Does Bottled Water Expire : आपण दररोज पाणी पितो, पण कधी विचार केला आहे का की पाणीही 'एक्सपायर' होऊ शकतं का? ऐकायला थोडं विचित्र वाटतं, कारण पाणी हे नैसर्गिक तत्त्व आहे आणि ते खराब होत नाही. पण जर ते चुकीच्या पद्धतीनं साठवलं गेलं किंवा चुकीच्या कंटेनरमध्ये ठेवलं गेलं, तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया कसे.
बॉटलमधील पाणी खरंच एक्सपायर होतं का?
बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांवर अनेकदा एक्सपायरी डेट लिहिलेली असते. सामान्यपणे ही तारीख बॉटलिंगच्या दोन वर्षांनंतरची असते. पण खरी गोष्ट अशी आहे की पाणी स्वतः खराब होत नाही, तर प्लास्टिकची बाटली कालांतराने पाण्यात मिसळू लागते.
प्लास्टिकमधून बिस्फेनोल-A (BPA) आणि अँटिमनी सारखे केमिकल्स हळूहळू पाण्यात उतरतात, खासकरून जेव्हा बाटली उष्णतेत किंवा थेट उन्हात ठेवली जाते. असे पाणी दीर्घकाळ प्यायल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन, रोगप्रतिकारशक्ती आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
पुन्हा पुन्हा वापरणाऱ्या बाटल्या किती सुरक्षित आहेत?
जर तुम्ही तीच बाटली वारंवार वापरत असाल, तर जपून राहा. एकदा बाटली उघडल्यावर त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी झपाट्याने वाढू लागतात. प्रत्येक वेळी आपण बाटलीतून पाणी पिता तेव्हा आपल्या तोंडातील जंतू त्यात पोहोचतात आणि काही दिवसांत बाटलीच्या आतल्या भिंतींवर बायोफिल्म नावाचा थर तयार होतो.
म्हणूनच कधी कधी जुन्या बाटल्यांमधून वास येतो किंवा पाण्याची टेस्टही बदलते. अशा स्थितीत ते पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब किंवा इन्फेक्शनसारख्या तक्रारी होऊ शकतात.
या गोष्टींचे पालन करणे आवश्यक
जर तुम्हाला पाणी नेहमी सुरक्षित ठेवायचं असेल, तर काही सोप्या सवयी लावा.
- दररोज तुमची रीयुजेबल बाटली गरम पाणी आणि साबणाने धुवा.
- आठवड्यातून एकदा व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा वापरून स्वच्छ करा.
- स्टील किंवा काचेच्या बाटल्या वापरा, कारण यात केमिकल्स मिसळत नाहीत आणि बॅक्टेरिया कमी वाढतात.
- बाटल्या उन्हात किंवा उष्ण ठिकाणी ठेवू नका, खासकरून कारमध्ये दीर्घकाळ सोडू नका.
- पाण्याची टेस्ट, वास किंवा घनता बदललेली वाटल्यास लगेच ते फेकून द्या.
पाणी स्वतः खराब होत नाही, पण ते स्टोर करण्याचं ठिकाण आणि पद्धत ठरवते की ते किती सुरक्षित आहे. जर तुम्ही बाटली नियमितपणे स्वच्छ ठेवता, ताजं पाणी पिता आणि जुने पाणी जास्त काळ ठेवत नाही, तर तुम्ही निर्धास्तपणे हायड्रेटेड राहू शकता.
