सारखी नसतात किंवा आपले बोटांचे ठसे एकसारखे नसतात. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूची क्षमता आणि प्रक्रिया करण्याची पद्धत ही देखील सारखी नाही. त्यामुळे आपण आहोत तसे स्वतःचा स्वीकार हीच सर्वात मोठी आणि छान गोष्ट आहे.

डॉ. प्रिया प्रभू (सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज)

भारतामध्ये न्यूरोडायव्हर्सिटी म्हणजे चेतावैविधता याविषयी जास्त जागरूकता नाही मात्र इतर देशांमध्ये याविषयी बरेच काम झाले आहे. हा पूर्णपणे नवा विषय आज आपण समजून घेऊया.  आपल्या समाजात न्यूरोडायव्हर्सिटी म्हटले म्हणजे केवळ 'ए.डी.एच.डी.' (ADHD) किंवा 'ऑटिझम' (Autism) आठवते आणि डोळ्यांसमोर फक्त खोडकर किंवा एका जागी न बसणारी लहान मुलं येतात. पण तुम्हाला माहित आहे का? आपल्या आसपासच्या अनेक सुशिक्षित, संसारी आणि यशस्वी स्त्रिया देखील याच श्रेणीत असू शकतात, ज्याचा शोध त्यांना वयाच्या ४० किंवा ४५ व्या वर्षी लागतो.

१. पेरीमेनोपॉज आणि मेंदूचा संबंध काय? स्त्रियांच्या शरीरात 'इस्ट्रोजेन' (Estrogen) नावाचं हार्मोन खूप महत्त्वाचं असतं. हे हार्मोन मेंदूतील 'डोपामाइन' वाढवण्यास मदत करतं, ज्यामुळे आपल्याला लक्ष केंद्रित करणं, गोष्टी लक्षात ठेवणं आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. जेव्हा एखादी स्त्री पेरीमेनोपॉज (रजोनिवृत्तीच्या आधीचा काळ) मध्ये प्रवेश करते, तेव्हा इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ लागते.  ज्या स्त्रियांचा मेंदू जन्मापासूनच वेगळ्या घडणीचा असतो (Neurodivergent), त्यांच्यासाठी हा काळ अधिक कठीण जातो. आतापर्यंत त्या 'मास्किंग' (Masking) करून, म्हणजे प्रचंड कष्ट घेऊन स्वतःला अपेक्षेप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करत होत्या, तो डोलारा आता कोसळू लागतो. अचानक विसरभोळेपणा वाढणं, चिडचिड होणं किंवा कामाचा ताण सहन न होणं ही केवळ 'वयाची लक्षणं' नसून तो उघड झालेला न्यूरोडायव्हर्सिटीचा भाग असू शकतो.

 

२. परदेशात याचे निदान का वाढत आहे? आज अमेरिका किंवा युरोपमध्ये अशा निदानांचे प्रमाण वाढलेले दिसतेय. याचे कारण आता न्यूरोडायव्हर्सिटी वाढली असं नसून, याविषयीची समज आणि तपासणीच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वीचे निकष फक्त मुलांवर आधारित होते. आता विज्ञानाला समजलंय की स्त्रियांमध्ये याची लक्षणं वेगळी असतात. तसेच,  सोशल मीडियामुळे स्त्रिया एकमेकींचे अनुभव वाचत आहेत आणि त्यांना जाणीव होत आहे की, "अरे, हे तर माझ्यासोबतही होतंय!"

३. भारतातील परिस्थिती: 'सुपरवुमन' असण्याचा शाप भारतात मात्र आपण याविषयात अजूनही मागे आहोत. याची काही प्रमुख कारणं: * सहनशक्तीचे कौतुक: भारतीय स्त्रीने कितीही कष्ट सोसले तरी ती तक्रार करत नाही, याला आपण 'संस्कार' मानतो. त्यामुळे तिच्या मानसिक संघर्षाकडे दुर्लक्ष होतं. ती देखील मदत मागायला टाळाटाळ करते.  * जागरुकतेचा अभाव: आपल्याकडे अजूनही "मुलं मोठी झाली की रिकामपण खायला उठलंय" किंवा "हे सगळं रिकाम्या मनाचे चाळे आहेत" किंवा " भरल्या घरात सुख टोचतंय" असं म्हणून तिला हिणवलं जातं. * चुकीचे निदान: अनेकदा डॉक्टरांकडे गेल्यावर तिला फक्त 'डिप्रेशन' किंवा 'अँक्झायटी'च्या गोळ्या दिल्या जातात, पण तिच्या मेंदूची जडणघडण मुळात वेगळी आहे, हे तपासायचा प्रयत्न होत नाही. जेव्हा एखाद्या स्त्रीला वयाच्या ४५ व्या वर्षी कळतं की ती 'न्यूरोडायव्हर्जंट' आहे, तर तो धक्का नसून एक प्रकारे त्रासातून मुक्ती आहे. कारण तिला हे समजतं की ती 'आळशी' किंवा 'चिडचिडी' किंवा 'गोंधळलेली' नव्हती, तर तिचा मेंदू फक्त वेगळ्या पद्धतीने काम करत होता. आपण सर्वांनी या विषयावर मोकळेपणाने बोलणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, "जर ही समस्या जन्मापासून आहे, तर ती चाळीशीपर्यंत लक्षात का आली नाही?" याचे उत्तर आपल्या समाजात आणि स्त्रियांच्या स्वभाववैशिष्ट्यात दडलेले आहे.

 

१. 'मास्किंग' (Masking) :थकवणारा मुखवटा स्त्रियांमध्ये इतरांचे निरीक्षण करण्याची आणि त्यांच्यासारखे वागण्याची उपजत कला असते. लहानपणापासूनच मुलींना 'समजूतदार', 'शांत' आणि 'सर्वांशी मिळूनमिसळून वागणारी' बनण्याचे शिक्षण दिले जाते. * काय घडतं? एक न्यूरोडायव्हर्जंट मुलगी इतरांचे पाहून तसे वागण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःच्या भावना दाबून टाकते जेणेकरून ती 'वेगळी' दिसणार नाही. * परिणाम: यालाच 'सोशल कॅमफ्लाज' (Social Camouflage) म्हणतात. हा मुखवटा टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होते. जेव्हा चाळीशीत शारीरिक बदल (हॉर्मोन्स) होतात, तेव्हा ही ऊर्जा संपते आणि हा मुखवटा गळून पडतो.

२. मुलांपेक्षा मुलींची लक्षणं वेगळी असतात शाळेत जर एखादा मुलगा बाकावर उड्या मारत असेल, तर त्याला लगेच 'ADHD' साठी तपासले जाते. पण मुलींमध्ये ही लक्षणे वेगळी दिसतात: * तंद्री लागणे (Daydreaming) / मानसिक अतिसक्रियता: मुलगी शांतपणे खिडकीबाहेर बघत असेल, तर आपल्याला वाटते ती 'शांत' आहे, पण प्रत्यक्षात तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू असते. * अति-संवेदनशीलता (Sensory Issues): कपड्यांचे लेबल टोचणे, मसाल्यांचा तीव्र वास सहन न होणे किंवा पंख्याच्या आवाजाचा किंवा उजेडाचा त्रास होणे. याला आपण 'नखरे' समजतो, पण हे खरं तर त्यांच्या मेंदूची माहिती प्रक्रिया करण्याची पद्धत वेगळी असल्याचे लक्षण आहे.  

३. भारतीय घरातील 'सुपरवुमन' सिंड्रोम भारतात एका स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्या असतात. स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, पाहुणे आणि ऑफिस. * आव्हाने: न्यूरोडायव्हर्जंट स्त्रियांना 'एक्झिक्युटिव्ह डिस्फंक्शन' (Executive Dysfunction) नावाचा त्रास होतो. म्हणजेच, कामाचे नियोजन करणे, वेळेचे भान राखणे किंवा साध्या कृती (उदा. कपाटात कपडे नीट लावणे) करणे त्यांना खूप कठीण जाते. * भारतातील वास्तव: जेव्हा एखादी भारतीय स्त्री हे करू शकत नाही, तेव्हा तिला 'आळशी' किंवा ' वेंधळी' (Unorganized) म्हटले जाते. तिला आधार देण्याऐवजी तिच्यावर टीका केली जाते, ज्यामुळे तिचे मानसिक आरोग्य अधिक बिघडते.

 

४. निदानाचे महत्त्व: "आता समजून काय उपयोग?" असे म्हणू नका! अनेकांना वाटते की चाळीशीत निदान होऊन काय होणार? पण हे निदान स्त्रीला दोन मोठ्या गोष्टी मिळवून देते: * आत्म-क्षमा (Self-Forgiveness): "मी वाईट आई किंवा वाईट पत्नी नाही,  माझ्या मेंदूचा प्रकार वेगळा आहे," ही जाणीव तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवते. * योग्य मदत: केवळ 'डिप्रेशन'च्या गोळ्या घेण्याऐवजी, तिला तिच्या मेंदूला समजून घेणारी थेरपी आणि जीवनशैलीतील बदल (उदा. कामाचे वेळापत्रक बदलणे, इतरांची मदत मिळवणे) करता येतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या स्त्रीला असे वाटत असेल की, हा त्रास केवळ 'पेरीमेनोपॉज' नसून त्यामागे न्यूरोडायव्हर्सिटी (ADHD किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम) असू शकते, तर गोंधळून न जाता खालीलप्रमाणे पावले उचलावीत. ही प्रक्रिया केवळ उपचारांची नसून स्वतःला नव्याने समजून घेण्याची आहे.

काय करता येईल?

१. स्वतःचे निरीक्षण करा सर्वात आधी तुमच्या अनुभवांची एक 'डायरी' किंवा नोंद ठेवा. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी तुमच्याकडे ठोस माहिती असणे गरजेचे आहे. नोंद करा: तुम्हाला कधी जास्त त्रास होतो? (उदा. गर्दीत गेल्यावर, खूप आवाज झाल्यावर, किंवा एकाच वेळी अनेक कामे करताना). हॉर्मोन्सचा संबंध: तुमच्या मासिक पाळीच्या चक्राचा आणि तुमच्या विसरभोळेपणाचा किंवा चिडचिडीचा काही संबंध आहे का, हे तपासा. जुने दिवस आठवा: लहानपणी तुम्ही कशा होतात? तुम्हाला लोकांशी बोलायला त्रास व्हायचा का? तुम्ही खूप कल्पक होतात का? २. शारीरिक तपासणी करून घ्या  न्यूरोडायव्हर्सिटीच्या निदानाकडे जाण्यापूर्वी काही शारीरिक गोष्टी तपासाव्या लागतात, कारण त्यांची लक्षणे सारखी असू शकतात. रक्त तपासणी: व्हिटॅमिन B12, D3, आणि थायरॉईडची पातळी तपासा. यांची कमतरता असल्यास 'ब्रेन फॉग' (मेंदू सुन्न होणे) जाणवतो. स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांशी पेरीमेनोपॉजच्या लक्षणांबद्दल बोला. कधीकधी 'हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी' (HRT) मुळे लक्षणांमध्ये फरक पडतो. ३. योग्य तज्ज्ञांची निवड करा  भारतात प्रौढ स्त्रियांमधील न्यूरोडायव्हर्सिटीचे निदान करणारे तज्ज्ञ कमी आहेत. त्यामुळे डॉक्टर निवडताना:  विचारणा करा: "तुम्ही प्रौढ स्त्रियांमधील ADHD किंवा ऑटिझमवर काम करता का?" असा थेट प्रश्न विचारा. न्यूरो-अफर्मिंग (Neuro-affirming): असे तज्ज्ञ शोधा जे न्यूरोडायव्हर्सिटीला 'आजार' न मानता मेंदूची एक 'वेगळी ठेवण' मानतात.

४. जीवनात छोटे पण महत्त्वाचे बदल करा  निदान होईपर्यंत थांबण्याची गरज नाही, तुम्ही आजपासूनच स्वतःला सोयीचे होईल असे बदल करू शकता: संवेदी आधार (Sensory Support): जर आवाजाचा त्रास होत असेल, तर 'नॉइज कॅन्सलिंग' हेडफोन्स वापरा. कपड्यांचे फॅब्रिक टोचत असेल, तर सुती मऊ कपडे वापरा.  कामाचे नियोजन: एका वेळी एकच काम करा. मोबाईलमध्ये 'रिमाइन्डर्स' लावा. कामाची यादी बनवण्याची सवय लावा. "नाही" म्हणायला शिका. ज्या सामाजिक कार्यक्रमांमुळे तुम्हाला खूप थकवा येतो, तिथे जाणे टाळा.

 

५. स्वतःला दोष देणे थांबवा (Self-Compassion) हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. तुम्हाला जाणवणारा त्रास हा तुमचा 'स्वभाव' नाही, तर ती तुमच्या मेंदूची वेगळी संवेदनशीलता आणि कृतिशीलता आहे.  स्वतःला "मी अशी का?" किंवा "मला साधी कामं का जमत नाहीत?" असे विचारून त्रास करून घेऊ नका. तुम्ही आतापर्यंत खूप कष्टाने इथपर्यंत पोहोचला आहात, हे मान्य करा. त्याचप्रमाणे - भारतात अशा स्त्रियांसाठी काही ऑनलाईन सपोर्ट ग्रुप्स (Support Groups) देखील आहेत, जिथे तुम्ही इतर स्त्रियांचे अनुभव ऐकू शकता. यामुळे "मी एकटीच नाही" ही जाणीव तुम्हाला मानसिक बळ देईल. एका लेखामध्ये ही सर्व नवी संकल्पना समजावणे तसे अवघड आहे. तरी देखील बरेचसे महत्त्वाचे मुद्दे यामध्ये स्पष्ट केलेले आहेत.  जशी आपल्या हाताची पाची बोटे सारखी नसतात किंवा आपले बोटांचे ठसे एकसारखे नसतात. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूची क्षमता आणि प्रक्रिया करण्याची पद्धत ही देखील सारखी नाही. त्यामुळे आपण आहोत तसे स्वतःचा स्वीकार हीच सर्वात मोठी आणि छान गोष्ट आहे.

drprdeshpande2@gmail.com

 

English
हिंदी सारांश
Web Title : Menopause & ADHD: Understanding Neurodiversity in Women After Forty

Web Summary : Perimenopause can unmask underlying neurodiversity in women, often misdiagnosed. Increased awareness and proper diagnosis can lead to self-compassion and better support. Recognizing different symptoms and seeking appropriate help is crucial.
टॅग्स : जागतिक महिला दिन 2026आरोग्यहेल्थ टिप्स