Tea and kidney stones: भारतात चहाचे शौकीन लोक काही कमी नाहीत. जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात गरमागरम चहानं होते. चहा पिऊन अनेकांना फ्रेश वाटतं. पण जास्त प्रमाणात चहा पिण्याची सवय आपल्याला गंभीर आजारी करू शकते असं हेल्थ एक्सपर्ट वेळोवेळी सांगत असतात. पण अलिकडे चहामुळे किडनी स्टोनची समस्या होते असं बोललं जात आहे. पण यात किती तथ्य आहे हे पाहुयात.
केवळ भारतातच नाही तर जगभरात चहा पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण काही लोकांना असं वाटतं की, चहा प्यायल्यानं किडनीमध्ये स्टोन होतात. याबाबत न्यूट्रिशनिस्ट कविता देवगण सांगतात की, आजकाल फॅमिली हिस्ट्री नसतानाही कमी वयात अनेकांना किडनी स्टोनची समस्या होत आहे. पण हे पूर्णपणे सत्य नाही की, चहामुळे किडनीमध्ये स्टोन होऊ शकतात.
लोक असा विचार करतात कारण चहामध्ये ऑक्सालेट असतं. जे किडनी स्टोनचं कारण ठरू शकतं. पण ऑक्सालेट केवळ चहातच असतं असं नाही. काही भाज्या, शेंगा, रताळे, बीट्स, नट्समध्येही ऑक्सालेट असतं. हेच ऑक्सालेट कॅल्शिअमसोबत मिळून किडनीमध्ये स्टोन तयार करतं. पण याचा अर्थ असा नाही की, ऑक्सालेटमुळे या गोष्टी खाणं सोडलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं संतुलन ठेवणं महत्वाचं ठरतं.
कोणत्याही गोष्टीची अति केल्यास नुकसान होतंच. त्यामुळे या गोष्टी कमी प्रमाणात खाल्ल्या किंवा प्यायल्या पाहिजेत. अशात जेव्हाही आपण चहा प्याल त्यानंतर काही वेळानं दोन ग्लास पाणी नक्की प्या. असं करून स्टोनची समस्या टाळला येऊ शकते.
किडनी स्टोनचं मुख्य कारण
किडनीमध्ये स्टोन होण्याचं मुख्य कारण पाणी कमी पिणे हे आहे. बरेच लोक दिवसभर कमी पाणी पितात. एका व्यक्तीनं दिवसातून साधारण ८ ते १० ग्लास पाणी प्यायला हवं. भरपूर पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. किडनीची आतून सफाई सुद्धा होते. म्हणजेच काय तर किडनीच्या समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं महत्वाचं आहे.