Best Sleep Time to Prevent Heart Attack : झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. रोज रात्री साधारण 7 ते 8 तास झोप घेण्याचा सल्ला सगळ्यांनाच दिला जातो. पण आजची लाइफस्टाईल इतकी बदलली आहे की, झोपेचा टाइमटेबलही कोलमडला आहे. ज्याचा प्रभाव आपल्या तब्येतीवर दिसून येतो. कमी झोप किंवा वेळेत न झोपल्यानं अनेक गंभीर आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पण जर झोपेची वेळ नियमितपणे पाळली तर या गंभीर आजारांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
अलिकडेच यूरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या ताज्या संशोधनात काही महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. या संशोधनानुसार रात्री 10 ते 11 वाजेच्या दरम्यान झोपायला जाणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सर्वात कमी आढळलाय. त्यामुळे या वेळेला झोपेचा "गोल्डन अवर" म्हटले जाते.
झोप आणि हृदयाचं कनेक्शन
आपण नेहमी आहार आणि व्यायामावर भर देतो, पण हृदयासाठी योग्य वेळेत झोप घेणं तेवढंच आवश्यक आहे. उशिरापर्यंत जागल्यामुळे शरीराची सर्केडिअन रिदम (Natural Body Clock) बिघडते. ही रिदम हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशर आणि हार्मोनल बॅलन्स नियंत्रित करते. त्यात गडबड झाली की हृदय आणि मेंदूवर ताण येतो आणि गंभीर आजारांचा धोका वाढतो.
काय सांगतं संशोधन?
साधारणपणे 88 हजार लोकांवर हे संशोधन करण्यात आलं. ज्यात 43 ते 74 वयोगटातील ब्रिटनमधील लोकांचा समावेश होता. साधारण 5.7 वर्षे हे संशोधन झालं. ज्यातून रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान झोपणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका सर्वात कमी आढळला. तर 11 ते 12 वाजेदरम्यान झोपणाऱ्यांमध्ये धोका 12% ने वाढला. तर मध्यरात्रीनंतर झोपणाऱ्यांमध्ये धोका तब्बल 25% अधिक आढळला. आश्चर्याची बाब म्हणजे 10 वाजण्यापूर्वी झोपणाऱ्यांमध्येही 24% ने धोका वाढला. याचा अर्थ असा की, खूप लवकर किंवा खूप उशिरा झोपणे, दोन्हीही घातक ठरू शकते.
महिलांवर जास्त परिणाम
या संशोधनात असेही दिसून आले की, उशिरा झोपण्याचा नकारात्मक परिणाम महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळतो. कारण महिलांची जैविक घड्याळ (Biological Clock) आणि हार्मोन सायकल झोपेतील बदलासाठी अधिक संवेदनशील असते.
'हार्ट-फ्रेंडली' झोप कशी घ्यावी?
- झोपेची रोज एक ठराविक वेळ, म्हणजे रात्री 10 ते 11 वाजता झोपा.
- झोपायच्या 30 ते 60 मिनिटांआधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर राहा.
- झोपायच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचं जेवण पूर्ण करा.
- बेडरूम शांतता ठेवा आणि प्रकाशही कमी ठेवा.
- संध्याकाळनंतर चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स किंवा धूम्रपान टाळा.