सायली कुलकर्णी (सिनिअर सायकॉलॉजिस्ट, पुणे)
मेनोपॉज हा काही फक्त तुझ्याच वाट्याला आला का, बाकीच्या बायकांना नाही होत त्रास असं काही नवरे स्पष्ट म्हणतात काही न बोलता कृतीतून दाखवतात, चिडचिड करतात. टोमणे मारतात. खरंतर स्त्रीच्या आयुष्यात मेनोपॉज हा अत्यंत महत्त्वाचा जैविक आणि भावनिक टप्पा असतो. हार्मोन्समधील बदलांमुळे या काळात तिच्या मनःस्थितीत चढउतार होऊ शकतात, कधी थकवा, चिडचिड, अस्वस्थता किंवा भावनिक संवेदनशीलता जाणवू शकते. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाची साथ महत्त्वाची असतेच; पण या सगळ्यात पतीची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरते. या काळात संवेदनशील, साथ देणारी आणि समजून घेणारी भूमिका त्याने निभावली तर हा टप्पा स्त्रीसाठी अधिक सुलभ होऊ शकतो. कधीकधी नवऱ्याला कळतही नसते की आपण नेमके कसे वागावे. म्हणून त्यानं कसं वागावं यासाठी काही सोप्या गोष्टी..
त्याला काय करता येईल?
लेबल नको.. मेनोपॉज म्हणजे तिचा स्वभाव बदलला असा अर्थ नसतो. हार्मोनल बदलांमुळे काही काळ भावनिक प्रतिक्रिया तीव्र होऊ शकतात. त्यामुळे “तू खूप बदलली आहेस” असे म्हणण्यापेक्षा त्या बदलांकडे समजुतीने पाहणे महत्त्वाचे.
ऐकून घ्या प्रत्येक वेळी उपाय किंवा सल्ला देणे गरजेचे नसते. खरंतर बरेचदा तिला फक्त शांतपणे ऐकून घेणारा आणि समजून घेणारा साथीदार हवा असतो.
टोमणे नको.. “तू खूप रिॲक्ट करतेस”, “तुझा मूड कायम खराब असतो” अशा टिप्पणी तिच्या मनाला अधिक दुखावू शकतात. अशा प्रतिक्रिया टाळणे आवश्यक आहे.
छोट्या कामांमध्ये साथ घरातील छोट्या-छोट्या कामांमध्ये मदत करणे, दैनंदिन जबाबदाऱ्या थोड्या वाटून घेणे अशा गोष्टी तिचा ताण कमी करण्यास मदत करतात.
मनमोकळा संवाद तिच्या भावना, थकवा किंवा अस्वस्थता याबद्दल खुलेपणाने बोलण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे.
तिच्या आनंदासाठी वेळ खरी साथ देणे म्हणजे केवळ समजावणे नव्हे, तर तिच्या आवडीनिवडी जपणेही होय. तिला नाटक, संगीत, फिरायला जाणे किंवा एखादा छंद आवडत असेल तर तिच्यासोबत ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. जरी ते स्वतःच्या आवडीचे नसले तरी तिच्या आनंदासाठी वेळ देणे ही खरी साथ असते.
आरोग्याची काळजी घ्या नियमित चालणे, हलका व्यायाम, संतुलित आहार यासाठी प्रोत्साहन द्या आणि शक्य असल्यास तिच्यासोबत त्या सवयी अंगीकारा.
तज्ज्ञांची मदत जर भावनिक अस्वस्थता, चिंता किंवा ताण जास्त जाणवत असेल तर मानसशास्त्रीय समुपदेशन किंवा तज्ज्ञांची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते. मेनोपॉज हा केवळ शारीरिक बदलांचा टप्पा नसून नातेसंबंध अधिक समजूतदार आणि संवेदनशील बनवण्याची संधीही आहे. पतीने समजून घेणे, तिलाही आदर देणे हीच तर या काळात खऱ्या अर्थाने दिलेली साथ होय.
(सीनियर सायकॉलॉजिस्ट, बावधन, पुणे 83299 63972)