Kidney Stone Symptoms in Winter : थंडीला सुरूवात झाली की आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांमुळे जीव नकोसा होतो. कधी हाडांचं दुखणं, कधी सर्दी-खोकला तर कधी कफ इत्यादी समस्या कॉमनच आहेत. यासोबतच अनेकांना किडनी स्टोनची देखील समस्या होते. खासकरून हिवाळ्यात किडनी स्टोनची समस्या अधिक डोकं वर काढते.
खासकरून तरूणांमध्ये या समस्या वेगाने वाढताना दिसतात, तर कधी कधी ती वृद्धांनाही त्रास देते. बदलती लाइफस्टाईल आणि चुकीच्या आहाराच्या सवयी हे याचे प्रमुख कारण मानले जाते. अशा परिस्थितीत हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की थंडीमध्ये किडनी स्टोनचं प्रमाण का वाढतं आणि कोणत्या लक्षणांच्या आधारे त्याची ओळख करता येऊ शकते. चला, याबद्दल सविस्तर पाहुयात.
थंडीत किडनी स्टोनचा धोका का वाढतो?
थंडी वाढली की शरीराला घाम येणे कमी होते. त्यामुळे आपल्याला पाणी पिण्याची इच्छा कमी होते आणि आपण दिवसभरात खूपच कमी पाणी पितो. पण आपण हे विसरतो की पाण्याची गरज फक्त तहान भागवण्यासाठी नसते, तर ते किडनीच्या योग्य कार्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं असतं.
आपल्या किडनीचे काम म्हणजे शरीरातील काही मिनरल्स फिल्टर करणे. पाण्याची मात्रा कमी झाली की कॅल्शियम आणि यूरिक अॅसिड क्रिस्टलमध्ये बदलतात, जे एकत्र येऊन किडनीमध्ये स्टोन तयार करतात.
किडनी स्टोनची लक्षणं
किडनीमध्ये स्टोन तयार होऊ लागला की शरीर काही संकेत देऊ लागते. हे संकेत ओळखले तर योग्य वेळी उपचार करणे शक्य होते. किडनी स्टोनची सामान्य आणि सुरुवातीची लक्षणे खालील प्रमाणे दिसतात.
मळमळ किंवा उलट्या
लघवीत रक्त दिसणे
लघवी करताना जळजळ
वारंवार लघवीची इच्छा होणे
पाठीमध्ये किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना
किडनी स्टोनपासून कसे बचाव कराल?
किडनी स्टोन ही अत्यंत वेदनादायक अवस्था असते. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
- दररोज किमान 3 लिटर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिल्याने किडनी मिनरल्स व्यवस्थित फिल्टर करू शकते.
- आहारातील मीठ कमी करा.जास्त मीठ खाल्ल्याने पथरीची शक्यता वाढते.
- प्रोसेस्ड पदार्थ टाळा. ताजी फळं आणि भाज्या आहारात समाविष्ट करा.
- आहारात आंबट फळं आणि फायबर वाढवा. यामुळे स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते.
- साखर आणि कोल्ड-ड्रिंक्स टाळा. हे किडनी स्टोनचा धोका वाढवतात.
- नियमित व्यायाम करा. यामुळे मेटाबॉलिझम सुधारतं आणि किडनीचं आरोग्य चांगलं राहतं.
