मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही. पण जान है तो जहां है, त्यामुळे हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार मेंदूसाठी काही गोष्टी केल्या तर बुद्धी एकदम तल्लख राहते. सोप्याच आहेत करुन पाहा..( World Brain Day : 2025)
१. रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे नाहीतर त्याची क्षमता कमी होते. त्याचा वापर सतत करायचा.
२. दिवसातून किमान अर्धा तासासाठी व्यायाम करायला हवा. व्यायाम केल्यावर रक्त वाहिन्याचे काम सुरळीत होते. त्यासाठी चालणे, सायकल चालवणे, एखादा खेळ खेळणे अशा कृती करा. व्यायाम करणे फार गरजेचे असते. शरीरासाठी आणि मानसिक तसेच बौद्धिक आरोग्यासाठीही.
३. आहार चांगला सात्विक आणि योग्य असणे फार गरजेचे आहे. आपण जे खातो त्याचा शरीरावर मनावर तसेच बुद्धीवरही परिणाम होतो. पोषण देणारे आणि पोटाला आराम देणारे पदार्थ आहारात असावेत. ओमेगा-३ असलेले अन्न खावे. त्यामुळे पोटाला आधार आणि मेंदूला चालना मिळते.
४. रक्तदाबाचा त्रास अनेकांना असतो. हा त्रास एकदा सुरु झाला की त्याचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होणारच नाही आणि झालाच तर तो आटोक्यात कसा राहील यासाठी उपाय करायचे. रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे. कायम काळजी घ्यायची. वेळोवेळी तपासणीला जायचे.
५. शुगर म्हणजेच मधुमेह असेल तर काळजी घ्या. बौद्धिक क्षमता चांगली राहावी यासाठी इतरही अवयव आणि संपूर्ण आरोग्य चांगले राहणे गरजेचे असते. स्मरणशक्तीसाठी गरजेच्या असणाऱ्या कृती मधुमेहामुळे संथावतात. त्यामुळे हा त्रास मेंदूवर परिणाम करतो.
६. व्यसन अजिबात करु नका. व्यसनाचा मेंदूवर भयंकर परिणाम होतो. मेंदूच्या क्रियांवर प्रचंड परिणाम होतो. तसेच विचार क्षमता संथ होते. मेंदूच्या कामात अडथळा येतो. त्याचा परिणाम इतरही शारीरिक कृतींवर होतो.
७. ताणतणाव, मानसिक त्रास, अतिविचार असे प्रकार आजकाल अगदीच सामान्य झाले आहेत. मात्र सतत तणावात राहणे मेंदूसाठी चांगले नाही. भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. तसेच झोपही पूर्ण घ्यायलाच हवी. झोप कमी झाल्यामुळे मेंदू थकतो. त्याचे काम व्यवस्थित होत नाही.
८. मेंदूच्या आरोग्यासाठी आनंदी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगले मित्र आयुष्यात असावेत. एखादा छंद असावा. मन रमवता यायला हवे. मन प्रसन्न आणि हृदय आनंदी असेल तर मेंदू आणखी तल्लख होतो. विचार स्पष्ट राहतात आणि आकलन शक्तीही चांगली राहते.