World Kidney Day 2026 : शरीरातील वेगवेगळ्या महत्वांच्या अवयवांपैकी एक किडनी आहे. किडनी शरीरातील रक्त फिल्टर करून विषारी तत्व बाहेर काढतात. पण किडनी जर बरोबर काम करत नसेल किंवा त्यात काही बिघाड झाला तर शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. अनेक डॉक्टर नेहमीच सांगतात की, बरेच लोक किडनीसंबंधी लक्षणे सामान्य दुखणं समजून किंवा थकवा समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण वेळीच हे संकेत ओळखणं फार गरजेचं असतं. कारण जास्त उशीर झाला तर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
किडनीत बिघाड झाल्यावर आधी कुठं दुखतं?
किडनीमध्ये काही समस्या झाल्यास सगळ्यात आधी वेदना कंबरेच्या मागच्या बाजूस, बरगड्यांच्या मागे जाणवतात. वेदना पाठीच्या एका बाजूस किंवा दोन्ही बाजूस जाणवू शकतात. अनेकदा पोटाच्या खालच्या भागात किंवा ग्रोइन एरियामध्येही दुखतं. किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा सूज झाल्यावर वेदना अधिक होतात आणि टोचल्यासारखंही जाणवतं.
किडनीत बिघाड झाल्याची बेसिक लक्षणं
वारंवार लघवी होणे
किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा खूप सामान्य वाटतात. जसे की वारंवार लघवी लागणे किंवा लघवी कमी होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे, लघवीचा रंग गडद होणे किंवा त्यात फेस दिसणे. काही लोकांना लघवीत रक्तही दिसू शकते, जे किडनीशी संबंधित गंभीर समस्येचे संकेत असू शकतात.
शरीरात सूज येणे
शरीरात सूज येणे हेही किडनीच्या समस्येचं महत्त्वाचं लक्षण आहे. जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरात अतिरिक्त पाणी साचू लागतं. त्यामुळे पाय, घोटे, हात आणि चेहऱ्यावर सूज दिसू शकते. अनेक लोकांना सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या आसपास सूज जाणवू शकते.
थकवा आणि अशक्तपणा
किडनीची समस्या असल्यास शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. कारण किडनी रक्त नीट फिल्टर करू शकत नाही, त्यामुळे शरीरात विषारी घटक जमा होऊ लागतात. यासोबत भूक कमी लागणे, मळमळ होणे, उलटी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
जर एखाद्या व्यक्तीला कंबरेच्या मागील बाजूस सतत वेदना, लघवीत बदल किंवा शरीरात सूज अशी लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
