दुपारची वेळ झाली की अनेकांना झोप येते. विशेषतः लंचनंतर ऑफिसमध्ये, घरी किंवा प्रवासात सुस्ती आणि झोप येणं ही सामान्य बाब मानली जाते. अनेकदा लोक याला आळस, अति जेवण किंवा थकवा समजून दुर्लक्ष करतात. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते, जर ही समस्या दररोज उद्भवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. कधीकधी ही समस्या शरीरातील अंतर्गत बिघाडाचं संकेत असू शकते. चला तर मग जाणून घेऊया, लंचनंतर वारंवार झोप का येते आणि हे कोणत्या आजाराचं लक्षण असू शकतं.
जेवणानंतर शरीरात काय होतात बदल?
जेवल्यानंतर शरीराचं संपूर्ण लक्ष अन्नाच्या पचनावर केंद्रित होतं. या प्रक्रियेदरम्यान पचनसंस्थेच्या अवयवांकडे रक्ताचा प्रवाह वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह थोडा कमी होतो. यामुळे शरीरात जडपणा, सुस्ती आणि झोप जाणवू शकते. मेडिकल भाषेत याला 'पोस्ट लंच डिप' असं म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी, काही कारणांमुळे याचा प्रभाव अधिक वाढू शकतो.
जास्त कार्बोहायड्रेट्समुळे वाढते सुस्ती?
जर तुमच्या लंचमध्ये भात, बटाटे, व्हाईट ब्रेड, मैदा किंवा गोड पदार्थांचा समावेश जास्त असेल, तर रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढतं आणि काही वेळाने अचानक कमी होतं. साखरेच्या या चढ-उतारामुळे शरीराला थकवा जाणवतो आणि झोप येऊ लागते. म्हणूनच जड आणि गोड जेवणानंतर सुस्ती जास्त येते. याव्यतिरिक्त, जेवणानंतर शरीरात असे काही हार्मोन्स एक्टिव्ह होतात जे शरीराला आरामाचा संकेत देतात. यामुळे शरीर 'रिलॅक्स मोड'मध्ये जाते. जर तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नसेल, तर लंचनंतर हा थकवा अधिकच वाढतो.
वारंवार झोप येणं कोणत्या आजाराचा संकेत?
डॉक्टरांच्या मते, जर लंचनंतर रोज तीव्र झोप, जडपणा आणि सुस्ती जाणवत असेल, तर हे 'इन्सुलिन रेझिस्टन्स'चं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. या स्थितीत शरीर साखरेचे ऊर्जेत रूपांतर नीट करू शकत नाही. त्यामुळे जेवणानंतर ब्लड शुगर वेगाने वाढते आणि ती नियंत्रित करण्यासाठी शरीर जास्त इन्सुलिन सोडते. हीच प्रक्रिया कालांतराने थकव्याचं कारण बनतं. तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ इन्सुलिन रेझिस्टन्स राहिल्यास भविष्यात डायबेटीस, हृदयविकार आणि काही प्रकरणांमध्ये कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. अनेकदा उपाशी पोटी केलेली शुगर टेस्ट नॉर्मल असूनही ही समस्या सुरू झालेली असते म्हणूनच याला 'सायलेंट मेटाबॉलिक प्रॉब्लेम' असंही म्हणतात.
बचाव कसा करावा?
तज्ज्ञ सल्ला देतात की, लंचनंतर येणाऱ्या झोपेपासून वाचण्यासाठी तुमचं जेवण हलकं आणि संतुलित ठेवा. आहारात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा आणि जास्त गोड किंवा रिफाइंड कार्ब्स टाळा. जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी १० ते १५ मिनिटं चालणं फायदेशीर ठरतं. यासोबतच नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण आणि पुरेशी झोप घेतल्यास ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.
