तुळशीच्या रोपावर उगवणाऱ्या फुलोर्याला मंजिरी म्हणतात. दिसायला नाजूक असणाऱ्या या मंजिरींच्या आत कितीतरी औषधी गुण दडलेले असतात. घराघरांत तुळस पूजनीय मानली जाते, पण तिच्या मंजिरींचे महत्त्व मात्र अनेकांना माहित नसते. प्रत्यक्षात तुळशीच्या पानांसारख्याच तिच्या मंजिरीही शरीराला अनेक प्रकारे उपयोगी ठरतात.(Why waste the beautiful basil seeds? Store basil seeds - there will be no disease in the house. See the solution.) हिवाळा असो वा पावसाळा, सर्दी-खोकला वाढण्याच्या काळात तुळशीच्या मंजिरी एक नैसर्गिक औषध म्हणून वापरता येऊ शकते. मंजिरींमधील सुगंधी तेलं, तीक्ष्ण आणि उष्ण गुणधर्म कफ-पित्त संतुलित ठेवतात. त्यामुळे नाक बंद होणे, खोकला वाढणे किंवा घशात खवखव जाणवणे अशा त्रासांमध्ये मंजिरींचा काढा किंवा गरम पाण्यातील मंजिरींचा अर्क उतरवून ते पिणे लगेच आराम देते. मंजिरी शरीरातील ओलावा कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा तुळशीचा सर्वात मोठा गुण. मंजिरींमध्ये असलेले नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि सुगंधी द्रव्ये शरीराला जंतूंपासून संरक्षण देतात. म्हणूनच हिवाळ्यात मंजिरी सुकवून ठेवून गरम पाण्यात उकळवून पिणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे.
याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीही मंजिरींचा उपयोग केला जातो. उष्णतेचा गुण असल्यामुळे पोटातील थंडपणा, गॅस किंवा अपचन कमी करण्यास त्या मदत करतात. सकाळी किंवा रात्री गरम पाण्यात दोन–तीन मंजिरी टाकून घेतले तर पोट हलके वाटते आणि पचन सुधारते.
तुळशीच्या मंजिरींचा सुगंध मनाला शांत करणारा ठरतो. मानसिक आरोग्यावर तो परिणाम करतो. तणाव, बेचैनी कमी करण्यासाठी तुळशीचा उपयोग करता येतो. मन स्थिर होण्यास मदत होते. म्हणूनच अनेक जण सुकलेल्या मंजिरींची एक छोटीशी पिशवी कपाटात किंवा उशाजवळ ठेवतात. त्याचा सुगंध हवा शुद्ध करतो.
घशात खवखव, आवाज बसणे किंवा जंतुसंसर्ग वाटत असल्यास तुळशीच्या मंजिरी घालून उकळलेल्या पाण्याने गुळण्या केल्यास घसा मोकळा होण्यास मदत होते. हे एक अतिशय जुने, पण प्रभावी घरगुती औषध आहे. त्वचेसाठीही त्यांचा हलका अर्क वापरून चेहऱ्यावरचे जंतू आणि लहानसहान पुरळ कमी करता येते.
त्यामुळे हिवाळ्यात तुळशीच्या रोपावर दिसणाऱ्या भरमसाठ मंजिरी वाया न घालवता, त्यांचा उपयोग करा. या मंजिरी रोपावर तशाच राहिल्या तर तुळशीला पाने कमी येतात आणि रोप सुकतेही. त्यामुळे त्या वेळीच काढणेही गरजेचे असते.
