Women Hygiene Tips: आंघोळ आणि साबणाचं नातं वर्षानुवर्षांचं आहे. गरीब असो वा श्रीमंत सगळेच आंघोळ करताना साबणाचा वापर करतात. वेगवेगळ्या साबणांचा वापर केला जातो. पण अलिकडे बरेच लोक साबणाऐवजी बॉडी वॉश वापरू लागले आहेत, आणि त्यात महिलांची संख्या अधिक आहे. आंघोळीच्या वेळी लोक साबण किंवा बॉडी वॉश संपूर्ण शरीरावर लावतात, पण महिलांसाठी असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. भलेही साबणानं शरीर स्वच्छ करण्यास मदत मिळते, पण खासकरून महिलांनी कोणत्या शरीराच्या अवयवावर साबणाचा वापर करू नये हे आपण आज पाहणार आहोत. जेणेकरून आरोग्याचं आणि त्वचेचं नुकसान होणार नाही.
प्रायव्हेट पार्टवर साबण लावण्याचे नुकसान
आपल्या शरीरात काही अतिशय संवेदनशील अवयव असतात, ज्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. योग्य काळजी न घेतल्यास या अवयवांमध्ये इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. महिलांमध्ये व्हजायना हा तसाच एक नाजूक अवयव असतो, ज्याची स्वच्छता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. काही महिला आंघोळीच्या वेळी व्हजायना साबणाने धुतात, पण हे चुकीचं आहे. महिलांनी व्हजायनावर साबणाचा वापर अजिबात करू नये.
साबण लावल्याने काय होते?
व्हजायना साबणानं धुतल्यानं त्यातील नैसर्गिक हेल्दी बॅक्टेरिया नष्ट होतात. हेच बॅक्टेरिया आपल्या शरीराचे इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. त्यामुळे व्हजायनल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. शिवाय साबणातील रासायनिक घटकांमुळे त्या भागात जळजळ, कोरडेपणा किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे जरी तुम्ही शरीरावर साबण वापरत असाल, तरी व्हजायनावर तो वापरणे ताबडतोब थांबवा.
मग स्वच्छता कशी ठेवावी?
प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी साधं पाणी पुरेसं असतं. बाजारात काही इंटिमेट वॉश सारखे प्रॉडक्ट्स मिळतात, त्यांचा वापर तुम्ही बाहेरील भागावर मर्यादित प्रमाणात करू शकता. पण आतल्या भागावर कोणताही प्रॉडक्ट लावू नये, फक्त पाण्यानेच धुवावे.
Mayo Clinic च्या गायनाकॉलॉजी विभागानं म्हटलं आहे की, गर्भाशय आणि व्हजायनाच्या स्वच्छतेसाठी “डौचिंग किंवा विशेष क्लेंजर म्हणजे सुगंधित साबण वापरण्याची गरज नाही आणि पाणी बाह्य जननांग स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसे आहे.”
University of Iowa Health Care च्या “Vulvar skin care guidelines” मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की वल्वर त्वचेवर थेट सुगंधित साबण वापरू नये, तसेच बबल बाथ, सुगंधित तेलं यांचा वापर टाळावा.
Verywell Health च्या एका रिपोर्टनुसार, डॉ. स्टेसी टॅनॉय सांगतात की, “महिलांनी व्हजायना स्वच्छ ठेवण्यासाठी साबण, सुगंधित फेमिनिन वॉश किंवा इतर रासायनिक प्रॉडक्ट्स वापरू नयेत. हे प्रॉडक्ट्स नैसर्गिक बॅक्टेरिया नष्ट करतात आणि त्यामुळे यीस्ट किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.”