दात पिवळे होण्याची समस्या आजकाल प्रत्येकालाच उद्भवते. एकदा दात पिवळे दिसायला लागले की कितीही प्रयत्न केले तरी दात आधीसारखे दिसत नाहीत. आपल्याकडे जुन्या काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी किंवा हिरड्यांच्या मजबुतीसाठी तुरटीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. सोशल मीडियावरही अनेकदा 'घरगुती उपाय' म्हणून तुरटीने दात घासण्याचे फायदे सांगितले जातात. मात्र, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास हे पूर्णपणे सत्य नाही.
तुरटीमध्ये नैसर्गिकरीत्या 'अॅस्ट्रिंजंट' गुणधर्म असतात, जे दातांवरील अन्नाचे कण आणि बाह्य घाण साफ करण्यास मदत करतात. यामुळे दात तात्पुरते स्वच्छ दिसू शकतात, पण ते नैसर्गिकरीत्या पांढरेशुभ्र होत नाहीत. उलट, याचा चुकीच्या पद्धतीने केलेला वापर तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुरटीचे स्वरूप आम्लयुक्त असते. आपल्या दातांच्या संरक्षणासाठी त्यावर 'इनॅमल' नावाचा एक कडक पांढरा थर असतो. जेव्हा आपण वारंवार तुरटी दातांवर घासतो, तेव्हा त्यातील आम्ल या इनॅमल थराची झीज करते. एकदा का हा नैसर्गिक थर विरघळला की, दातांच्या आतील पिवळसर भाग (डेंटिन) उघडा पडतो. परिणामी, दात पांढरे होण्याऐवजी अधिक पिवळसर दिसायला लागतात आणि दातांमध्ये प्रचंड संवेदनशीलता निर्माण होऊन थंड किंवा गरम पदार्थ खाताना त्रास होऊ लागतो.
तसेच, तुरटीमुळे हिरड्यांमधील ऊती आकुंचन पावतात, ज्यामुळे हिरड्या घट्ट झाल्याचा भास होतो. परंतु दीर्घकाळ असा प्रयोग केल्यास हिरड्यांना जखमा होऊ शकतात किंवा त्या कमकुवत होऊ शकतात. आधुनिक दंतवैद्यक शास्त्रानुसार, दातांचा पांढरेपणा हा केवळ वरवरच्या स्वच्छतेवर अवलंबून नसून तो आपल्या आरोग्यावर आणि इनॅमलच्या जाडीवर अवलंबून असतो.
त्यामुळे केवळ चमक मिळवण्यासाठी तुरटीचा थेट वापर करणे टाळलेलेच बरे. नैसर्गिक पांढरेपणा टिकवण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करणे, जेवणानंतर गुळण्या करणे आणि दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडून 'क्लीनिंग' करून घेणे हाच सर्वात सुरक्षित आणि शास्त्रीय मार्ग आहे. तसंच काहीही खाल्ल्यानंतर न विसरता चूळ भरा.
