Sleepwalking and Sleeptalking : जवळ झोपलेलं कुणी जर अचानक झोपेत बडबड करायला लागलं किंवा काही बोलायला लागलं तर नक्कीच कुणीही घाबरेल. आपल्यासोबतही असं कधी झालेलं असू शकतं. तसेच काही लोक रात्री झोपेतच चालायला लागतात. त्यांना माहीत नसतं की, ते कुठे जात आहेत, का जात आहेत. या दोन्ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळतात. पण या समस्या कशामुळे होतात, याची कारणं काय हे अनेकांना माहीत नसतात. तेच आज आपण समजून घेणार आहोत.
झोपेत बडबडीला काय म्हणतात?
झोपेत बडबड करण्याला सोमनिलोकी समस्या म्हटलं जातं. हा एक एकप्रकारचा स्लीप डिसऑर्डर आहे. ज्यात लोक गाढ झोपेत असताना बोलू लागतात. जवळपास सगळ्याच लोकांना आपल्या जीवनात एकदा तरी झोपेत बोलण्याचा अनुभव येतोच. पण झोपेत बोलण्याची समस्या लहान मुलांमध्ये अधिक बघायला मिळते. असं मानलं जातं की, ही समस्या कमी वयाच्या लोकांना अधिक प्रभावित करते. सोबतच ही समस्या महिला आणि पुरूषांमध्ये समान असते.
काय असतात कारणं?
लोकांना झोपेत बोलण्यासारख्या समस्यांबाबत फार कमी माहीत असतं. त्यामुळे झोपेत बोलण्याचं नेमकं कारण स्पष्ट नसतं. तरीही काही कॉमन कारणं सांगितली जातात जसे की, झोपेची कमतरता, स्लीप अॅपनिया, एंझायटी आणि स्ट्रेस, मद्यसेवन किंवा इतर नशेच्या पदार्थाचं सेवन किंवा जेनेटिक इत्यादी.
काय आहे स्लीपवॉकिंग?
अनेकांना आपण स्लीपवॉकिंग म्हणजे झोपेत चालताना पाहिलं असेल. हा आजार ब्रेन डिसऑर्डरमुळे होतो. याचे सायकॅट्रिक आणि न्यूरोलॉजिकल दोन्ही रूपं असतात. यात व्यक्ती झोपेतून उठून चालू लागते. झोपेत चालण्याचा हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये ही समस्या कॉमन आहे. तर अनेक केसेसमध्ये व्यक्ती वयस्क झाल्यावर ही समस्या दूर होते. पण काही केसेसमध्ये वयस्कांमध्ये सुद्धा ही समस्या राहते. याची काही गंभीर कारणं असू शकतात.
स्लीपवॉकिंगची कारणं
झोपेत चालण्याची अनेक कारणं असू शतात. ज्यात पुरेशी झोप न घेणे ही मुख्य कारण मानलं जातं. यात घाबरण्यासारखं काही नाही. अनेक सायकॉलॉजिस्ट सांगतात की, जे लोक झोपेत चालतात ते एका सामान्य व्यक्तीसारखंच आपलं जीवन जगत असतात. पण जर हे नेहमीच होत असेल किंवा झोपेत चालताना स्वत: किंवा इतरांचं नुकसान करत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.
एक्सपर्ट सांगतात की, आपण किती तास झोपत आहोत हे महत्वाचं नाही तर झोप गाढ लागली पाहिजे. जे लोक जास्त प्रवास करतात आणि झोप घेत नाहीत, त्यांना ही समस्या होऊ शकते. तसेच लहान मुलांमध्ये आजारामुळे चिडचिड वाढते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. हेही झोपेत चालण्याचं कारण असू शकतं. काही लोकांमध्ये काही खास औषधांमुळे किंवा चिंतेमुळे ही समस्या बघायला मिळते. स्लीपवॉकिंगचं एक कारण जेनेटिकही असतं.
सामान्यपणे दोन्ही समस्यांची जवळपास बरीच कारणं सारखीच आहेत. तसेच लहान मुलांमध्येच या समस्या अधिक बघायला मिळतात असं दिसतं. मुख्य कारणांमध्ये कमी झोप, चिंता या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे या समस्या होऊ द्यायच्या नसतील तर पुरेशी आणि चांगली झोप घेणं महत्वाचं ठरतं. जर झोप पूर्ण झाल्यावर सुद्धा या समस्या होत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवायला हवं.