What to Do If A Dog Bites You: उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू ब्रजेश सोलंकी याचा अलिकडेच कुत्रं चावल्यावर रेबिज झाल्यानं जीव गेला. रेबिजमुळे जीव जाणाऱ्यांची संख्या भारतात मोठी आहे. भारतात दरवर्षी १८ ते २० हजार लोकांचा जीव कुत्रं चावल्यामुळे जातो. कारण बरेच लोक कुत्रा चावल्यावर लगेच त्यावर योग्य ते उपचार न घेता थोडीच जखम झाल्याचं सांगत त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असं करणं जीवावर बेतू शकतं हे ब्रजेशच्या मृत्यूनं दाखवून दिलं आहे. ब्रजेशच्या मृत्यूनंतर (Brijesh Solanki dies with rabies) रेबिजबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा बघायला मिळत आहे. लोकही याबाबत जाणून घेत आहे. अशात कुत्रा चावल्यानंतर काय करावे आणि काय करू नये हे पाहुयात.
गल्लीतील कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना अलिकडे भरपूर समोर येतात. मोकाट कुत्र्यांकडे लहान मुलांचे लचके तोडण्यात आल्याच्या अनेक घटनाही समोर आल्यात. अशात कुत्रा चावल्यावर काय करायला हवं हे माहीत असणं महत्वाचं ठरतं.
कुत्रा चावल्यावर 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
ताप येणे
भूक न लागणे
उलटीसारखं वाटणे
जुलाब लागणे
नाकातून पाणी येणे
फार जास्त शिंका येणे
हात आणि पायांवर सूज
जळजळ जाणवणे
कुत्रा चालल्यावर काय करावे?
ज्या जागेवर कुत्र्यानं चावलं आहे, ती जागा लवकर साफ करा. पाणी लावायला अजिबात घाबरू नका. ही जखम १० ते १५ मिनिटं अॅंटी-सेप्टिक सोप व पाण्यानं साफ करा.
जखम साफ केल्यावर त्यावर अॅंटीसेप्टिक लावा. हे केल्यावर रक्तस्त्राव कमी व्हायला हवा. जर असं झालं नाही तर पट्टी बांधून रक्तस्त्राव रोखा. त्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जा.
कुत्र्यानं चावल्यावर काय करू नये?
अनेकदा असं आढळून येतं की, कुत्रा चावल्यावर काही लोक साधारण जखम समजून त्यावर हळद, लिंबू किंवा मीठ लावतात. हे करून बॅक्टेरिया मरतील असं त्यांना वाटत असतं. पण या गोष्टींनी त्वचेची जळजळ अधिक वाढू शकते. या गोष्टी करायचं सोडून आधी डॉक्टरांना भेटा.
कुत्रा चावल्यावर उपचार
२४ तासांच्या आत पहिली लस
जर एखाद्या व्यक्तीला कुत्रा, माक, मांजर किंवा एखादा प्राणी चावला किंवा त्यांच्याद्वारे हलकं खरचटलंही असेल तर त्यातून रक्त येतही नसेल तरी २४ तासांच्या आत रेबिजचं इंजेक्शन घ्यावं. यात जराही उशीर केला तर जीवाला धोका होऊ शकतो.
जर पाळिव कुत्रा चावला असेल आणि त्याचा मालक सांगत असेल की, कुत्र्याला लस दिलेली आहे. तरी सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही रेबिजचं इंजेक्शन घ्यायला हवं.
किती इंंजेक्शन घ्यावेत?
सामान्यपणे कुत्रा चावल्यानंतर ५ इंजेक्शन घ्यावे लागतात. पण पहिलं इंजेक्शन हे २४ तासांच्या आतच घ्यावं. त्यानंतर दुसरं इंजेक्शन तिसऱ्या दिवशी, तिसरं ७व्या दिवशी, चौथं १४ व्या दिवशी आणि पाचवं २८ व्या दिवशी घ्यावं लागतं. डॉक्टर सांगतात की, कधी कधी इंजेक्शन घेतल्यावरही काही लोकांना ताप येऊ शकतो. पण घाबरण्याची गरज नाही.
अनेक प्राण्यानं चावल्यावर लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. पण आपण कुणाच्याही बोलण्यात न येता सगळ्यात आधी चांगल्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य ते उपचार घ्या. बुवा बाबांच्या नादाला लागू नका.