थंडीच्या (Winter) दिवसांत दही खावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. आयुर्वेदानुसार दह्याचे योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्यामुळे अनेक फायदे मिळतात. हिवाळ्याच्या दिवसांत लोक थंड प्रकृतीचे पदार्थ खाणं टाळतात. कारण या पदार्थांमुळे तब्येतीला धोका उद्भवू शकतो तसंच घसा खराब होतो. पण असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही बाराही महिने खाऊ शकता पण योग्य पद्धतीनं, योग्य वेळी याचे सेवन केल्यास बरेच फायदे मिळतील. आयुर्वेदानुसार दही पचन आणि इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी वरदान मानले जाते. (What is the right time to eat curd)
हिवाळ्यात दह्याचे सेवन करायचे असेल तर दुपारच्यावेळी करावं. सुर्य मावळल्यानंतर किंवा रात्रीच्यावेळी दही खाणं टाळायला हवं. असं केल्यानं शरीरात कफची समस्या वाढते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, घश्याच्या समस्या वाढतात. हिवाळ्याच्या दिवसांत कधीही फ्रिजमधून काढलेले पदार्थ थेट खाऊ नका. दही खाण्याआधी कमीत कमी १ ते २ तास आधी फ्रिजच्या बाहेर काढायला हवं. असं केल्यानं दही सामान्य तापमानावर येईल.
दह्यासोबत तुम्ही चुटकीभर भाजलेलं जीरं, काळं मीठ, सुंठ, आल्याची पावडर मिसळून खाऊ शकता. हे मसाले फक्त दह्याची चव वाढवत नाहीत तर पचनासही मदत करतात. हिवाळ्याच्या दिवसांत ताजं लावलेलं दही खा. आंबट किंवा खूप दिवसांचे दही खाल्ल्यानं इन्फेक्शन होऊ शकतं. जर तुम्हाला गोड दही आवडत नसेल तर साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. गूळ गरम असतो जो दह्यासोबत मिसळून खाल्ल्यानं हिवाळ्यासाठी एक उत्तम कॉम्बिनेशन ठरते.
हिवाळ्यात दही खाताना या चुका करू नका
दही रात्रीच्या वेळेत खाऊ नका. दही आणि दुधाचे कॉम्बनेशन रात्रीच्यावेळी आहारात घेऊ नका. हिवाळ्याच्या दिवसांत आंबट दही टाळा.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच चांगले बॅक्टेरियाज असतात. थंडीत आपली पचनसंस्था कधी कधी मंदावते. अशावेळी दही खाल्ल्यानं अन्नाचे पचन नीट होते आणि पोटाचे आरोग्य सुधारते.
दह्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींची क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे थंडीच्या दिवसांत होणारे संसर्ग आणि आजारांशी लढण्यासाठी शरीराला ताकद मिळते.
