Is it good to put toothpaste on a burn: अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना चटका लागतो किंवा त्वचा भाजते. ही एक कॉमन बाब आहे. कारण असं अनेकदा महिलांसोबत होतं. अशात बऱ्याच महिला भाजलेल्या जागेवर टूथपेस्ट लावतात. अनेकजण हा उपाय करतात. पण खरंच असं करणं बरोबर असतं का? यावर एक्सपर्ट काय सांगतात ते पाहुयात.
किती योग्य आहे हा उपाय?
हेमेटोलॉजिस्ट-ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर रवि गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, 'त्वचा थोडी भाजली असो वा जास्त त्यावर कधीही टूथपेस्ट लावू नका'.
डॉ. रवि गुप्ता सांगतात की, टूथपेस्ट लावल्यावर थोडावेळ थंड वाटतं. पण त्यातील केमिकल्स त्वचेचं अधिक नुकसान करू शकतात. त्यामुळे भाजलेल्या जागेवर इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. त्याशिवाय स्किन इरिटेशन होऊ शकते आणि अनेकदा तर त्या जागेवर चट्टा येतो. जो कधीही जात नाही. त्यामुळे टूथपेस्ट लावू नका.
मग काय करावं, काय नाही?
थंड पाण्यानं धुवा
डॉक्टर सांगतात की, जर त्वचा भाजली असेल तर सगळ्यात आधी 10 ते 15 मिनिटं थंड पाण्यानं साफ करा. यामुळे जळजळ कमी होईल आणि त्वचेला आराम मिळेल.
बर्फ नका लावू
अनेक लोक असेही आहेत जे त्वचा भाजल्यावर त्यावर बर्फ लावतात. पण असं करणं योग्य नाही. बर्फाने भाजलेल्या त्वचेचं अधिक नुकसान होऊ शकतं.
काहीच लावू नका
त्वचा जर भाजली असेल तर तेल, तूप किंवा इतर काहीही लावू नका. यामुळे त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे थंड पाण्यानं त्वचा धुणं हा पहिला बेस्ट उपाय आहे.
स्वच्छ कापडानं झाका
जळालेली जागा थंड पाण्यानं धुतल्यावर स्वच्छ कापडानं झाका. जेणेकरून त्यावर धूळ, माती लागू नये. जर जास्तच भाजलं असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांना दाखवा.