कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्यांना किती गांभीर्याने घेतलं जातं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुरगावमधील एका २१ वर्षीय तरुणीला नोकरी करत असलेल्या ठिकाणी एक अत्यंत वेदनादायी अनुभव आला. सोशल मीडियावर तिने तो शेअर केला आहे, ज्यानंतर भारतीय कॉर्पोरेटजगतात मानसिक आरोग्याप्रती असलेल्या संवेदनशून्यतेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
तरुणीने Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे सांगितलं. गेल्या अनेक आठवड्यांपासून ती मानसिक त्रासातून जात होती आणि तिने अनेक वेळा आपल्या मॅनेजरला याबद्दल कल्पना दिली होती. मात्र, तिच्या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं. एक दिवस ऑफिसमध्येच तिला श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागला, ती सतत रडत होती आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती.
सपोर्ट मिळण्याऐवजी आला वाईट अनुभव
या गंभीर अवस्थेत तरुणीने एचआरला मेल पाठवून मानसिक आरोग्यासाठी काही दिवसांची सुट्टी मागितली. "माझ्या पर्सनल आयुष्यात खूप काही सुरू आहे, ज्यामुळे मी दडपणाखाली आहे आणि मला त्यातून बाहेर पडण्यासाठी थोड्या वेळेची गरज आहे" असं तिने मेलमध्ये नमूद केलं होतं. यानंतर सपोर्ट मिळण्याऐवजी अत्यंत वाईट अनुभव आला.
"ते माझ्यावर हसले आणि खोटारडी म्हणाले"
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, "सुट्टी मागितल्यानंतर माझा मॅनेजर मदत करण्याऐवजी माझ्यावरच खूप चिडला आणि माझ्या पाठीमागे माझ्यावर हसला, माझी खिल्ली उडवली. एका विश्वासू सहकाऱ्याने मला सांगितलं की, ऑफिसमधले लोक मला 'खोटारडी' म्हणत होते आणि एका सुपरवायझरने तर याला "मीठ-मसाला" लावून अफवा पसरवल्या."
"मी पूर्णपणे कोलमडून गेले"
"माझ्या मानसिक आरोग्याबद्दल प्रामाणिकपणे बोलणं, हे लोकांच्या हसण्याचे कारण ठरेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. या घटनेने मी पूर्णपणे कोलमडून गेले. विशेष म्हणजे, सुट्टीचा मेल पाठवल्यानंतर लगेचच मॅनेजरने व्हॉट्सएपवर मेसेज करून 'तू अजूनही लॉग-इन करून कॉल्स घेऊ शकतेस का?' असं विचारलं होतं जे माझ्या मानसिक स्थितीकडे पूर्णपण दुर्लक्ष केल्याचं दाखवतं."
तरुणीचा हा अनुभव सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी तिला सहानुभूती दाखवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे, तसेच भारतातील कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या विषयाला गंभीरपणे न घेण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली आहे. सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबाबत विविध चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळत आहे.